अर्थसंकल्प लोकाभिमुख असेल : पर्रीकर

0
190

राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यास कमी वेळ मिळाला. त्यामुळे सर्वच गोष्टींचा त्यात समावेश करणे शक्य झालेले नाही. घाईगडबडीत अर्थसंकल्प तयार करावा लागला असला तरी जनतेला लाभ होईल अशा पद्धतीचाच यंदाचा अर्थसंकल्प असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.
सर्वसामान्य जनतेवर करांचा भार अधिक पडणार नाही, याची आपल्या सरकारने काळजी घेतली आहे. राज्याच्या विकासावर सरकारने भर दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सरकारचे प्रत्येक गोष्टीचे वेळापत्रक ठरलेले असते. त्यानुसार सर्व कार्यक्रम होत असतात. सभापतीची निवड झाली. आज राज्यपालांचे अभिभाषण होईल. त्यानंतर उद्या दि. २४ रोजी अर्थसंकल्प मांडून तो संमत केला जाईल. त्यानंतर विकासकामे जोरात सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तारही योग्यवेळी होईल. त्यासाठी कुणीही काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक घटकाला विश्‍वासात घेऊनच सरकार निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

कायदा सुव्यवस्थेचा आढावा
कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगून गुन्हेगारांच्या बाबतीत सरकार गंभीर असून त्यांना अभय मिळणार नाही. महिलांवर अत्याचार करणार्‍यांची सरकार गय करणार नाही असे पर्रीकर यांनी सांगितले. रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघात होतात असे सांगून ती हटविणार असल्याचे ते म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार योग्यवेळी
मंत्रिमंडळाचा विस्तारही योग्यवेळी होईल. त्यासाठी कुणीही काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक घटकाला विश्‍वासात घेऊनच सरकार निर्णय घेते.