‘सेरूला’ प्रकरणी खंवटेंनी ‘त्या’ अधिकार्‍यावर कारवाई करावी

0
87

>> प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते डिमेलोंची मागणी

कार्यालयात जरा उशिरा पोचलेल्या कर्मचार्‍यांना शिस्तीचा बडगा दाखविण्याच्या नावाखाली निलंबित न करता सेरूला कोमुनिदादीतील जमीन बळकावण्याच्या प्रकरणी एफआयआर नोंद झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर महसूलमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
खंवटे यांनी विधानसभेत या प्रश्‍नावर आवाज उठविण्याचे नाटक केले होते, हे आता स्पष्ट झाले आहे. सेरूला कोमुनिदाद महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघातच आहे. आता खंवटे महसूलमंत्रीही बनले आहेत. त्यामुळे त्यांनी आता संबंधितांवर ताबडतोब कारवाई करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. जमीन बळकावण्याचा प्रकरणातील सर्व सांगाडे महसूल खात्यातच आहेत. असे असतानाही महसूलमंत्री गप्प का, असा प्रश्‍न त्यांनी केला. खंवटे हे कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले व दुसर्‍याच दिवशी भाजपच्या वळचणीला गेले. त्यामुळे त्यांचे यापूर्वीच भाजप नेत्यांशी ‘सेटिंग’ झाले होते, हे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. सेरूला कोमुनिदादीतील जमीन बळकावण्याच्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फालेरोंचे भाजपशी साटेलोटे
जोपर्यंत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आमदार लुईझिन फालेरो यांच्याकडे असेल तोपर्यंत गोव्यात कॉंग्रेस सरकार स्थापन होणे कदापि शक्य नाही, असे विधान ड्रोजन डिमेलो यांनी यावेळी केले. फालेरो यंाचे भाजपकडे साटेलोटे असल्याचा आरोप डिमेलो यांनी केला.