अरोचक-अन्नाची रुची न लागणे

0
2425

– डॉ. मनाली पवार, गणेशपुरी- म्हापसा

अरुची म्हणजे तोंडात रुचकर आहार घेऊनही त्याची चव नीट न कळणे. अन्नाभिलाषा म्हणजे इच्छित वा आवडीचा पदार्थ खावयास देऊनही खाण्याची इच्छा न होणे. भक्तद्वेष म्हणजे अन्नाचा स्पर्श, दर्शन, गंध इतकेच नव्हे तर त्याचे केवळ स्मरणही नकोसे वाटणे…

सामान्यतः एखादा पदार्थ तोंडात घालताच लगेच, तो पदार्थ कोणत्या रसाचा म्हणजे गोड, आंबट, तिखट इ. आहे याचे लगेच ज्ञान होते. तसे भाव आपल्या चेहर्‍यावरपण दिसताच. प्रत्येकाच्या आवडीचा असा एखादा रस असतो. त्या प्रकारच्याच रसाचे पदार्थ आपण सारखे खात असतो, पण कधी कधी आपल्याला आवडणारा पदार्थ आपण रुचकर बनवून सुद्धा त्याची चवच लागत नाही किंवा खावासाच वाटत नाही. भूक न लागणे ही व्याधी सर्वज्ञात आहे, पण भूक असून देखील काहीही खावेसे वाटत नाही. असे ही होऊ शकते.
‘प्रक्षिप्तं तु मुखे चान्नं यत्र नास्वादते नरः|
अरोचकः स विज्ञेयः….
तोंडात घेतलेल्या अन्नाची रुची न लागणे चव नीट न कळणे हे लक्षण ज्या व्याधीत असते त्यास अरोचक असे म्हटले जाते. पदार्थांच्या रसाची योग्य प्रकारे जाणीव न होणे किंवा रुचकर अन्न घेऊनही बरे वाटण्याची जी स्वाभाविक संवेदना असते ती न मिळणे म्हणजेच अरोचक होय.
अरुची म्हणजे तोंडात रुचकर आहार घेऊनही त्याची चव नीट न कळणे. अन्नाभिलाषा म्हणजे इच्छित वा आवडीचा पदार्थ खावयास देऊनही खाण्याची इच्छा न होणे. भक्तद्वेष म्हणजे अन्नाचा स्पर्श, दर्शन, गंध इतकेच नव्हे तर त्याचे केवळ स्मरणही नकोसे वाटणे.
अभक्तच्छन्दामध्ये क्रोध, शोक, भय आदी मानसिक कारणांमुळे अन्नावरील इच्छा नष्ट होणे.
याप्रकारे विविध शब्दांचे वेगवेगळे अर्थ असले तरी ‘अरोचक’ या व्याधीमध्ये या सर्व लक्षणांचा समावेश आहे. हे सर्व अरोचकाचे पर्यायी शब्द होय.
अरोचक ही व्याधी स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात आढळते. कधी कधी ताप, क्षयरोगासारख्या व्याधीत उपद्रव स्वरूपात निर्माण होतो. अरोचक हा स्वतंत्र वेगळा आजार असला तरी बर्‍याच वेळा रुग्णांना नेमके लक्षण सांगता येत नाही. रुग्ण ‘भूक लागत नाही’ असेच लक्षण सांगताना आढळतात. कुशल वैद्याने आपल्या चिकित्सक वृत्तीने ‘भूक न लागणे’ किंवा अरोचक याचा व्यवच्छेद करावा.
अरोचकाची कारणे
सर्व प्रकारचा अग्निमांद्यकर आहार, विशेषतः अतिगुरु, अतिस्निग्ध, अतिमधुर हीच अरोचक या व्याधी मधील मूळ कारणे आहेत.
– योग्य वेळी न जेवणे.
– अति प्रमाणात आहार घेणे.
– विषम आहार घेणे.
– शिळे, नासलेले अशा अन्नाचे सेवन करणे.
– एकरसात्मक आहार घेणे.
– दुर्गंधी-किळसवाणे पदार्थ अचानक नजरेसमोर येणे चिंता, शोक आदी मानसिक कारणे.
