मातृभाव भक्ती जागृत करणारे संत साहित्य संमेलन

0
366

– पौर्णिमा केरकर

मराठी संतवाणीचा महागजर ज्याला संबोधावे लागेल, असे हे संत सोहिरोबानाथ साहित्य संमेलन म्हणजे संतांचे वाड:मय, व्यक्तित्व आणि कार्य यांचे मंथन करून अभ्यासकांना आणि उपासकांना नवी दृष्टी आणि दिशा देणारे एक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जागरण असेच म्हणावे लागले…

गोमंतकात दीर्घकाळापासून मराठी वाचले, लिहिले जाते. त्याचाच एक स्वतंत्र साहित्येतिहास लिहिला जाऊ शकेल. इथे अनेक मराठी वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांचीही कामगिरी लक्षणीय आहे. पोर्तुगीज काळात एक प्रकारच्या तिमिर युगातही गोमंतकीय मराठी साहित्यिकांनी प्रकाशाच्या दिशेने पावले टाकली होती. १९६० नंतर स्वातंत्र्य युगात देशाशी एकरूप होत त्यांनी मोकळेपणाने सृजन सुरू केले. औद्योगिकरण आधुनिक शिक्षण, सर्वांगीण विकास यांची कास धरून स्वतंत्र निर्मिती केली. चांगली कथा-कविता निर्माण झाली. मराठी वृत्तपत्रे अनेक आली. आत्मविष्काराला चांगले साधन मिळाले. वैचारिक आणि निबंधात्मक लेखन समीक्षा वाढली.’ असे डॉ. अशोक कामत यांनी – गोवा मराठी अकादमी आयोजित संत सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने बोलताना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात ‘गोमंतकीय साहित्य संस्कृती, इथले साहित्यिक’ याविषयी गौरवोद्गार काढले. शनिवार दि. २५ मार्च व रविवार दि. २६ मार्च २०१७ या दोन दिवसात श्री देवकीकृष्ण सभागृह माशेल-गोवा येथे आयोजित केलेल्या या संमेलनास स्थानिक व इतर साहित्यिक, विद्यार्थिवर्ग, रसिक, संत साहित्याविषयी मनस्वी आवड असलेल्या अभ्यासकांची उपस्थिती उत्साही आणि लक्षणीय अशीच होती. एकूणच व्यासपीठ आणि आजूबाजूचा सारा मंदिरमय परिसर ही पार्श्‍वभूमी या संमेलनाला लाभल्यामुळे संमेलनास सहभागी झालेल्यांना चैतन्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.
संत ज्ञानेश्‍वर, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत रामदास आणि संत सोहिरोबानाथ अशा एकूण पाच संतांच्या लेखन, विचार, आचार, त्यांचे जीवन व कार्य या विषयीचा अभ्यासपूर्ण व तत्वचिंतनात्मक ऊहापोह या निमित्ताने संत साहित्यसंमेलनात झाला. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत सर यांची कल्पकता त्याला डॉ. अशोक कामत, प्राचार्य गोपाळराव मयेकर सरांचे लाभलेले मार्गदर्शन, सर्व सदस्य, कर्मचारी वर्ग, स्थानिकांचे लाभलेले सहकार्य – संत साहित्याची अभिरुची असलेला रसिकवर्ग, विद्यार्थी, भजनीकलाकार अशी सर्वांची सात्त्विक उपस्थिती ही या संमेलनाची जमेची बाजू होती. महाशालेच्या मंगल परिसरात मराठी संतवाणीचा महागजर ज्याला संबोधावे लागेल असे हे संत सोहिरोबानाथ साहित्य संमेलन म्हणजे संतांचे वाड:मय, व्यक्तित्व आणि कार्य यांचे मंथन करून अभ्यासकांना आणि उपासकांना नवी दृष्टी आणि दिशा देणारे एक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जागरण असेच म्हणावे लागले. या जागरणात विचार मंथन करण्यासाठी तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तींना ज्यांनी आपले आयुष्यच मुळी या संतांच्या अध्यासनात, अभ्यासात खर्ची घातले, अशी अभ्यासू ऋषितुल्य व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. अशोक कामत हे तर या संमेलनाचे अध्यक्ष होते. शिवाय ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या संत नामदेवावरील परिसंवादाचे ते अध्यक्षही होते. पाच संत मंडळींच्या जीवन, कार्य, साहित्याचा वेध घेण्याच्या दृष्टीने पाच परिसंवादाची सत्रे त्यांना नावीन्यपूर्ण शीर्षकात गुंफून आयोजित करण्यात आली होती त्यात ‘ज्ञानदेवे रचिला