गोवा ३६५

0
320

– दीपक नार्वेकर,
(जनसंपर्क अधिकारी, गोवा पर्यटन विकास महामंडळ)

गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. देश-विदेशातील जवळपास ६० लाखांहून अधिक पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देत असतात. देशी पर्यटकांसाठी गोवा हे नंदनवन बनले आहे. विदेशात जाण्याचा खर्च परवडत नसेल आणि विदेशातील माहोल उपभोगायचा असेल तर गोवा हेच एकमेव ठिकाण आहे.

मुलांच्या परीक्षा संपून सुट्या सुरू झाल्या की लोकांना वेध लागतात ते वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेट देण्याचे. भारतातील जादातर लोकांची पहिली पसंती आहे गोवा. सुट्टी म्हटली की गोवा असं समीकरण झालेलं आहे. त्यामुळे जादातर देशी पर्यटक गोव्याला सुट्टी घालवायला येत असतात. गोव्यातील अदबशीर लोक, गोव्याची जीवनशैली, खाद्यपदार्थ पर्यटकांना भुरळ घालतात. गोव्याची लोकसंस्कृती, सण, उत्सव, त्याचप्रमाणे आल्हाददायक निसर्ग पर्यटकांना गोव्याकडे खेचून आणतो.
आता उकाड्याचा पारा वाढू लागला आहे. घरात बसून बेचैन झालेल्या जीवाला रिलॅक्स करायचे असेल तर हॉट एअर बलून, होप ऑन होप ऑफ बसेस आणि अन्य नवीन पर्यटन सेवांचा आनंद लुटून उन्हाळ्यावर मात करायला सज्ज व्हा. गोव्यातील पर्यटनस्थळे आपल्याला साद घालत आहेत.
नैसर्गिक पर्यटनस्थळांसाठी जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त असलेल्या गोव्यात आता आधुनिक पर्यटन सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हॉट एअर बलुनिंग सेवा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत चालली आहे. हॉट एअर बलून सेवेला मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. दक्षिण गोव्यातील असोल्डा आणि केपे येथे ही सेवा कार्यरत असून देशविदेशातील पर्यटक या सेवेचा लाभ घेत आहेत.
पर्यटन महामंडळातर्फे लवकरच हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. पॅरिस, बर्लिनसारख्या शहरांमध्ये अशा बसेस उपलब्ध आहेत. होप ऑन होप ऑफ बसेसमधून गोव्यातील पर्यटनस्थळांचा आनंद लुटणे हा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे. उघड्या छताच्या डबल डेकर बसेसमधून गोव्यातील पर्यटनस्थळे पाहण्याची व्यवस्था लवकरच कार्यान्वित होईल. पर्यटकांना एका वेगळ्या अनुभूतीचा आनंद यामुळे मिळणार आहे.
मोटराइज्ड पॅराग्लायडिंग सुविधाही साहसी क्रीडा प्रकारात रस असलेल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू लागली आहे. हरमल- मांद्रे येथील जुनासवाडा समुद्रकिनार्‍यावर मोटराइज्ड पॅराग्लायडिंगचा आनंद पर्यटक लुटू शकतात. यामध्ये दोन पर्यटक बसून समुद्रकिनार्‍याचे दृश्य आकाशातून विहार करताना पाहू शकतात. सुरक्षाव्यवस्थेचे सर्व मानक पाळून ही सेवा पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. ही सेवा पुनश्‍च सुरू होण्याचे संकेत आहेत.
किनार्‍यांवर जलक्रीडांचा आनंद गोव्यात लुटणे हा अपूर्व असा क्षण असतो. स्पीड बोटीतून पाण्याचे तुषार उडवत समुद्रात मारलेला फेरफटका, जेटस्कींग, कायकिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग, सेलिंग, बोटिंग करून आपण एका अनोख्या विश्‍वात हरवून जाल.
