कॅन्सरचा विळखा भाग – ३

0
142

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

वात, पित्त, कफ व रक्त दोषांची दुष्टी झालेल्या व्रणास ‘दुष्ट व्रण’ म्हटले आहे. या व्रणाचे परीक्षण करताना त्याचा आकार, वास, रंग, त्यातून होणार्‍या स्रावाचे स्वरूप, अवस्था आणि त्वचा, मांस, सिरा, स्नायू, अस्थि, सांधे, कोष्ठ, मर्म यांपैकी कुठपर्यंत खोल गेला आहे, या गोष्टींचा विचार करावा लागतो.

कँसरग्रस्त रुग्णांबाबत कँसर ‘लास्ट स्टेज’ला आहे… असेच बर्‍याचवेळा ऐकिवात येते. मग रुग्णाचे नातेवाईक व इतर डॉक्टर्सना कधी कळलेच नाही का… अशा स्वरूपाची चर्चा सुरु करतात. मुळातच कँसरची पूर्वलक्षणे ही सामान्यच असतात. सतत अपथ्यकर आहार-विहार राहिला व औषधोपचारही केले नाहीत म्हणजे हीच सामान्य व्याधी कॅन्सरमध्ये परीवर्तीत होते. रुग्णही बर्‍याच वेळा सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
कॅन्सरची सामान्य लक्षणे ः-
चरक, सुश्रुत या आयुर्वेदीय संहितात दुष्ट व्रण, ग्रंथी, अर्बुद, विद्रधी-विसर्प, नाडीव्रण, मांसप्रदोषज विकार या व्याधींचे वर्णन केले आहे. कॅन्सरची लक्षणे या व्याधींशी साधर्म्य असलेली आहेत. या व्याधी शरीरात कोणत्याही स्थानी किंवा कोणत्याही अवयवात निर्माण होऊ शकतात. उदा. दुष्ट अर्बुद हा मस्तिष्क, अन्ननलिका, आमाशय, यकृत, मूत्रपिंड, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या रुग्णांत दुष्ट अर्बुदाची लक्षणे दिसतात तसेच अर्बुद ज्या अवयवात निर्माण झाला आहे त्या अवयवाच्या रचनात्मक किंवा क्रियात्मक विकृतीची लक्षणेही दिसतात.
शरीराच्या विशिष्ट अवयवात/स्थानात दुष्ट व्रण-ग्रंथी-अर्बुद इ. निर्माण झाल्यावर ते दोन प्रकारची लक्षणे व्यक्त करतात.
प्रत्यक्ष व्याधीची लक्षणे ः-
दुष्ट व्रण निर्माण झाल्यास त्या स्थानी तीव्र वेदना, आग होणे, आरक्त वर्ण यासारखी लक्षणे व्यक्त होतात.
दुष्ट अवयव/स्थान/स्रोतसाची लक्षणे –
– ज्या अवयवात, स्थानात, स्रोतसात दुष्ट अर्बुदादी निर्माण होतात त्या स्थानाचीही रचनात्मक व क्रियात्मक विकृती होते व स्थानिक लक्षणे निर्माण होतात. उदा. अवयव लक्षणे – दुष्ट अर्बुद आमाशयात निर्माण झाला तर अम्लपित्त, वारंवार उलट्या होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे निर्माण होतात.
स्थानिक लक्षणे – मांडी या स्थानी दुष्ट अर्बुदादी निर्माण झाल्यास त्या भागात जडपणा, पायाच्या हालचाली करताना अतिशय वेदना निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात.
स्रोतस लक्षणे – यकृतात दुष्ट अर्बुद – विद्रधी निर्माण झाल्यास यकृत हे रक्तवह स्रोतसाचे मूळ स्थान असल्याने कावीळ, रक्तपित्त (नाक, तोंड, गुद, योनी या अवयवांतून रक्त येणे) यासारखी रक्तवह स्रोतसाच्या दुष्टीची लक्षणे दिसतात.दुष्ट व्रण, दुष्ट ग्रंथी, दुष्ट विसर्प, दुष्ट विद्रधी यांची आयुर्वेदीय ग्रंथात दोन प्रकारे लक्षणे सांगितली आहेत.
