कूळ-मुंडकार कायद्यात दुरुस्ती होणार

0
145

>> अभिभाषणात राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची ग्वाही

राज्यातील कुळांना न्याय देण्यासाठी कूळ आणि मुंडकार कायद्यात पूर्ववत दुरुस्ती आणण्याचे आश्‍वासन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आपल्या अभिभाषणात दिले. २०१९ पर्यंत स्वच्छता अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला शौचालय उपलब्ध करून सन २०१९ पर्यंत गोवा खुल्या जागेतील शौचापासून मुक्त करण्यात येईल असे त्या म्हणाल्या.
‘गोंयकारपण’ हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. ते जतन व्हावे, हा सूर व्यक्त करून वेगवेगळे राजकीय पक्ष आणि अपक्ष आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ‘गोंयकारपण’ टिकवून ठेवणे हे सरकारचे प्रमुख ध्येय असून नियमित पाणी व वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
राज्यातील सर्वधर्मसमभावाचा धागा टिकवून ठेवणे, उच्च दर्जाचे शिक्षण देऊन व्यक्तिमत्व विकास व प्रशासन घराघरांपर्यंत पोचविणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यासाठी सरकार अविरतपणे प्रयत्न करणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राजधानी शहरातील मांडवी पुलाच्या कामात प्रगती असून चालू वर्षातच हा पूल पूर्ण करण्यात येईल. जुवारी नदीवरील आधुनिक पूल प्रकल्पाचे कामही सुरू आहे. आरोग्य, शिक्षण आदी सर्व क्षेत्रांतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आतापर्यंत ४ हजार ६२३ कोटी रुपये गुंतवणुकीच्या ८२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातून रोजगाराच्या १२ हजार संधी निर्माण होतील. राज्यातील शिक्षित युवकांना योग्य दर्जाचा रोजगार मिळवून देण्याचे आश्‍वासनही राज्यपालांनी दिले. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देणे हे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ४०० रुपये देण्याच्या योजनेखाली आतापर्यंत ३ कोटी ६ लाख रुपये वितरित केले आहेत. राज्यातील १२७ शाळांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
खाण व्यवसाय हा राज्याचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरळीत व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील. कृषी क्षेत्रावरही आपले सरकार लक्ष केंद्रीत करीत असून २०२२ पर्यंत या क्षेत्रातील उत्पादनात वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले. दूध उत्पादनातही राज्य स्वयंपूर्ण बनविण्यासाठी योजना राबविल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात सामाजिक व आर्थिक समानता आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगून सरकारने राबवलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, लाडली लक्ष्मी या योजनांची त्यांनी माहिती दिली. प्रत्येकाला घर असले पाहिजे या स्वप्नाची पूर्तता केली जाईल, असेही आश्‍वसनही राज्यपालांनी दिले. महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शकता हे सरकारचे वैशिष्ट्य असेल, असेही त्या म्हणाल्या.

राज्यपालांच्या अभिभाषणावर
विरोधी आमदारांचा बहिष्कार
कॉंग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असतानाही राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस विधीमंडळ नेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व म्हणजे १६ विरोधी आमदारांनी काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी मात्र त्यात भाग घेतला नाही.
काल कॉंग्रेसचे सर्व आमदार राज्यपालांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती बांधून सभागृहात आले होते. राज्यपाल सिन्हा यांनी अभिभाषण सुरू करताच विरोधी नेते कवळेकर उठले व हरकत घेऊन राज्यपालांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक असतानाही सरकार स्थापन करण्याची संधी न दिल्याचा त्यांनी आरोप केला व कॉंग्रेसच्या सर्व विरोधी आमदारांनी गोंधळ घालत सभात्याग केला.