उकाड्याचे दिवस असल्याने बॅक वॉटरची सैर हासुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो. पर्यटन महामंडळाने खास बोटीद्वारे बॅकवॉटर सफर सुरू केली आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग उपलब्ध आहे. किनार्‍यांवरील नाईट लाईफचा माहोल काही औरच असतो. क्लब, शॅक्समधील पार्ट्यांमध्ये सहभागी होऊन थिरकणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. पर्यटकांची नेहमीच त्याला पसंती मिळत आलेली आहे.
मुले, कुटुंबीय आणि मित्रमंडळीसह गोव्यात येणार्‍या पर्यटकांना सुट्टीचा मूड एन्जॉय करण्यात कसलीच कमतरता जाणवणार नाही इतके उपक्रम गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळाने राबवले आहेत. यावेळी गोव्यात याल तेव्हा गोव्याची हवाई सैर अनुभवायला विसरू नका. गोव्यातील पर्यटनस्थळांचे सौंदर्य डोळ्यात भरून ठेवण्यासारखे आहे. हे सौंदर्य हॅलिकॉप्टरमधून नजरबंद करता यावे यासाठी गोवा पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ लवकरच परत हॅलिकॉप्टरची व्यवस्था करणार आहे.
गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. देश-विदेशातील जवळपास ६० लाखांहून अधिक पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देत असतात. देशी पर्यटकांसाठी गोवा हे नंदनवन बनले आहे. विदेशात जाण्याचा खर्च परवडत नसेल आणि विदेशातील माहोल उपभोगायचा असेल तर गोवा हेच एकमेव ठिकाण आहे.
येथील सोनेरी वाळूचे किनारे, किनार्‍यांवरील सुरूची बने, फेसाळणार्‍या लाटा, सूर्यास्ताचा डोळ्यात भरून ठेवता येण्यासारखा नजराणा, आध्यात्मिक विश्‍वात घेऊन जाणारी मंदिरे, चर्चेस, मशिदी, गुरुद्वारा, हजारो जातीच्या पशुपक्ष्यांना आश्रय देणारी अभयारण्ये, मसाल्याच्या विश्‍वाची अनोखी सैर घडवून आणणारी स्पाईस गार्डन्स, मनाला ताजातवाना करणार्‍या जलसफरी, त्याचबरोबर गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवरील आनंद द्विगुणित करणारे वॉटर स्पोर्टस् अनुभवायचे असतील तर एकदा, दोनदा नव्हे तर मन भरेपर्यंत गोव्याला वारंवार भेट द्यायला हरकत नाही.
गोव्यात अनेक पंचतारांकित आणि तारांकित हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये उन्हाळी मोसमातही पर्यटक मोठ्या प्रमाणात आरक्षण करून राहत असतात. या हॉटेल्समार्फत पर्यटकांच्या मनोरंजनाची पुरेपूर काळजी घेतली जाते. किनार्‍यांवर असलेल्या हॉटेल्समधून पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या जलक्रीडांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, स्पीड बोटिंग, जेटस्कींग आदी जलक्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पणजीतील दोनापावल तसेच कांदोळीतील कोको बीचवर देशविदेशातून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात जलक्रीडांचा आनंद लुटून गोवा एन्जॉय करत असतात.
कळंगुट किनारा हा गोव्याला भेट देणार्‍या पर्यटकांच्या गळ्यातील ताईतच बनलेला आहे. देशविदेशांतील लाखो पर्यटक कळंगुट किनार्‍याला भेट दिल्याशिवाय आपली गोव्यातील सहल पूर्ण झाल्याचे समजत नाहीत. कळंगुटचे ‘नाइट लाइफ’देखील पर्यटकांच्या पसंतीस पडू लागले आहे. कॉर्पोरेट जगतातील मंडळी विकएंड साजरा करण्यासाठी कळंगुटला न चुकता येत असतात. विमान, रेल्वे आणि रस्ते यामार्गाने गोवा देशातील महत्त्वाच्या शहरांशी आणि जगाशी जोडला गेलेला असल्याने पर्यटकांना गोव्यात येणे सोपे झाले आहे. विकएंड साजरा करण्यासाठी देशातील मोठ्या शहरांतून गोव्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.