पाया, अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे,’ लोकनाथ – एकनाथ, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ ‘तुकाआकाशाएवढा’ या सत्रांनी सहभागी वक्ते – डॉ. म. अ. कुलकर्णी, प्राचार्य गोपाळराव मयेकर, डॉ. धों. दो. कुंभार, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, पौर्णिमा केरकर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सतीश बडवे, सुनील चिंचोलकर, आनंद मयेकर, चंद्रकांत गावस, डॉ. अशोक कामत, डॉ. ल. का. मोहरीर, डॉ. शिवाजीराव भुकेले वगैरे अभ्यासकांनी सहभाग दर्शवून हे परिसंवाद अभ्यासपूर्ण-वैचारिक, सांस्कृतिक तत्वचिंतनात्मक विवेचन करून वातावरणात सोज्वळ सात्त्विक भाव निर्माण करण्याबरोबरीनेच वैचारिक दृष्टी बहाल केली. सत्रांची सुरुवात होण्यापूर्वी गोमंतकीय भजनीकलाकारांची मैफल हे या संमेलनाचे वेगळेपण होते. हे संत साहित्य संमेलन आहे याची प्रचिती क्षणोक्षणी जागती राहिली.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, प्रमुख अतिथी प्राचार्य गोपाळराव मयेकर, विशेष अतिथी गिरीश धारवाटकर, गोवा अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, सदस्य सचिव शशांक ठाकूर, उपाध्यक्ष पुष्पाग्रज, सदस्य परेश प्रभू, सागर जावडेकर इतर मान्यवरांची मांदियाळी होती. ‘मराठीची शान, तिचे गुणगान, संस्कृती रुजविण्याचे काम गोवा मराठी अकादमीने करावे. गोव्यातील मातीला स्वत:चा वास आहे. तिचा स्वत:चा असा खास सुगंध आहे. त्याला असाच बहरू द्यायचा ते काम मराठी अकादमीने करावे, त्यासाठी आपले सदैव सहकार्य असेल, असे उद्गार उद्घाटन प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणातून माननीय कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काढले. माशेल परिसर हा गोव्यातील मंदिरांचा प्रदेश आहे. आणि ज्या देवकीकृष्ण सभागृहात हे संमेलन घडून येत आहे तो मातृभाव भक्ती जागृत करणारा योग आहे. ‘माता आणि मूल’ यांचे एकत्रित मंदिर असणे ही खूप दुर्मिळ घटना या पार्श्‍वभूमीवरील हे संमेलन विद्यार्थी, तरुणमनांना अनुभव देणारे ठरेल, असे कामत म्हणाले. आपले ‘माशेल गावाशी पूर्वापार नाते जुळलेले असून असंख्य आठवणी या गावाशी निगडीत आहेत, असे म्हणून उपासक आणि अभ्यासकांना दृष्टी मिळावी म्हणून ज्ञानाची सावली देणारी माऊली मला भावली, असे सांगताना या माशेलच्या अनेक आठवणी त्यांनी जागवल्या. इतर संतांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी ती सोहिरोबानाथांना मिळाली नाही. किंबहुना त्यांचे मराठीपणच दडवण्यात आले ही खंत प्राचार्य मयेकरांनी व्यक्त केली. २६ मार्चला सरांचा वाढदिवस. त्या निमित्ताने गोवा मराठी अकादमीने त्यांचा केलेला सन्मान हे सर्व उपस्थितांसाठी ‘मैत्रजीवांचे’ ठरले. ज्ञानेश्‍वरीवर आयोजित केलेल्या परिसंवादात तर आपल्या ओघवत्या रसाळ वाणीने त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. ज्याच्यामध्ये संपूर्ण वृक्ष आपल्या विस्तारासकट सामावलेला असतो ते बीज असते. निसर्गकवितेचा पाया ज्ञानेश्‍वरांनी घातलेला आहे. त्यांना फुलांचे डोळे दिसले. सुगंधित जळांनी फुलांचे डोळे भिजवत हा वसंत येतो. त्यावेळी ‘जळी चंद्रिकेच्या पसरती वेली.’ अशी अवस्था असते. ते पुढे म्हणाले की तर्काच्या आधाराने चित्र रेखाटले तर त्याला काही अर्थ नसतो. ज्ञानेश्‍वर त्यासाठी उदाहरण देतात मासा पकडण्यासाठी पाण्यात जाळे फेकले जाते, परंतु त्याच्यात माशांऐवजी चंद्रबिंबच सापडते त्यामुळे त्याला कठावर आणले असता जाळे उसवून वाकून बघितले तर ते हाती गवसणार नाही. जग हे नावीन्याने भरलेले आहे. एकूणच संत ज्ञानेश्‍वर हे विश्‍ववाड:मयातील महान चमत्कार आहेत, असे निरूपण मयेकरांनी करून श्रोत्यांना खिळवून ठेवले.
