फोंड्यातील बेपत्ता बिल्डर अनमोड घाटात सापडले

0
68

>> अज्ञातांनी अपहरण केल्याची जबानी

मंगेशी येथून रविवारपासून बेपत्ता असलेले गोपाळ नाईक हे बिल्डर अनमोड घाटात सोमवारी रात्री सापडले. फोंडा पोलिसांनी त्यांना तेथून आणल्यानंतर उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. दरम्यान, आपल्या तोंडावर कपडा बांधून अज्ञातांनी अपहरण करून जंगलात सोडल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र, त्याचे अपहरण कोणी केले असा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला असून याप्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. फोंडा शहरात मात्र अपहरणाचे नाट्य केल्याची चर्चा सुरू आहे.
रविवारी सकाळी मंगेशी येथून गोपाळ नाईक बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी तिलोत्तमा नाईक यांनी फोंडा पोलिसात दिली होती. सोमवारी संध्याकाळी सुमारे ५० पोलिसांनी तो बेपत्रा झालेल्या परिसरात शोध घेतला होता. मात्र, रात्री उशिरा अनमोड येथे तो असल्याचे कळताच फोंडा पोलिसांनी तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
अज्ञातांनी अपहरण करून जंगलात सोडल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र यात किती तथ्य आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, मंगेशी ग्रामस्थांनी गोपाळ नाईक यांनी बेपत्ता होण्याचे नाटक करून ग्रामस्थांना सतावण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. यापूर्वी कित्येक वेळा गायब होण्याचे प्रकार त्यांनी केले होते असे ग्रामस्थांनी सांगितले.
यासंबंधी वेलिंग प्रियोळचे सरपंच दामोदर नाईक यांनी गोपाळ नाईक यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे सांगून एका ज्येष्ठ राजकीय नेत्याच्या दबावामुळे पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.