कळंगुटबरोबरच बागा, हणजुणे, हरमल, मांद्रे, तेरेखोल, केरी, मोरजी, आश्‍वे, कांदोळी हे उत्तर गोव्यातील तर दक्षिण गोव्यातील कोलवा, पाळोळे, बाणावलीसारख्या किनार्‍यांवर समुद्रस्नानासाठी भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या उन्हाळ्यात वाढत असते. उन्हाळ्याच्या दिवसांत केलेले समुद्रस्नान आरोग्यवर्धक असल्याचा स्थानिकांचा समज आहे. पर्यटकांबरोबरच स्थानिकही उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून समुद्रस्नानाचा आनंद लुटत असतात. या दिवसांत गोव्यातील बहुतेक किनारे गजबजलेले पाहायला मिळतात.
पोर्तुगिजांच्या प्रदीर्घ राजवटीमुळे गोव्यातील काही भागांवर पाश्‍चिमात्त्य जीवनशैलीचा प्रभाव पाहायला मिळतो. पोर्तुगीज पद्धतीच्या वास्तुशैलीने उभारलेली घरे, चर्चेस, त्याचबरोबर सण आणि उत्सवांतून त्याचे प्रतिबिंब समाजात उमटत असते. हे विश्‍व अनुभवणे हा अवर्णनीय आनंद देणारा क्षण असतो. राजधानी पणजीतील मळा परिसराला भेट दिल्यानंतर जुन्या काळातील गोवे कसे होते याचा प्रत्यय येतो. पोर्तुगीज शैलीतील तेथील घरे पर्यटकांना भूतकाळात रमवणारी आहेत.
देशविदेशातील पर्यटकांना माफक दरात राहण्याची सोय पर्यटन महामंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे. पर्यटन महामंडळाच्या अखत्यारीतील कळंगुट रेसिडेन्सी, मिरामार रेसिडेन्सी, कोलवा रेसिडेन्सी, पणजी रेसिडेन्सी, मये लेक रेसिडेन्सी, फर्मागुडी रेडिसेन्सी, मडगाव रेसिडेन्सी, वास्को रेसिडेन्सी, ओल्ड गोवा रेसिडेन्सी, कळंगुट (एनेक्स) रेसिडेन्सी, म्हापसा रेसिडेन्सी यांमध्ये पर्यटकांना गोव्यातील मुक्कामाच्या आठवणी ताज्या करण्याची संधी मिळते. लवकरच या रेसिडेन्सींपैकी काही रेसिडेन्सींना तारांकित स्वरूप देऊन अद्ययावत बनवले जाणार आहे. त्याचा फायदा पर्यटकांना आणि जास्त खर्च करणार्‍या व्यावसायिकांना मिळणार आहे.
किनार्‍यांवर समुद्रस्नानासाठी येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने पर्यटन खात्यामार्फत पावले उचलली आहेत. किनार्‍यांवर शौचालये आणि चेंजिंग रूम उभारून पर्यटकांना सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. किनारी पर्यटनाला जोडून पर्यटनवृद्धीस हातभार लागेल, असे अनेक उपक्रम सरकारने पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे हाती घेतले आहेत. पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच देश-विदेशातील पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
गोव्यात येणारे पर्यटक किनार्‍यांव्यतिरिक्त गोव्यातील इतर पर्यटनस्थळांकडे वळावेत यासाठी गोवा सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली दुर्लक्षित पर्यटनस्थळांचा विकास करून तिथे पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. गोव्यातील अंतर्गत भागातील पर्यटनस्थळे विकसित करून पर्यटकांना नव्या विश्‍वात घेऊन जाण्याचा प्रयत्न सरकारतर्फे सुरू आहे. नेत्रावळीतील बुडबुड्याच्या तळीचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण लवकरच केले जाणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मये तलावाच्या सुशोभीकरणालाही सुरुवात झाली आहे. अंतर्गत भागातील पर्यटनस्थळे भविष्यात पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे बनल्याशिवाय राहणार नाहीत.