संत नामदेवावरती व एकूणच संत साहित्यावर ज्यांचा सखोल व्यासंग आहे ते डॉ. अशोक कामत यांनी अनेक उदाहरणांसहित संत साहित्य व संत नामदेव यांचे मौलिक कार्य आपल्या ओघवत्या वाणीतून अभ्यासपूर्ण तत्वचिंतनात्मक विवेचन करून अवघे वातावरणच संतमय करून टाकले. संत म्हणजेच शांतपणाने समाज संस्कृतीचा विचार आचरणारा, उपचार करणारा – चांगला विचार रुजविणारा, जी माणसे आचारवंत असतात. तीच विचारवंत असतात. त्याचप्रमाणे जो उत्तम प्रवास करतो, लोकांत मिसळतो तो मनुष्य उत्तम साहित्य निर्माण करू शकतो. संत हे असेच होते. संत नामदेवांच्या ध्यासाने झपाटलेले डॉ. कामत यांनी तर त्यांचा अवघा जीवनपटच उलगडिला. व त्यांच्या एकूण कार्याचा, अभ्यासाचा व्यासंग यानिमित्ताने गोवेकरांना झाला. ही संत साहित्य संमेलनाची मोठी देणगी होती.
‘शिंपीयाच्या कुळी जन्म माझा झाला
तरी जीव गुंतला सदाशिवी’
अशा या भाववेड्या संतांचा प्रवास त्यांनी सहजपणाने उलगडिला. सुनील चिंचोळकरांनी समर्थ रामदास उभे केले. या संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे डॉ. रामचंद्र देसणे यांचे नाथांचे भारूड.
जीव शीव दोन सुंटे, प्रपंचाचे नेटे
सासू आणि सासरा, दीर हा तिसरा
असे म्हणत आपण परमात्म्याच्या दर्शनाला जावे ते – ज्ञानदर्शन तर परमात्म्याला आपल्या दर्शनाला आणावे हे – भावदर्शन, असे उद्गार काढीत नाथांचा भारूड गवळणीचा प्रवास उलगडून दाखविला. रसिकांसाठी ते भावदर्शनच होते. स्थानिक गायक कलाकार दशरथ नाईक व शिवानंद दाभोलकर यांची मैफल रंगली, त्यानंतर झालेल्या सुरेश बापटांच्या सुश्राव्य सहज सुंदर उत्कट, भावस्पर्शी गायनाने कैवल्याचे चांदणे मांदियाळीत स्थिरावल्याचा भास झाला. अवघे वातावरणच भावभक्तीने व्यापून गेले.
खरे तर जे पाच संत या संमेलनाच्या एकूणच मध्यवर्ती होते त्या एकेका संतावर जरी दोन दोन दिवसांची संमेलने घेतली असती तरीही ती अपुरी पडली असती. ज्यांनी आपले आयुष्यच या संतमंळडींच्या जीवन कार्याचा शोध-वेध घेण्यासाठी खर्ची घातले त्या मान्यवर वक्त्यांसाठी एक तासाचा अवधी हा तसा अपुराच होता. तरीसुद्धा –
‘जे जे आपणासी ठावे, ते इतरांशी द्यावे.
शहाणे करूनी सोडावे सकळजन.’
