सावईवेरे येथे रेतीवाहू ट्रकने दहावीच्या विद्यार्थ्याला चिरडल

0
97

मांद्रे, पेडणे येथे भरधाव चिरेवाहू ट्रकने एका युवकाला चिरडण्याची दुर्घटना ताजी असताना सावईवेरे येथील धोकादायक वळणावर काल संध्याकाळी ५.३० वा. सुमारास रेतीवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने यश अशोक शिरोडकर (वय १६) हा सावईवेरे येथील युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला मदन रामदास गावडे (१६, खेडे – सावईवेरे) हा जखमी झाला असून त्याच्यावर बेतकी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मृत यश व जखमी मदन हे दोघेही दहावीचे विद्यार्थी आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए-०५-ए-२०८४ क्रमांकाची फ्रिडम मोटरसायकल घेऊन यश व मदन दोघेही खेडे येथे जात होते. सावईवेरे येथील धोकादायक वळणावर ते पोचले असता सुसाट वेगाने फोंड्याच्या दिशेने जाणार्‍या जीए-०९-यू-४११५ क्रमांकाच्या रेतीवाहू ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीसह यश शिरोडकरला सुमारे मीटर अंतरावर ट्रकाने फरफटत ओढून नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला.
यश शिरोडकर हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा असून यंदा फोंड्यातील आल्मेदा हायस्कुलात दहावीच्या वर्गात शिकत होता. तर जखमी मदन सावईवेरे येथील सरकारी हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत आहे.
फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी पंचनामा केला.