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यासह नेत्रावळी आणि म्हादई अभयारण्यांतही निसर्गाचा आगळावेगळा आविष्कार पर्यटकांना अनुभवता येतो. अंत्रुज महालात खाजगी संस्थांनी उभारलेली स्पाइस फार्म पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण एन्जॉय करण्याची संधी या स्पाइस फार्ममध्ये पर्यटक साधत असतात. जंगल बुक, बटरफ्लाय पार्क पाहण्यासाठी देशविदेशी पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात.
देश-विदेशातील नवदाम्पत्यांना गोवा नेहमीच खुणावत आलेला आहे. फार पूर्वीपासून गोवा हे ‘हनिमून डेस्टिनेशन’ म्हणून सर्वत्र परिचित आहे. लग्नसराईच्या हंगामात तसेच पावसाळ्यात अनेक नवदाम्पत्ये हनिमून साजरा करण्यासाठी गोव्यात येत असतात. सरकारने पर्यटन खात्याच्या माध्यमातून जाहीर केलेल्या हनिमून पॅकेजना मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतच आहे. हनिमून पॅकेजअंतर्गत पर्यटकांना गोव्यातील पर्यटनस्थळांची सैर आणि सवलतीच्या दरात जीटीडीसीच्या रेसिडेन्सीमध्ये मुक्काम करण्याची संधी दिली जाते.
राजधानी पणजीतील मांडवी नदीतून आसपासच्या परिसराचे संध्याकाळी व रात्री विहंगम दर्शन घडवणार्‍या जलसफरी पर्यटन खात्यातर्फे आयोजित केल्या जातात. राजधानी पणजीतील सांता मोनिका धक्क्यावरून या जलसफरी आयोजित केल्या जातात. यामध्ये पर्यटक गोमंतकीय नृत्य व मनोरंजनाचा लाभ घेतात. गोवा बोट काउंटरच्या एकखिडकी योजनेद्वारे जलसफरीसाठी आरक्षण करता येते. सांता मोनिका, शांतादुर्गा, पॅराडायस, प्रिन्सेस दी गोवा, रॉयल क्रूझीस या बोटींद्वारे पर्यटकांना जलसफर घडवली जाते. पर्यटन महामंडळातर्फे सांता मोनिका बोटीवर डिनर क्रूझीसचा उपक्रम राबवला जातो. त्याला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद वाढू लागला आहे.
पर्यटन महामंडळातर्फे दररोज उत्तर गोवा व दक्षिण गोवा सहलींचे आयोजन केले जाते. उत्तर गोव्यात कोको बीच, आग्वाद किल्ला, मये तलाव, वागातोर बीच, हणजुणे बीच, कळंगुट बीच व पणजी येथील हस्तकला महामंडळाच्या संग्रहालयाला भेट दिली जाते. दक्षिण गोव्यात ओल्ड गोव्यातील चर्चेस, बॅसेलिका ऑफ बॉम जिझस, से कॅथेड्रल, आर्केऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे म्युझिअम, मंगेशी देऊळ, कवळेतील शांतादुर्गाचे मंदिर आदींची सैर घडवली जाते.
गोवा पर्यटन खात्यातर्फे पर्यटकांना विविध सेवा पुरवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. हॉट एअर बलुन्स, ऍम्फिबियस वाहने, सेगवे सहली, आलिशान यॉट सेवा, बायसीकल टूर्स, गेम फिशिंग, स्कुबा डायव्हिंग, ५ डी एंटरटेन्मेंट बॉक्स, हाउस बोट, कॅरावन टूर्स, प्लोटेल आणि क्रूझ वेसल तसेच योगा टूर्स या नवीन सेवा पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
गोवा हे ३६५ दिवस पर्यटन हंगाम असणारे पहिलेच राज्य ठरत आहे. गोव्यात पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगारही मिळालेला आहे. पर्यटन उद्योगातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल तर पर्यटकांना सुखद अनुभव मिळत असल्यामुळे गोव्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. या सर्व पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी गोमंतक नेहमीच सज्ज आहे.