या वृत्तीने अभ्यासकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. शिवाय दर्दी-अभ्यासू-श्रोत्याने आपला दिलेला वेळ हा संमेलनाची जमेेजी बाजू होती. काही गोष्टी अनुभवातून शिकता येतात. जे चांगले आहे त्याचा स्वीकार करीत पुढची वाटचाल करायची ही आपली संस्कृती आहे. दिलीप धारवाटकर व त्यांच्या साथीदारांचे सहकार्य असो की माशेलवासीय, साहित्य सहवास, शाळा, कॉलेज, उच्चमाध्यमिक चे विद्यार्थी शिक्षक हे सगळेच घटक इथे महत्त्वाचे आहेत. अकादमीचे अध्यक्ष सामंत सरांची सर्व भाषींकडे पाहण्याची सामंज्यस्याची भूमिका ही समाजात संवेदनशीलता निर्माण करणारी आहे. युवा पिढी हा आशावाद समोर ठेवून कोणताही भाषिक वाद इथे ही अकादमी निर्माण करणार नाही तर अंतःकरणात ज्ञानज्योत सदैव तेवती ठेवण्याचाच प्रयत्न असेल. संत सोहिरोबानाथांची स्मृती त्यांचे कार्य इथल्या युवावर्गात पोहोचून नेहमीच सकारात्मक काम करण्यातच अकादमी आपले उपक्रम राबविल. त्याशिवाय नुसतेच उत्सवी खूपच गर्दी असलेले कार्यक्रम करण्यापेक्षा काहीतरी विधायक या मातीत ‘मुळे’ घट्ट रोवून आकाशाला गवसणी घालू पाहणारी सृजनशील मने निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल, अशी आश्‍वासकता व्यक्त करताना सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली. तरुणाईचे प्रतिनिधित्व करणार मंडळी – सोमनाथ पिळगावकर, प्रेमानंद नाईक, प्राची जोशी, सुवर्णा खेडेकर, सुनेषा कलंगुटकर, हर्षदा भिडे, वैभव केळकर, गजानन मांद्रेकर, सौ. मोघे इत्यादींनी विविध सत्रांची जबाबदारी पेलून कार्यक्रमातील सुसूत्रता अबाधित ठेवली.
ज्ञानेशाची – अमृतवाणी, नामदेवाची – सगुण भक्ती, लोककवी – तुकाराम, सकलांना शहाणे करून सोडणारे – समर्थ रामदास आणि विवेकाचा आत्मदीप तेजाळत ठेवणारे सोहिरोबा-लोकनाथ-एकनाथ या सर्वांच्या कार्याचे विचारमंथन या संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झाले. संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या कार्यकर्तृत्वाचे पडसाद या निमित्तने इथल्या युवापिढीला जाणवले. लोकांना ऐकणे आवडते म्हणूनच संतांनी लोकमानसाशी आपल्या अभंग ओवीतून, ग्रंथातून संवाद साधला. सोहिरोबांनी केवळ विचार मांडले नाहीत तर समाजाला दिशादर्शक अशी क्रांतिकारी कृती सुद्धा केलेली आहे. उत्तरेतील त्यांची भ्रमंती, त्यांचे परखड विचार, कृतिशील आचरण-भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या जीवन मूल्यांची शिकवण, त्यातून ज्ञानज्योत ही विवेकरूपी ओल कायम स्वरूपी या भूमीत रुजवली आहे. गोवा मराठी अकादमी आयोजित या संत साहित्यामुळे तिचा बहर या निमित्ताने मनामनात दरवळला हीच याची फलश्रुती. मानवी मूल्ये जेव्हा पायदळी तुडवली जातात, अनैतिकतेशी जवळीक करून समाज जेव्हा अधर्माच्या पातळीवर वाटचाल करतो तेव्हा संतांनीच प्राप्त परिस्थितीला सद्धर्माची प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. संताची भूमिका आध्यात्मिक जरी असली तरी त्यांनी केलेले समाजसुधारणेचे काम हे फार मोठे नैतिक स्वरूपाचे आहे. त्यासाठी समग्रता, समन्वय आणि सामरस्य यांची अनुभूती घेणे हाच जीवनसाफल्याचा अर्थ संतांनी समाजमनाला पटवून दिलेला आहे. प्रस्तुत संमेलनाच्या निमित्ताने त्यावर विचारमंथन घडले ही विचारज्योत प्रत्येकाच्याच अंत:करणातील ‘ज्ञानदिवा’ ठरायचा अनुभव प्राप्त करणारी ठरो.