सरकारने आदेश दिला तरच मद्यालये फेरसर्वेक्षण

0
58

अबकारी खात्याने महामार्गांच्या परिसरात असलेल्या ज्या मद्यालयांचे हवाई सर्वेक्षण करून अंतर मोजणी केली होती. ती रद्द करून आता प्रत्यक्ष महामार्गापासून या मद्यालयांकडे जाण्यासाठीच्या रस्त्यांचे अंतर किती आहे ती मोजणी करावी अशी मद्यालयांच्या मालकांची मागणी असली तरी सरकारने अशा प्रकारे अंतरमोजणी करण्याचा आदेश दिला तरच ती करण्यात येणार असल्याचे अबकारी खात्याचे संचालक मिनिनो डिसोझा यांनी काल सांगितले.
अबकारी खात्याने गोवाभरात जेथे मद्यालये आहेत ते विभाग आरेखित केलेले आहेत. त्याच्या आधारेच खात्याने हे सर्वेक्षण केले आहे. त्यासंबंधीचा सगळा अहवाल खात्याने यापूर्वीच सरकारला पाठवलेला असून जर सरकारला आम्ही चुकीच्या पध्दतीने ही अंतर मोजणी केलेली आहे, असे वाटत असेल तर सरकारने आम्हाला तसे कळवावे लागेल. तसेच कशा प्रकारे फेर अंतर मोजणी करायची हेही आम्हाला कळवावे लागेल, असे डिसोझा यांनी स्पष्ट केले.
सरकारला विश्वासात घेऊनच अबकारी खात्याने हे सर्वेक्षण केले होते. अशा प्रकारे सर्वेक्षण करणे हे चुकीचे आहे असे मद्यालयांचे मालक सोडून कुणाचेही म्हणणे नसल्याचे डिसोझा म्हणाले. सरकारने प्रत्यक्ष महामार्ग व तेथून मद्यालयांकडे जाण्यासाठीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचे अंतर किती आहे ते मोजून अहवाल सादर करावा, असे आदेश जर सरकारने दिला तरच ते काम हाती घेण्यात येणार असल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट केले.