१. सामान्य लक्षणे आणि २. विशेष लक्षणे- प्रकारानुसार व्यक्त होणारी.
दुष्ट व्रण – ‘व्रण’ या शब्दाचा व्यवहारातील अर्थ म्हणजे जखम होय. असा व्रण शरीरात दोन कारणांनी निर्माण होतो.
– शरीरातील वात-पित्त-कफ-रक्त या दोष व धातूंच्या दुष्टीमुळे निर्माण होणार्‍या व्रणाला शारीर व्रण/निज व्रण म्हणतात.
– मार लागणे, पडणे, शस्त्रांचा आघात होणे, पशु-पक्षी-कीटक यांचा स्पर्श यासारख्या बाह्य कारणांमुळे निर्माण होण्यार्‍या व्रणाला ‘आगन्तु व्रण’ म्हणतात.
सुश्रुताचार्यांनी निज व्रणाचे दोषांच्या दुष्टीनुसार १५ प्रकार सांगितले आहेत. वात, पित्त, कफ व रक्त दोषांची दुष्टी झालेल्या व्रणास ‘दुष्ट व्रण’ म्हटले आहे. या व्रणाचे परीक्षण करताना त्याचा आकार, वास, रंग, त्यातून होणार्‍या स्रावाचे स्वरूप, अवस्था आणि त्वचा, मांस, सिरा, स्नायू, अस्थि, सांधे, कोष्ठ, मर्म यांपैकी कुठपर्यंत खोल गेला आहे, या गोष्टींचा विचार करावा लागतो.
* दुष्ट व्रण अतिशय संकुचित मुख असलेला, अति विकृत मुख असलेला, अति कठीण, अति मृदु, वर उचलून आलेला, दबलेला, अतिशीत, अतिउष्ण, काळा, तांबडा, पिवळा, पांढरा यापैकी कुठलातरी वर्ण असलेला, वारंवार वेगवेगळी लक्षणे निर्माण करणारा, दुर्गंधी पूययुक्त, तिर्यक् गती असलेला, मांसादि धातू वर आलेला, मनास न आवडणारा गंध असलेला, दर्शनास किळसवाणा, अतिशय वेदना-दाह, लाली, पाक, खाज, सूज, पुरळयुक्त, दुष्ट रक्तस्राव होत असलेला आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. कॅन्सरच्या काही प्रकारात अशी दुष्ट व्रणाची लक्षणे आढळतात.
* दुष्ट ग्रंथी –
शरीराच्या एका स्थानात जेव्हा दोष एकत्र संचित/ग्रथित होतात तेव्हा त्यांना ग्रंथी म्हणतात. यात प्राधान्याने मांस, मेद व रक्ताची दुष्टी होऊन सूज निर्माण होते. गोलाकार, कठीण व वर आलेली (उन्नत) सूज ही दुष्ट ग्रंथीची सामान्य लक्षणे आहेत. दुष्टी करणार्‍या दोष धातूंच्या आधिक्यानुसार दुष्ट ग्रंथीच वातज, पित्तज, कफज, मेदज, सिराज, रक्तज, मांसग्रंथी, अस्थिग्रंथी व व्रणग्रंथी असे प्रकार होतात. कॅन्सरचे काही प्रकार दुष्ट ग्रंथीच समाविष्ट होतात.
