उच्च शिक्षणाद्वारे महिला सबलीकरण : राष्ट्रपती

0
271

उच्च शिक्षणाद्वारे होणारे महिलांचे सबलीकरण ही देशासाठी अत्यंत जमेची बाजू ठरू लागलेली असून त्याद्वारे देशात सामाजिक क्रांती घडून येऊ लागली आहे, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी काल सांगितले. गोवा विद्यापीठाच्या २९ व्या पदवीदान सोहळ्यात मुखर्जी बोलत होते. बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडिएममध्ये झालेल्या या समारोहाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाच्या कुलपती डॉ. मृदुला सिन्हा होत्या.

यावेळी मृदुला सिन्हा यांच्याहस्ते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना डिलिट पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच डॉक्टरेट (पीएच्‌डी) मिळवलेल्या व विविध विषयात सुवर्णपदक, पुरस्कार व शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यपालांहस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. एकूण ५६ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली.
युवकांनी आव्हानांना सामोरे जावे
पुढे बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले की उच्च शिक्षण घेतलेल्या युवा पिढीने जागतिक स्तरावरील स्पर्धा व आव्हानांना सामोरे जाण्यासाठीची तयारी करावी. उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जग खुले असून त्यांनी जगभरात असलेली यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी पुढे पावले मारावीत. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचा मोठा हात असतो असे सांगून शिक्षकांनी जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात केले तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होत असतो, असे त्यांनी नमूद केले. उच्च शिक्षणात स्पर्धा हवी असे सांगतानाच विद्यापीठे ही नव्या नव्या कल्पनांना जन्म देणार्‍या विद्यार्थ्यांसाठीची केंद्रस्थाने असायला हवीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षित महिला कुटुंबाला शिक्षित बनवते
ते म्हणाले की एकेकाळी भारत हे उच्च शिक्षणासाठीचे जागतिक केंद्र होते. भारतातील ‘तक्षशिला’ विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी पुरातन काळात जगभरातून विद्यार्थी येत असत, असे ते म्हणाले.
महिलांनी मोठ्या प्रमाणात डॉक्टरेट व अन्य पदव्या मिळवल्याचे चित्र या सोहळ्यात पाहून आनंद झाल्याचे मुखर्जी यांनी यावेळी नमूद केले. एक महिला शिक्षित झाली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करीत असते, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी दिले कुलपतींना वचन!
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. मृदुला सिन्हा म्हणाल्या की ज्ञान ग्रहण केल्याने अज्ञान दूर होते. ज्ञान म्हणजे प्रकाश असून अज्ञान म्हणजे अंधार असल्याचे त्यानी नमूद केले. विद्यार्थी व शिक्षक यांच्यात एक स्नेहाचे व प्रेमाचे असे नाते असायला हवे, असे त्या यावेळी म्हणाल्या. डॉ. सिन्हा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना हात वर करून चार वचने देण्यास भाग पाडले. आई-वडिलांना तुम्ही वृध्दाश्रमात पाठवणार नाहीत, लग्नानंतर घटस्फोट घेणार नाहीत, कोणतीही युवती अथवा महिला यांच्यावर तुमच्या डोळ्यांसमोर अत्याचार होत असेल तर ते बघून तुम्ही गप्प बसणार नाहीत व कुठेही कचरा दिसला तर तो तुम्ही उचलणार आणि कुठेही घाण करणार नाहीत अशी ही चार वचने होती.
पदवीपूर्व शिक्षणात बदल हवा : कुलगुरू
गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरुण साहनी यावेळी म्हणाले की पदवीपूर्व शिक्षणात काही बदल घडवून आणण्याची गरज असून विद्यार्थ्यांना हवे आहेत असे त्यांच्या आवडीचे काही अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमात रस आहे असे अभ्यासक्रम निवडून स्वत:ला झोकून देऊन त्यानी हे शिक्षण घ्यावे हा असे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यामागील उद्देश असायला हवा, असे त्यांनी व्यावेळी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. व्हाय्. व्ही. रेड्डी हेही हजर होते. यावेळी गोवा विद्यापीठातील प्राध्यापक वर्ग तसेच राज्यभरातील महाविद्यालयातील अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाला सभापती प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर, आमदार दयानंद सोपटे, पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर आदी हजर होते.