राज्य निवडणूक अधिकार्‍यांहस्ते नवप्रभाच्या अग्रलेखास पुरस्कार प्रदान

0
87

मतदार जागृतीसंदर्भात दिलेल्या योगदानासाठी विविध प्रसारमाध्यमांना राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरण काल पणजीत मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयातील परिषदगृहात करण्यात आले. अग्रलेख व बातमी या दोन गटांमध्ये दैनिक नवप्रभाला यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांच्या हस्ते व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. नारायण नावती यांच्या उपस्थितीत दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांनी हे पुरस्कार स्वीकारले. आयोगाचे माध्यम अधिकारी जॉन आगियार व सहायक माहिती अधिकारी किरण मुणणकर हेही यावेळी उपस्थित होते.
मतदार जागृती व नैतिक मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात नवप्रभाला अग्रलेखासाठी तसेच वार्तांकनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर लेख, बातमी व छायाचित्र गटात गोमन्तक टाइम्सने व इलेक्ट्रॉनिक माध्यम गटात इन गोवा दूरचित्रवाणी वाहिनीला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. गोमन्तक टाइम्सच्या वतीने संपादक श्री. शाश्‍वत गुप्ता रे व त्यांच्या सहकार्‍यांनी, तर इन गोवाच्या वतीने यती अनिल लाड व अक्षय अनिल लाड यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
यावेळी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांनी मतदार जागृतीसंदर्भात विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. माध्यमांच्या या योगदानामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात मतदान होऊ शकले याचा त्यांनी उल्लेख केला. सजग लोकशाहीसाठी माध्यमांचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. नारायण नावती यांचीही उपस्थिती होती. पुरस्कार विजेत्यांच्या वतीने शाश्‍वत गुप्ता रे यांनी मनोगत व्यक्त केले.
निवडणूक आयोगाचे माध्यम अधिकारी जॉन आगियार यांनी आभार मानले.