महामार्गांजवळ मद्यालये खुली ठेवण्याविरोधात गस्ती पथके

0
88

राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या परिसरातील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे म्हणून अबकारी खाते प्रयत्न करीत असले तरी पणजी ते फोंडा तसेच अन्य मार्गांवरील काही मद्यालये रात्रीच्यावेळी खुली ठेवली जात असल्याचे दिसून आल्याने अबकारी खात्याने गस्ती पथकांना पाहणीसाठी पाठविण्याचे ठरविले
आहे.
न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही मद्यालये चालू ठेवणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असून त्याचा परिणाम म्हणून अबकारी अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे. काही मद्यालयांना राजकारणी लोकांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, वरील प्रकरणी अबकारी आयुक्त मिनिनो डिसोझा यांना विचारले असता रात्रीच्या वेळी गस्ती पथके पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या सुधारीत आदेशानुसार २० हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागांना ५०० ऐवजी २२० मीटरांची मर्यादा घालण्यात आल्याने वरील परिसरातील मद्यालयांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया चालू असल्याचे अबकारी आयुक्तांनी सांगितले. पंचायत व पालिका मंडळांकडून दाखले आवश्यक असल्याने ते उपलब्ध झाल्यानंतरच मद्यालयांचे नूतनीकरण करण्यात येते. त्यामुळे या प्रक्रियेस जरा विलंब लागतो, असे डिसौझा यांनी सांगितले.