0
85

आशिया खंडातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झाले. उद्घाटनानंतर बोगद्यात काही अंतरापर्यंत जाऊन मोदींनी  केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आदींसमवेत बोगद्याची पाहणीदेखील केली. एनएच – ४४ या राष्ट्रीय महामार्गावर जम्मू ते श्रीनगरला जोडण्यासाठी नशरी ते चेनानी असा बोगदा तयार करण्यात आला असून त्याची लांबी ९.२८ किलोमीटर आहे. पाच वर्षांच्या अथक मेहनतीनंतर तब्बल ३,७०० कोटी रुपये खर्च करून तो उभारण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर ३० किलोमीटरने कमी होणार असून या बोगद्यामुळे प्रवासातील वेळ २ तासांनी कमी होणार आहे. दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचतही होणार आहे. विशेष म्हणजे हा बोगदा प्रवासासाठी सुरक्षित असून त्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजीदेखील घेण्यात आली आहे. या बोगद्यामुळे आता १२ महिने श्रीनगरचा देशाबरोबर संपर्क राहील. हवामानामुळे कधीही देशाशी संपर्क तुटणार नाही.