वाचस्पती

0
104

गोविंदराव तळवलकर गेले. अभिजात, सुसंस्कृत, सुबुद्ध पत्रकारितेेचे एक पर्व संपले. भारताच्या स्वातंत्र्याचे आणि स्वातंत्र्योत्तर वाटचालीचे एक सजग साक्षीदार, पत्रकारितेमधील अस्तंगत होत चाललेल्या प्रबोधनाच्या परंपरेचे एक पाईक, जागतिक घडामोडींवर सतत नजर असलेले व्यासंगी विचारवंत अशा अनेक रूपांमध्ये तळवलकर सुसंस्कृत, मध्यमवर्गीय मराठी वाचकमनावर दीर्घकाळ अधिराज्य करून गेले. महाराष्ट्र टाइम्समधील २७ वर्षांच्या झगमगत्या संपादकीय कारकिर्दीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सारे मनोज्ञ पैलू सदैव उजळत तर राहिलेच, परंतु निवृत्तीनंतरही अमेरिकेतून एतद्देशियांचे वैचारिक भरण – पोषण अगदी अलीकडेपर्यंत स्तंभलेखनाद्वारे ते करीत होते. त्यांच्या लेखणीने वाचकांना सदैव अभिजात वाचनानंद दिला; मग ते परखड अग्रलेख असोत, स्थानिक वा जागतिक घडामोडींवरील भाष्य असो वा विद्वत्तापूर्ण ग्रंथसमीक्षणे असोत, तळवलकर ही जणू एक अस्सल नाममुद्रा होती, ब्रँडिंगचा बोलबाला नसलेल्या काळातही या ‘ब्रँड’चा दरारा आणि दबदबा सर्वदूर पसरला होता. तळवलकरांचे उत्तराधिकारी कुमार केतकर यांनी एकदा त्यांचे ‘‘सुसंस्कृत, कलासक्त, उच्चभ्रू, प्रतिष्ठित, बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांचा आयडी’’ असे एका वाक्यात अतिशय चपखल वर्णन केले होते. ‘आम्ही तळवलकरांचे अग्रलेख वाचतो’ ही वाचकांसाठी प्रतिष्ठेची बाब होती. ती त्यांच्या अभिजाततेची निशाणी मानली जात असे. अर्थात, ही तळवलकरांच्या व्यासंगाची, विद्वत्तेची आणि तळपत्या लेखणीची पुण्याई होती. वैचारिक स्पष्टता आणि टोकदार भाष्य यामुळे त्यांचे अनेक अग्रलेख प्रचंड गाजले. त्यातून उलथापालथी घडल्या. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना प्रभा राव राज्यमंत्री होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पतीही मंत्रालयात ठाण मांडून असायचे. त्यावर तळवलकरांनी ‘मंत्रालयातील मेहूण’ हा घणाघाती अग्रलेख लिहिला होता. किंवा अकलूजच्या शंकरराव मोहित्यांनी आपले पुत्र विजयसिंह मोहिते यांच्या विवाहाचा प्रचंड डामडौल केला, तेव्हा त्यावर ‘समाजवादी लक्षभोजन’ असा अग्रलेख लिहून तळवलकरांनी खळबळ माजवली होती. असे थेट, परखड लिहिणारे तळवलकर जेव्हा उत्तमोत्तम इंग्रजी ग्रंथांवर ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहित असत, तेव्हा त्यांचे एक वेगळेच रूप वाचकांना दिसत असे. त्यांचे ग्रंथप्रेम विलक्षण होते. माणसांपेक्षा ते ग्रंथांच्या दुनियेत अधिक रमले. ग्रंथप्रेमींशी त्यांचे गणगोत सहजपणे जुळत असे. गदिमांनी तळवलकरांचे वर्णन ‘ज्ञानगुणसागर’ असे केले होते. जागतिक घडामोडींचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. सोव्हिएत रशियाचा उदय आणि अस्त त्यांनी मराठी वाचकांना समजावून दिला, तशी अरब जगतातील, युरोप, अमेरिकेतील स्थित्यंतरेही सांगितली. अगदी अलीकडे वयाच्या नव्वदीत अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अन्वयार्थ त्यांनी लेखांतून मांडला होता. नवख्या पत्रकारांना बदलते जग समजून घ्यायचे असेल तर जागतिक इतिहासाचे जाणकार असलेल्या तळवलकरांची ‘भारत आणि जग’ सारखी ग्रंथसंपदा वाचावीच लागेल. त्यांची पत्रकारितेतील प्रारंभिक जडणघडण पत्रमहर्षी द्वा. भ. कर्णिक यांच्या साक्षीने झाली. (कर्णिक नवप्रभेचे पहिले संपादक होते) त्यांच्या रॉयवादाचा प्रभाव तळवलकरांवरही पडला. पं. जवाहरलाल नेहरू हे त्यांचे श्रद्धास्थान होते. आपल्या पुढील संपादकीय वाटचालीत डाव्या – उजव्या विचारधारांच्या मर्यादांवर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. धार्मिक उन्मादाविरुद्ध लिहिले. सांस्कृतिक राष्ट्रवादातून हुकूमशाही प्रवृत्ती बळावेल, त्यामुळे त्याविरुद्ध खबरदारी घ्यावी लागेल असे भाकीत त्यांनी पूर्वीच केले होते. ब्रिटीश सभ्यता, अमेरिकी सजगता आणि भारतीय संवेदनशीलता जोपासणार्‍या या थोर पत्रकाराचा वारसा पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजची मराठी पत्रकारिता करील काय?