नक्षल्यांचा नायनाट

0
130

छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा मृत्यूचे थैमान मांडले. सात वर्षांपूर्वी दंतेवाडामध्ये अशाच प्रकारे तब्बल ७६ जवानांचा बळी या हैवानांनी घेतला होता. त्याच्या आधी विद्याचरण शुक्ला व इतर ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या काफिल्याचा असाच घात केला गेला होता. वर्षामागून वर्षे उलटत आहेत, परंतु नक्षलवाद्यांचा नायनाट करणे काही सरकारला शक्य झालेले नाही. अलीकडे त्याविरुद्धच्या मोहिमांमध्ये अधिक समन्वय आणि सुसूत्रता आली आहे एवढेच. पण नक्षल्यांनी रानावनांत विणलेले जाळे उद्ध्वस्त करण्यात अजून तरी यश आलेले दिसत नाही. नक्षलवादी चळवळीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांची आरती ओवाळणारे विशेषांक काही नियतकालिकांनी नुकतेच प्रसिद्ध केले. छत्तीसगढपासून आंध्रप्रदेशपर्यंतच्या दुर्गम भागांत आदिवासींमध्ये मिसळून त्यांच्या मनात सरकार, प्रशासन याविषयी विष कालवून त्यांना देशाविरुद्ध भडकावणारे हे माओवादी काय किंवा शहरी भागांमध्ये राहून स्वतः बुद्धिवाद्याच्या संभावित चेहर्‍याने वावरणारे त्यांचे समर्थक प्राध्यापक, पत्रकार, राजकारणी काय; ही दोन्ही एकाच विषवृक्षाची फळे आहेत. रानावनांत प्रत्यक्ष सशस्त्र संघर्ष करणार्‍या माओवाद्यांना स्वतः शहरी सुखवस्तू, चैनीचे जीवन जगून सर्वतोपरी बौद्धिक, आर्थिक पाठबळ ही मंडळी पुरवीत असते. नक्षलवादी म्हणजे जणू काही शोषितांसाठी, आदिवासींसाठी संघर्ष करणारे मसीहा आहेत अशा प्रकारचे उदात्तीकरण हे लोक करीत असतात. पण जेव्हा अशा प्रकारची हिंसक घटना घडते. देशासाठी लढणार्‍या जवानांचा, पोलिसांचा हकनाक आणि निर्दयी बळी घेतला जातो, तेव्हा मात्र, ही मंडळी साळसूदपणे मूग गिळून गप्प राहते. काही काळापूर्वी नक्षल्यांचा एक बुद्धिवादी म्होरक्या जी. एल. साईबाबा ह्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या, तेव्हा त्याच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या अनेकांचे बुरखे फाटले होते. त्या अटकेचा सूड म्हणून गडचिरोलीत सात पोलिसांची हत्या झाली होती. घातपाती रेल अपघात घडवण्याचेही प्रयत्न झाले होते. त्यावेळी ‘‘नक्षलवाद्यांचा खातमा जर करायचा असेल तर मुळात त्यांना मिळणारी ही बौद्धिक आणि आर्थिक रसद तोडली गेली पाहिजे. प्रत्यक्ष मैदानात लढणारे भरकटलेले नक्षल्ये तर प्यादीच आहेत. पटावरचे खरे म्होरके स्वतः सुरक्षित ठिकाणी राहून प्यादी नाचवत आहेत.’’ असे प्रतिपादन आम्ही केले होते. बुद्धिवादी म्होरक्यांचे हे ढोंग गेली पन्नास वर्षे चालत आले आहे आणि त्यांच्या पाठिंब्यावर आणि पैशांवर नक्षलवाद्यांचे मृत्यूचे थैमान सुरू आहे. ज्या सुकनामध्ये नक्षल्यांनी हल्ला केला, तेथे जंगलातून रस्ता बनवला जाणार होता. त्यासाठी सीआरपीएफची रोड ओपनिंग पार्टी तेथे गेली होती. जवळजवळ दोनशे नक्षल्यांनी त्यांना घेरले, गावकर्‍यांना धमकावून त्यांच्या आडून मृत्यूचे थैमान मांडले. भोळेभाबडे आदिवासी यात भरडून निघत आहेत. ज्या गावात हा हल्ला झाला त्याच्या सरपंचाची नुकतीच या नक्षल्यांनी कुर्‍हाडीच्या घावांनी निर्दय हत्या घडविली होती. आदिवासींना विकासापासून पूर्ण वंचित ठेवून त्यांच्या आधारे आपली देशद्रोही कृत्ये करीत आलेल्या नक्षल्यांचा नायनाट करायचा असेल तर त्यासाठी कठोर व्हावे लागेल. आपल्या जवानांचे प्राण एवढे स्वस्त नाहीत हा संदेश या नक्षल्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना गेला पाहिजे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी या विषयात एकमुखी निर्धार करावा लागेल. विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट झाला, प्रत्यक्ष जमिनीवर लढणार्‍या आपल्या दलांना अधिक पाठबळ मिळाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर झाला, तर आदिवासींच्या आडून लढणार्‍या या नक्षल्यांचा समूळ नायनाट अशक्य नाही. तेवढी जिगर आपल्या जवानांत नक्कीच आहे!