ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत गोविंद तळवलकर यांचे निधन

0
71

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे काल अमेरिकेत निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी २७ वर्षे काम पाहिले. त्या काळात व त्यानंतरही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भाष्यकार म्हणून त्यांनी वाचकांवर आपला ठसा उमटवला. त्यांची सुमारे २५ पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
२२ जुलै १९२५ रोजी डोंबिवली, मुंबई येथे जन्मलेल्या तळवलकरांनी १९४७ साली बी. ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या ‘नवभारत’ नियतकालिकातून आपल्या पत्रकारितेचा प्रारंभ केला. १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तेचे उपसंपादक होते. १९६२ मध्ये त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये सहसंपादक म्हणून स्थान मिळाले. १९६८ मध्ये ते त्या दैनिकाचे संपादक झाले. पुढे १९९६ पर्यंत म्हणजे तब्बल २७ वर्षे ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक राहिले. अनेक इंग्रजी नियतकालिकांतूनही त्यांनी सातत्याने लेखन केले. अग्निकांड, अभिजात, अक्षय, इराक दहन, बदलता युरोप, वाचता वाचता, सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त, भारत आणि जग, बदलता युरोप अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.