* दुष्ट अर्बुद –
शरीराच्या कोणत्याही प्रदेशात प्रकुपित झालेल्या दोषांनी मांसाची दुष्टी उत्पन्न करून जो उंचवटा उत्पन्न केला जातो त्याला अर्बुद म्हणतात. हा उत्सित मांसाच्या संचयामुळे निर्माण होतो. हा आकाराने गोल व मुळाच्या ठिकाणी मोठा असलेला असतो. याची वाढ सावकाश होते. हा स्थिर व मंद वेदनायुक्त असतो. दोषांनी दूषित झालेल्या अर्बुदास दुष्ट अर्बुद म्हणतात. अर्बुद निर्माण होण्यात कफ-दोष, मांस व मेदाचे आधिक्य असले तरी अर्बुदाचे वातज, पित्तज, कफज, रक्तज, मांसज व मेदोज असे सहा प्रकार पडतात. अर्बुदाच्या स्वरूपावरून त्याचे अध्यर्बुद व द्विरर्बुद असे प्रकारही पडतात. अर्बुदावर अर्बुद निर्माण होणे याला अध्यर्बुद म्हणतात व आजूबाजूला दोन अर्बुद निर्माण होणे याला द्विरर्बुद म्हणतात. दुष्ट अर्बुद गोलाकार, स्थिर, मंद वेदना असलेला, मोठी जागा व्याप्त करणारा ज्याची मुळे मोठ्या पृष्ठभागावर व्यापली आहेत. हळुहळू वाढणारा व हळुहळू पाक होणारा असतो. अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये अशा प्रकारचे अर्बुद प्रत्यक्ष पहायला मिळतात.
* दुष्ट विद्रधी –
ज्या सूजेमध्ये अतिशय लवकर लालपणा, उष्णस्पर्श अशी पाक लक्षणे दिसतात त्याला दुष्ट विद्रधी म्हणतात. त्वचा, रक्त, मांस, मेद यांची दुष्ट दोषांमुळे गंभीर धातुस्थ दुष्टी होते व त्यामुळे घोर – उत्सेधयुक्त सूज निर्माण होते. त्यास विद्रधी म्हणतात. यात प्राधान्याने रक्तदोषाची दुष्टी होते. गुद, बस्तिमुख, नाभी, कुक्षी, वंक्षण, वृक्कस यकृत, प्लिहा, हृदय, क्लोम या शरीराच्या आभ्यंतर अवयवात दुष्ट दोषांनी रक्त व मांसाची दुष्टी होते व दारुण वारुळाच्या किंवा गुंतलेल्या वेलींच्या आकाराचा दुष्ट विद्रधी निर्माण होतो.
दुष्ट विद्रधी शरीर अवयावत मोठे विस्तारीत मूळ असलेला, वेदनायुक्त, गोल किंवा आयताकार व वारंवार दुष्ट होणारा असतो. विद्रधीचे वातज, पित्तज, कफज, बसान्निपातिक, रक्तज, क्षतज असे भेद होतात.
काही कँसर प्रकारांचा समावेश दुष्ट विद्रधीत होतो.
याशिवाय दुष्ट विसर्प, दुष्ट नाडीव्रण, दुष्ट गलगंड, दुष्ट गंडमाला यासारख्या व्याधीही कॅन्सरच्या काही प्रकारात समाविष्ट होतात. वर वर्णन केलेले दुष्ट व्रण-ग्रंथी-अर्बुदइ. व्याधी शरीराच्या ज्या अवयवात निर्माण होतात त्या अवयवाचा कॅन्सर निर्माण करतात. उदा. दुष्ट अर्बुद मस्तिष्कात निर्माण झाल्यास त्या मस्तिष्काचा कँसर म्हणतात.
ल्युकेमिया ः- ल्युकेमियाचे (रक्ताचा कँसर) आयुर्वेदात वर्णन केलेल्या रसाधातुगत ज्वर, रक्तधातुगत ज्वर, ज्वर पाक, पाणडू, रक्तपित्त, कृमी या व्याधींशी साधर्म्य आढळते. यात रक्तवर्णी पीडका सर्व शरीरावर निर्माण होणे, ताप, भूक मंदावणे, तोंडाची रुची नष्ट होणे, पाण्डुता, श्‍वासाधिक्य, खोकला, दुर्बलता अशी लक्षणे निर्माण होतात.
कॅन्सरमध्ये दुष्ट व्रण, दुष्ट ग्रंथी, दुष्ट अर्बुद इ. ज्या अवयवात निर्माण होतात त्या अवयवांनुसार विशिष्ट लक्षणे दर्शवतात.
कॅन्सरची जी प्रमुख लक्षणे सांगितली आहेत तीच लक्षणे कॅन्सर व्यतिरिक्त अन्य व्याधींमध्येही आढळू शकतात. परंतु ही लक्षणे वारंवार किंवा दीर्घकाळ दिसल्यास रुग्णाने कॅन्सर संबंधित तपासण्या करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.