अत्याचार ः गरिबी हेच कारण नव्हे!

0
110

– डॉ. मृदुला सिन्हा

महिलांचे शोषण आणि अत्याचारांच्या निराकरणासाठी बनलेल्या या संस्था समाजाच्या मनात आपल्याप्रति भीती निर्माण करण्यात असफल ठरल्या आहेत. त्यामुळे आज गरीब महिलांच्या तुलनेत खात्यापित्या घरांतील महिला आणि ऑफिसमध्ये काम करणार्‍या महिलांवरील अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराची वा शोषणाची गोष्ट समोर आली की मळकळ-कळकट कपड्यांमधील स्त्री वा पुरुषाची प्रतिमा समोर येते. तिला पाहून मनात विचार येतो की, ही व्यक्ती इतकी पराकोटीची लाचार आहे की तिच्याकडून प्रतिकाराची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. शरीर, मन आणि बुद्धीपासून निराधार होण्यामागे मुख्य कारण त्याची गरिबीच दिसते. अत्याचार आणि शोषण सहणे तिच्या जणू पाचवीलाच पूजलेले आहे. गरिबीशी तोंड देता-देता अत्याचार सहन करण्याची जणू तिला सवयच पडून गेली आहे. जशी गरिबी आणि अत्याचार एकाच उदरातून आले आहेत- जुळे भाऊ-बहीण!
परंतु वस्तुस्थिती तशी नाही. अत्याचार आणि शोषण केवळ गरिबाच्याच दारा-अंगणाची शोभा वाढवत नाही! खरं आहे की, अत्याचार करणार्‍यांसाठी कोणतंही स्थान वर्जित नाही. मग ती व्यक्ती झोपडीत राहू दे वा बंगल्यात! खरं तर अत्याचार आणि शोषण हाच जणू अत्याचार्‍यांचा धर्म बनला आहे. म्हणून तर धनधान्याने संपन्न, बुद्धिमान आणि जागृत स्त्रियांवरही अत्याचार होतात. त्यांच्याही अधिकारांचा खून केला जातो. परिस्थितीनुसार त्यांचे प्रकार वेगवेगळे असतात. क्षेत्रेही वेगवेगळे असतात.
गरीब महिलांचे जिथे शारीरिक शोषण अधिक होते, तिथे सुशिक्षित, साधन-संपन्न महिलांचेही मानसिक शोषण होते. परंतु काही वेळा गरीब महिला प्रतिकार करते; पण सधन महिलांना प्रतिकार करणे शक्य होत नाही. गरीब महिला अत्याचाराविरुद्ध पाऊल उचलत आल्या आहेत. जशा की, नवर्‍याच्या माराला कंटाळून त्या आपल्या मुलाला पाठंगुळीला मारून, काही सामानाचे गाठोडे बांधून माहेरी निघून जातात. परंतु मध्यम आणि उच्च वर्गातील महिलांना सधन घर सोडणे शक्य होत नाही. त्यामुळे विशेषतः मध्यम वर्गातील महिला शोषण आणि अत्याचार अधिक सहन करतात. आपल्या शोषणाची गोष्ट त्या लागलीच जगजाहीर करीत नाहीत. स्वतः अत्याचार सहन करतात, दुसर्‍यांना सांगून आपल्यावरील अन्यायाची दवंडी पिटवत नाहीत. त्यामुळे शोधण करणार्‍यांना अधिकच चेव चढतो.
याचाच अर्थ असा की, गरिबी आपल्यासाठी शाप आहे, ती शोषणास आमंत्रण देते. परंतु केवळ हाच शोषणास आमंत्रण देत नाही. धनधान्यसंपन्न स्त्रियांना पाहून गरीब स्त्री विचार करते की, ती किती सुखी आहे! त्यांच्या नशिबाचा ती हेवा करते. परंतु त्यांच्या मनाचा ठाव घेतला तर कळून येईल की, गरीब महिलांपेक्षा या सधन महिला कितीतरी दुःखी आहेत.
शोषणपीडित महिलांचं दुःख या शब्दांतून प्रकट होतं- ‘‘या जगण्यापेक्षा मी कोण्या मजुराच्या घरात जन्म घेतला असता तर किती चांगलं झालं असतं.’’
आर्थिकदृष्ट्या मागास वा दारिद्य्ररेषेखालील महिलांमध्ये आपसी मेळजोळ अधिक असतो. त्या एकदुसर्‍याच्या दुःखात सहभागी होतात. त्यामुळे त्यांना शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. त्या स्त्रियांच्या सामूहिक शक्तीची अत्याचार्‍यांना थोडी भीतीही असते. विभिन्न जातींची आपली अशी एक संघटना असते. त्या महिलांवर होणार्‍या अत्याचाराबाबत त्या पंचायतही बसवतात. आवश्यक नाही की ही जातीय पंचायत महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधातच आपला निकाल देईल. परंतु दबाव तर असतोच असतो.
सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांवरील समाजाचा दबाव कमी होत चालला आहे. त्यामुळे व्यक्ती आणि कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा यांसारखी जीवन-मूल्ये आज राहिलेली नाहीत. त्यामुळे या घरांमधील महिलांवर होणार्‍या अत्याचाराची संख्या वाढत गेली आहे.
या स्त्रिया महिला आयोग, पोलीस स्टेशन वा न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. परंतु या संस्थांकडून दोषी व्यक्तीला म्हणावी तशी शिक्षा होताना दिसत नाही. निकाल देण्यासही खूप विलंब होतो. महिलांचे शोषण आणि अत्याचारांच्या निराकरणासाठी बनलेल्या या संस्था समाजाच्या मनात आपल्याप्रति भीती निर्माण करण्यात असफल ठरल्या आहेत.
त्यामुळे आज गरीब महिलांच्या तुलनेत खात्यापित्या घरांतील महिला आणि ऑफिसमध्ये काम करणार्‍या महिलांवरील अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
या महिलांना कायद्याची माहिती आहे. परंतु केवळ कायद्याची माहिती असूनही चालत नाही. समाजाची भीती असणे गरजेचे आहे. काही शोषणाची प्रकरणे या दबावामुळेच कमी होऊ शकतात.