हातमिळवणी

0
106

रिलायन्स जिओने हादरवलेल्या दूरंसचार क्षेत्रामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. आयडिया आणि वोडाफोन या दोन बड्या दूरसंचार कंपन्यांचे काल जाहीर झालेले एकत्रीकरण ही याचीच एक परिणती आहे. यापूर्वी एअरटेलने टेलिनॉरशी हातमिळवणी केली होती, त्याच प्रकारे आयडिया व वोडाफोन या एकत्र येऊन एका नव्या तगड्या स्पर्धकाला जन्म देण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांची भारतातील प्रचंड ग्राहकसंख्या आणि उलाढाल लक्षात घेतली तर एकत्रीकरणानंतर जी नवी कंपनी अस्तित्वात येईल, ती देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी बनेल हे उघड आहे. दूरसंचार क्षेत्रातील महसुली बाजारपेठेचा जवळजवळ ४३ टक्के वाटा या कंपनीपाशी येईल. देशातील जवळपास चाळीस टक्के सक्रिय ग्राहक तिला मिळतील आणि महसूल ऐंशी हजार कोटींवर जाईल. रिलायन्ससारख्या बड्या स्पर्धकाशी झुंज देण्यासाठी अशा प्रकारचे एकत्रीकरण या कंपन्यांसाठी आवश्यक ठरले होते. रिलायन्सने आपले जिओ बाजारात उतरवल्यापासून मोफत डेटाची जी खिरापत गेले वर्षभर वाटली, त्यातून इतर दूरसंचार कंपन्या गाळात गेल्या. गेल्या तिमाहीत एअरटेलने आपला सर्वाधिक तोटा नोंदवला, तर आयडियासारखी कंपनीही प्रथमच तोट्यात गेली. रिलायन्सने आपल्या जिओ ग्राहकांसाठी ‘प्राईम’ ही नवी योजना जाहीर केली आहे ज्यामुळे येत्या एक एप्रिलपासून पुन्हा एक वर्षभर मोफत व्हॉईस व डेटा कॉल देण्यात येणार आहेत. म्हणजे इतर स्पर्धकांच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतावरच जिओने हा घाला घातला आहे. हे युगच स्पर्धेचे असल्याने तिला कोणी थोपवू शकत नाही. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’हाच आजच्या जगातला न्याय आहे. त्यामुळे रिलायन्स जिओच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी एकत्र येण्यावाचून या प्रतिस्पर्ध्यांपाशी अन्य पर्याय नव्हता. आयडिया आणि वोडाफोन यांनी दूरसंचार क्षेत्रामध्ये आजवर आपला ठसा उमटवलेला आहे. वोडाफोन ही मूळ ब्रिटीश कंपनी. २००७ साली ती भारतात आली. हचिसनशी तिने केलेल्या व्यवहारामुळे तिचा सरकारशी संघर्ष झाला, परंतु आक्रमक जाहिरातबाजी आणि झपाट्याने केलेला विस्तार यामुळे ती इंटरनेट डेटा वापरणार्‍या ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आज ती देशातील दुसर्‍या क्रमांकाची मोबाईल ऑपरेटर कंपनी आहे आणि सतरा परिमंडळे तिने आजवर पादाक्रांत केली आहेत. आयडिया ही आदित्य बिर्ला समूहाची कंपनी. सात परिमंडळांमध्ये तिची फोर जी सेवा आहे, तर सतरा परिमंडळांमध्ये अन्य सेवा. या दोन्ही कंपन्या जेव्हा एकत्र येतील तेव्हा अर्थातच देशाचा बहुतेक भाग या नव्या कंपनीने पादाक्रांत केलेला असेल. ग्राहकसंख्या वाढलेली असेल. साहजिकच आजवरची आपसातील स्पर्धा संपुष्टात आल्याने आणि खर्चही कमी होणार असल्याने या क्षेत्रातील जीवघेण्यात स्पर्धेला तोंड देणे तुलनेने सोपे होणार आहे. या घडामोडीचा फायदा अर्थातच ग्राहकांनाही मिळेल. रिलायन्स जिओने जे नवे पर्व या देशामध्ये सुरू केले, त्याला तोंड देण्यासाठी आकर्षक डेटा दर आणि इतर सुविधा पुरवणे आयडिया – वोडाफोनसाठी अपरिहार्य असेल. ही नवी कंपनी अस्तित्वात यायला अजून साधारण वर्षभराचा अवकाश आहे, कारण भागधारक, स्टॉक एक्स्चेंज, दूरसंचार खाते, कॉंपिटिशन कमिशन ऑफ इंडिया आदींची या सार्‍या व्यवहाराला मान्यता आवश्यक आहे. परंतु शेवटी ग्राहक हा राजा आहे ही भावना डोळ्यांपुढे ठेवून सेवारत राहिलात तरच टिकाल हा बदलत्या युगाचा या दूरसंचार कंपन्यांना संदेश आहे. आजवर मक्तेदारीच्या माध्यमातून ग्राहकांची झाली ती लूट पुरे झाली. यापुढे आपसातील पराकोटीची स्पर्धा या कंपन्यांचे पाय जमिनीवर ठेवील हे मात्र निश्‍चित.