दिल्ली जिंकली!

0
88

दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने भक्कमपणे पुनरागमन केले आहे. खरे तर दिल्ली विधानसभेत गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपाचा धुव्वा उडवला असला, तरी दिल्लीच्या पालिकांवर भाजपचा वरचष्मा गेल्या दशकाहून अधिक काळ राहिला आहे. तो टिकवण्याचे मोठे आव्हान यावेळी त्या पक्षापुढे होते. काहीही करून ‘आप’ला विधानसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करू द्यायची नाही असा चंग भाजपा नेत्यांनी बांधला होता. त्यामुळे स्वतः पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या निवडणुकांत लक्ष घातले. निर्मला सीतारमण, जितेंद्र सिंग, विजय गोयल, संजीव बालयान यासारख्या केंद्रीय मंत्र्यांनी जातीने निवडणुकीवर नजर ठेवली, व्यंकय्या नायडू, स्मृती इराणी, उमा भारती आणि राजनाथसिंह यांच्याकरवी धुंवाधार प्रचार केला. मनोज तिवारींनी ‘भाजपा दिलमे, भाजपा दिल्लीमें’ ची गाणी गायिली. या सर्व धूमधडाक्यातून भाजपाने पुन्हा एकवार दिल्लीच्या स्थानिक स्वराज्य संस्था सर केल्या आहेत. अँटी इन्कम्बन्सीची साशंकता निकाली काढत आपल्या आधीच्या कामगिरीला अधिक ठळक केले आहे. अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये यासाठी यावेळी भाजपाने पूर्ण खबरदारी घेतली होती. बहुतेक सर्व जागांवर यावेळी नवे चेहरे मैदानात उतरवण्यात आले, त्याचा पुरेपूर फायदा भाजपाला मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत जे प्रचंड यश मिळाले होते ते पाहता दिल्ली सर करणे त्यांना वास्तविक कठीण ठरायला नको होते, परंतु गेल्या दोन वर्षांत दिल्लीच्या जनतेचा ‘आप’ कडून पूर्ण भ्रमनिरास झाल्याचेच हे चिन्ह आहे. केजरीवालांची प्रतिमा शाजिया इल्मी म्हणाल्या त्या प्रमाणे ‘ड्रामा क्वीन’ची बनली आहे. आताही निवडणुकीतील पराभवानंतर त्याचे खापर मतदानयंत्रांवर फोडण्याचा पोरकटपणा पक्षाचे नेते करीत आहेत. नाचता येईना अंगण वाकडे म्हणतात ते हे असे. दिल्लीतील गोरगरीब, मजूरवर्ग, दलित, मागास ही ‘आप’ची मतपेढी मानून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेल्या केजरीवालांनी दिल्लीच्या मध्यमवर्गाची नाराजी ओढवून घेतली. दिलेली आश्वासनेही केजरीवालांना पाळता आली नाहीत, उलट हरघडीस नायब राज्यपालांशी दोन हात, दिल्ली पोलिसांशी दोन हात, केंद्र सरकारशी दोन हात असे संघर्ष करता करता केजरीवाल आपल्या आश्वासनांची पूर्तता करू शकले नाहीत. शहर स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टीचीही पूर्तता त्यांना करता आली नाही, परिणामी डेंग्यू, चिकुनगुनियाने दिल्लीत कहर मांडला. महिलांना सुरक्षा देऊ, सीसीटीव्ही लावू, वायफाय पुरवू, वाहतूक व्यवस्था सुधारू वगैरे आश्वासने अद्याप प्रत्यक्षात उतरू शकलेली नाहीत. सोशल मीडियावरील हल्लागुल्ला मते पारड्यात टाकू शकत नाही हे पंजाब आणि गोव्याच्या निवडणुकांनंतर तरी ‘आप’ ला कळायला हवे होते, परंतु अजूनही त्यांचे विमान हवेतच दिसते. याउलट भाजपाने मोदी सरकारच्या कामगिरीची पुनरावृत्ती दिल्लीत करण्याची ग्वाही देत मतदारांची मने जिंकली. शेजारच्या उत्तर प्रदेशमधील तसेच उत्तराखंडमधील यशाचा परिणाम दिल्लीत दिसणेही स्वाभाविक होते. महानगरपालिकांमधील भाजपाच्या मंडळींनी काही फार चमकदार कामगिरी केली होती असे नव्हे. मिळालेले हे यश हे सर्वस्वी नरेंद्र मोदी सरकारचे आहे. दुसरे म्हणजे भाजपाला पर्याय म्हणावा असे रिंगणात कोणीच नव्हते. ‘आप’ स्वतःची भांडखोर प्रतिमा सुधारू शकला नाही. आधीच गलितगात्र झालेली कॉंग्रेस या निवडणुकांत आणखी रसातळाला गेली. दिल्लीची ही निवडणूक महापालिकांची जरी असली, तरी भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. ती राखली गेली एवढेच नव्हे, तर उंचावली आहे!