नादुरुस्त हॉट एअर बलूनमुळे पंचवाडी – शिरोड्यात तारांबळ

0
87

अमळाय – पंचवाडी येथे काल सकाळी पर्यटकांना घेऊन उड्डाण केलेल्या हॉट एअर बलूनमध्ये बिघाड झाल्याने तो तातडीने जमिनीवर उतरविण्यात आला. सुदैवाने यावेळी कुणीच जखमी झाले नाहीत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक टायगर नामक हॉट एअर बलून सेंट अँथनी चर्च समोर उतरविण्यात आला. तत्पूर्वी, सुमारे १ तास सदर बलून परिसरात घिरट्या घालत होता. त्यात दोन विदेशी पर्यटकांसह अन्य ४ जण होते.
यावेळी बलूनमध्ये असलेल्या ६ जणांनी परिसरातील लोकांना आरडाओरड करीत घरातून बाहेर जाण्यास सांगण्यास सुरुवात केल्याने लोकांची तारांबळ उडाली. त्यामुळे घरातील लोकांनी बाहेर येऊन आकाशाकडे पाहिले असता त्यांना बलून जमिनीवर उतरत असल्याचे दिसून आले. सुमारे १० च्या सुमारास जमिनीवर उतरविण्यात आलेला हॉट एअर बलून एका वाहनात घालून नेण्यात आला. यासंबंधी स्थानिक लोकांनी अशा प्रकारचे बलून या भागात न सोडण्याची मागणी केली आहे.