राज्यात अपघात मालिका अखंडीत : दोन ठार

0
90

>> सोलयेत बेफाम खनिजवाहू ट्रककडून पोलिसाचा बळी : डिचोलीत दुचाकीस्वाराचा अंत

राज्यात अलीकडील काळात सुरू झालेल्या रस्ता अपघातांमध्ये काहीच खंड पडलेला नसून कालही अशाच वाहन अपघातांमध्ये दोघा दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला. खाण बंदीनंतर खाण पट्ट्यातील जीवघेण्या अपघातांमध्ये खंड पडला होता. मात्र आता खाणी सुरू झाल्यानंतर खाण पट्ट्यात हे जीवघेणे अपघात सुरू झाले. काल सोलये-सत्तरीत एका खनिजवाहू ट्रकने एका पोलीस कॉन्स्टेबलला चिरडले. तर बोर्डे-डिचोली येथील अपघातात एका जीपखाली चिरडल्याने एका विमा कंपनी अधिकार्‍याचा मृत्यू झाला. त्याचे हेल्मेट चिरडले जाऊन त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती.

सोलयेत खनिज ट्रकने
पोलीस कॉन्स्टेबलला चिरडले
सोलये-सत्तरी येथील मोटारसायकल ट्रक अपघातात सोलये-सत्तरीतील महेंद्र सुरेश सोलयेकर गावडे (वय ३३) हा पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला. अपघात काल दुपारी १.४० वा. घडला. खनिजवाहू ट्रक ड्रायव्हर हरिश्‍चंद्र यमनप्पा याला नंतर पोलिसांनी अटक केली.
महेंद्र हा जीए- ०७ ई- १२५८ क्रमांकाची सरकारी मोटारसायकल घेऊन आपल्या सोलये येथील आपल्या घरी जात होता. तर त्याच्या विरुध्द दिशेने जीए- ०४ टी- ०३०३ क्रमांकाचा खनिज मालवाहू ट्रक घेऊन हरिचंद्र यामान्नपा हा ट्रकचा ड्रायव्हर घेऊन येत असताना महेंद्राच्या घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर ट्रक महेंद्राच्या अंगावर आला. महेंद्राला मोटारसायकल चालविण्यासाठी जागाच नसल्याने तो खाली पडला. त्यावेळी ट्रक त्याच्या डोक्यावरून गेला. महेंद्र हा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून डिचोली येथे सीआयडी विभागात काम करीत होता. ज्या ट्रकने महेंद्राला उडविले तो ट्रक सेझा गोवा खाण कंपनीसाठी खनिज वाहतूक करीत होता. त्या ट्रकचा ड्रायव्हर दुपारी जेवण करण्यासाठी सोलये गावात आपल्या खोलीवर आला होता. परत जाताना ट्रकचा अति वेग असल्याने त्याला वळणावर ताबा ठेवता आला नाही त्यामुळे समोरून येणार्‍या महेंद्राला चिरडून गेला.
बेदरकार खाण वाहतुकीचा बळी
महेंद्रचा खाण वाहतुकीमुळे बळी गेला आहे. आपल्या ट्रकचा नंबर लावण्यासाठी अति वेगाने ट्रक चालविण्यात येत असल्याने महेंद्राचा बळी गेला. सत्तरीत खनिजवाहू ट्रक आपले ट्रक नियंत्रणात चालवित नसल्याने पुन्हा एकदा खाण पट्ट्यात अपघात बळी जाऊ लागले आहेत. ट्रक ड्रायव्हरच्या बेजवाबदारपणाने ट्रक चालविण्याने नागरिकाच्या मात्र जीवावर बेतत आहे. त्याना जबाबदार कोण हा पुन्हा प्रश्‍न एकदा सत्तरीत उपस्थित होत आहे. बिगर गोमंतकीय ड्रायव्हरचा भरणा खाण कंपनीत बराच असून ते बेजबाबदारपणे ट्रक चालवित आहेत.
महेंद्रच्या कुटुंबावर शोककळा
पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सोलयेकर याचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तो काल दुपारी होंडा बाजारातून मासे व काही सामान घेऊन परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.
डिचोलीत दुचाकीस्वार मृत्यूमुखी
डिचोली-म्हापसा हमरस्त्यावर बोर्डे येथे काल जीप व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात प्रेमानंद श्रीपाद सावंत (४४) हा आसगाव बार्देश येथील इसम ठार झाला. प्रेमानंद सावंत हा डिचोली विमा कंपनीच्या कार्यालयात सहाय्यक अधिकारी म्हणून कामाला होता.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमानंद सावंत हा जीए- ०३ एस- ५४६९ या क्रमांकाच्या मोटरसायकलने डिचोलीला कामाला येत होता. डिचोलीहून म्हापसाच्या दिशेने जाणार्‍या जीप जीए- ०४ सी- १८४९ यांच्यात टक्कर झाल्याने प्रेमानंद गंभीर जखमी झाला. त्याने हेल्मेट घातले होते. मात्र तेही चिरडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच पायाला जबर मार लागला होता. गंभीर अवस्थेत त्याला बांबोळी येथे नेत असताना वाटेवर त्याचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर अवस्थेत त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व १०८ रुग्णवाहिकेने बांबोळीला हलवण्यात आले होते. मात्र वाटेवरच त्याचे निधन झाले. त्याच्या डोक्याला जबर दुखापत होती व पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.