गर्भवती स्त्रीच्या तोंडाचे आरोग्य!

0
188

गर्भवती असल्यास तसेच गर्भनिरोधक गोळ्या घेत असणार्‍या स्त्रियांमध्ये एका प्रकारचे प्रोजेस्टिरोन नावाच्या संप्रेरकांचे प्रमाण वाढते. याच्या परिणामार्थ हिरड्यांची जिवाणूप्रतिची संवेदनशीलता अधिक वाढते आणि हिरड्यांच्या रोगाची सुरुवात होते.

स्त्रियांनी आपल्या शरीराबरोबर दातांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये तारुण्य, मासिक पाळी, गर्भधारणा व मेनोपॉज (मासिक पाळी बंद होते, तो काळ) अशा सर्व जीवनातील टप्प्यांवर संप्रेरक बदल घडून येतात व त्यामुळे तोंडाच्या आरोग्यातही बदल घडत राहतात. म्हणूनच गर्भवती असल्यास आपले तोंड निरोगी ठेवणे प्रत्येक स्त्रीसाठी तेवढेच महत्त्वाचे असते.
गर्भवती स्त्रीमध्ये दात व हिरड्यांसंबंधी कोणत्या समस्या आढळून येतात?
– गर्भवती असल्यास दात किडण्याची समस्या अधिकच वाढते. हिरड्यांचे रोगही अधिक प्रमाणात दिसून येतात. हिरड्यांचा रोग झाल्यास हिरड्या कमजोर बनून दातांना आधार देणार्‍या दातांभोवतीच्या हाडाची पातळी खालावते व दात हलू लागतात. काही काळानंतर ते गळून पडतात.
– धुम्रपान करणार्‍या, पौष्टिकतेची कमतरता असणार्‍या स्त्रियांमध्ये दात व हिरड्यांच्या समस्या वाढतात. वेळोवेळी डेंटिस्टकडे जाऊन दातांची तपासणी न करून घेतल्यानेही समस्या अधिक वाढू शकतात.
– गर्भवती असल्यास तसेच गर्भनिरोधक गोळ्या घेत असणार्‍या स्त्रियांमध्ये एका प्रकारचे प्रोजेस्टिरोन  नावाच्या संप्रेरकांचे प्रमाण वाढते. याच्या परिणामार्थ हिरड्यांची जिवाणूप्रतिची संवेदनशीलता अधिक वाढते आणि हिरड्यांच्या रोगाची सुरुवात होते. यालाच ‘जिंजीवाईटीस्’  असे म्हणतात. या रोगामुळे हिरड्या लाल फुसफुशीत बनून, कसलाही स्पर्श झाल्यास रक्तस्त्राव सुरू होतो. याची वेळेस दखल न घेतल्याने त्याचे रूपांतर अधिक हानिकारक अशा ‘पेरिओडॉण्टाईटीस’  मध्ये होते. पेरिओडॉण्टाईटीस’मध्ये दातांभोवतीचे हाड नष्ट होऊन दात गळून पडतात.
– गर्भवती असल्यास स्त्रियांना चिकट, गोड पदार्थ खावेसे वाटतात, याचा परिणाम दातांवर होऊ शकतो.
– गर्भवती स्त्रीला उलटी येण्याचा त्रास होत असतो, ज्याने दात खराब होऊ शकतात. पोटातील आम्ल पदार्थ उलटी झाल्याने तोंडात येऊन पसरतात. हे आम्ल पदार्थ तोंडात अधिक काळ राहिल्यास दातांना नष्ट करू शकतात.
गर्भवती स्त्रीला हिरड्यांचा रोग झाल्यास होणार्‍या बाळावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
– संशोधकांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर असे दिसून येते की, आईला हिरड्यांचा रोग असण्याचा संबंध बाळाच्या जन्मावेळीच्या कमी वजनाशी आहे.
– हिरडयांच्या रोगांमुळे, हिरड्यांतील जिवाणू रक्तस्त्रावाद्वारे गर्भाशयापर्यंत प्रवास करू शकतात. याच्या परिणामार्थ एका प्रकारचे रसायन, ‘प्रोस्टाग्लेण्डिनस्’ याचे उत्पादन होऊन अकाली वेदना निर्माण होऊ शकतात.
गर्भवती असल्यास स्त्रीचा एक्स-रे काढणे सुरक्षित आहे का?
– आपण गर्भवती असल्यास आपल्या डेंटिस्टला लगेच कळवा. गर्भवती असल्यास ‘एक्स-रे’ काढण्यास मनाई असते. अगदी नाईलाज असेल व एक्स-रे काढणे खूपच गरजेचे असेल तरच सुरक्षेसाठी ‘लेड एप्रन’ घालून एक्स-रे काढता येतात.
– त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रीसाठी नेमकीच औषधे सुरक्षित असून तीच घ्यावी लागतात. इतर कोणतीही औषधे घेतल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
होणार्‍या आईने प्रौष्टिक खाण्या व संपूर्ण शरीराची काळजी घेण्याव्यतिरिक्त तोंडाचीही संपूर्ण काळजी घेणे महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे आनंदी राहाणे!