आरोग्याशी खेळ

0
107

अन्न आणि औषध प्रशासनाने पणजी बाजारपेठेतील आंबा विक्रेत्यांवर टाकलेल्या छाप्यांत कृत्रिमरीत्या पिकवलेले जवळजवळ चारशे किलो आंबे आणि सिंथेटिक रंग असलेली हळद जप्त करण्यात आली. ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची कारवाई आहे. पैशासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याची जी प्रवृत्ती अलीकडे सर्रास दिसून येते, त्याचाच परिपाक म्हणून अशा प्रकारच्या घातक गोष्टी साळसूदपणे विक्रीसाठी आणल्या जातात. बाजारपेठांमध्ये विक्रीला येणारी फळफळावळ आणि भाज्या किती रासायनिक प्रक्रियांमधून गेलेल्या आहेत याची चाचपणी करण्याची कोणतीही साधने ग्राहकाच्या हाताशी नसल्याने मुकाटपणे खरेदी करणेच त्याच्या हाती उरते. याचा व्यवस्थित फायदा उठवून ग्राहकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याशी खेळ मांडला जातो. आंब्याच्या मोसमात बाजारात आलेल्या पिवळ्याजर्द आंब्याचा मोह ग्राहकांना पडला तर नवल नाही, परंतु जेव्हा आंबा म्हणून आपण घरी जे उत्पादन नेतो, त्याच्यावर सुरवातीपासून शेवटपर्यंत किती रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात त्याबाबत तो पूर्णतः अनभिज्ञच असतो. आधी आंब्याच्या झाडाला मोहोर यावा म्हणून त्यावर रासायनिक फवारणी केली जाते. गोव्यातील काही बडे आंबा व्यावसायिक त्यासाठी खास कोल्हापूरहून माणसे आणतात. झाडांवर चढून रासायनिक फवारणी केलीज जाते. त्याचा परिणाम म्हणून झाडांना लवकर मोहोर येतो. झाडाला आंबा लागताच त्यावर रोगराई पसरू नये म्हणून रसायनांची फवारणी होते ती वेगळीच. आंबा पिकण्याचीही वाट पाहिली जात नाही. त्याआधीच तो उतरवून पिकवण्यासाठी घातक रसायनांमध्ये ठेवला जातो. जे आंब्याचे, तेच केळी, द्राक्ष्यांसारख्या इतर फळफळावळीचे. त्यामुळे एकप्रकारे आपण आरोग्याला फळे हितकारक म्हणून महागडी फळफळावळ खरेदी करावी आणि प्रत्यक्षात मात्र घातक रसायनांची प्रक्रिया झालेले विषच फळांच्या रूपात घरी न्यावे असा प्रकार घडत असतो. अशावेळी खरी जबाबदारी आहे ती सरकारच्या अन्न व औषध प्रशासनासारख्या यंत्रणांवर. अधूनमधून अशा प्रकारचे छापे मारले जातात. गुन्हे पकडले जातात, परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू राहतो. मध्यंतरी दुधात भेसळ करणार्‍यांची मोठी टोळी कर्नाटकात पकडली गेली. दुधात टूथपेस्ट, युरिया अशा घातक गोष्टी मिसळून ते सर्रास गोव्यात विक्रीसाठी पाठवले जात होते. गेली दहा वर्षे हे प्रकार सुरू होते. गेल्या वर्षी फोंड्यात हिरवा वाटाणा म्हणून हिरवा रंग दिलेले पांढरे वाटाणे विकताना काहींना पकडले गेले होेते. प्रत्येक सणासुदीला तर घातक मावा आणि तत्सम पदार्थ पकडले जातात. परंतु तरीही दरवर्षी गोव्यात या घातक गोष्टी येतच राहतात. दुधापासून फळफळावळीपर्यंत आणि भाज्यांपासून धान्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत भेसळ असण्याची भीती सतत ग्राहकांच्या मनात उरते. या भीतीवरच ऑर्गेनिक उत्पादनांची मोठी महागडी बाजारपेठ निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात ही ‘ऑर्गेनिक’ म्हणवणारी उत्पादनेही खरोखरच तशी रसायनविरहित प्रक्रियेने तयार केलेली असतात याची खातरजमा करण्याची कोणतीही व्यवस्था नसते. केवळ अधूनमधून छापे मारणे किंवा व्यापार्‍यांना दंड ठोठावणे हा भेसळीवरील उपाय नव्हे. प्रत्यक्षात ह्या ज्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात, त्यांची गुणवत्ता तपासणारी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित व्हायला हवी. तसे झाले तरच अशा प्रकारच्या घातक गोष्टी बाजारात येताक्षणी आणि ग्राहकाकडे विक्रीला जाण्यापूर्वीच पकडल्या जाऊ शकतील. मानवी आरोग्याशी खेळ मांडणार्‍यांसाठी कायदाही कडक बनायला हवा. हे सगळे घडले तरच अशा प्रकारच्या भेसळीला धाक बसेल. मानवी आरोग्याशी मांडलेला खेळ थांबेल.