अशा प्रकारच्या कारणांनी प्रकुपित झालेले दोष अन्नवह स्रोतसाची दृष्टी करून जिव्हेच्या आश्रयाने अरोचक हा व्याधी उत्पन्न करतात. व्याधी अधिक गंभीर झाल्यास दोषदृष्टीची व्याप्ती ही केवळ अन्नवह स्रोनसापुरती मर्यादित न राहता रसवहस्रोनसाचीही दृष्टी अरोचकामध्ये होते. म्हणूनच अरोचकाची चिकित्सा करताना अन्नवह स्रोतस व रसवह स्रोतसाची चिकित्सा करणे क्रमप्राप्त आहे.
अरोचकामधील लक्षणे
वातज अरोचक – तोंड तुरट होणे, दात आंबणे. कोणत्याच रसाची चव नीट न कळणे. छातीत दुखल्यासारखे वाटणे.
पित्तज अरोचक – तोंड कडू राहणे, दाह उष्णता, ओष, चोष दुर्गंधीतला यासारखी लक्षणे आढळतात.
कफज अरोचक – तोंड गोड किंवा खारट होते, पिच्छिलता असते. गौरव, शैल्य, विवद्धता ही लक्षणे असतात.
अंगसाद, तंद्रा, शीतावत्रासता (थंडी वाजणे) या प्रकारची लक्षणेही आढळतात.
घास गिळण्यास त्रास होणे असेही लक्षण आढळते.
कफज आरोचकात तोंड गोड किंवा खारट होते म्हणजे साम कफ असल्यास तोंड खारट होते व निराम कफ असल्यास तोंड गोड होते.
सान्निपातिक अरोचक – यात वातादी तीनही दोषांची लक्षणे आढळतात. कषायादी सर्वच रसांचा अनुभव येतो. सार्वदेहिक लक्षणेही सर्वच दोषांची मिळतात. अनेक प्रकारची पीडा असते.
मानसिक अरोचक – शोल, भय, अतित्योभ इत्यादी आगंलु कारणांनी उत्पन्न होणार्‍या या अरोचकात जिभेची चव ही स्वाभाविकच असते, तरीही अरुची हे लक्षण असते.
मानसिक कारण ज्या प्रकारचे असेल, तसा दोषप्रकोप होऊन त्या त्या दोषानुसार लक्षणे उत्पन्न होतात. मानसिक अरोचकामध्ये अरुची बरोबरच अश्रद्धा हे लक्षण प्राधान्य करून असते.
अरोचकामधील उपचार-
शोधनोपक्रम हे अरुचीमध्ये महत्त्वाचे आहेत.
– शोधन हे बाह्य व अभ्यंतर दोन्ही प्रकारचे हवे.
– अभ्यंतर शोधनासाठी दोषानुरूप वमन, विरेचन वा बस्ती प्रयोग करावेत.
– बाह्यशोधनात कवलग्रह, धुम्रपान, गंडूष हे उपयुक्त उपक्रम आहेत.
– कडू, तुरट रसांच्या वनस्पतीपासून बनविलेल्या क्वाथाने सकाळ, संध्याकाळ तोंड स्वच्छ धुवावे.
– कडूरसाच्या द्रव्यांच्या काठाने गंडूष करावेत. कडू रस हा न आवडणारा रस असला तरी तो रुची उत्पन्न करणारा रस आहे.
कवलग्रह वा गंडूषासाठी
– कुष्ठ, साखर, मरिच, बिडलवण, जीरक.
– आवळा, पिप्पली, वेलची, कमळ, उशीर, चंदन.
– लोध्र, तेजोव्हा, हरितभी, त्रिकटू यवक्षार.
– आले, डाळिंब यांच्या स्वरसात जिरे व साखर.
या ४ मिश्रांचा तेल व मध याबरोबर वापर केल्यास अनुक्रमे वातडा, पित्तज, कफज व सान्निपातिक आरोचक नष्ट होते.
– जिव्हा निर्लेखन, दंतधावन व धुमपान यांचाही अरोचकासाठी चांगला उपयोग होतो.
– त्यानंतर लंघन करावे.
– लंघनाने थोडीशी भूक वाढल्यावर लवण, तिखट यासारख्या रुच्च रसांनी बनविलेले विविध प्रकारचे पचण्यास हलके, पातळ व उष्ण असे पदार्थ खावयास द्यावेत.
– रुग्णांस आवडणारे पदार्थ द्यावेत.
– मन प्रसन्न राहील असा आहार व सभोवतालचे वातावरण हवे.
– आहार द्रव्यांमध्ये महातुंग, सुंठ, आले, मिरे, पिंपली, आमसूल, जिरे, हिंग, सैंधव, पादेलोज इत्यादी द्रव्यांचा विशेष वापर करावा.
– अजीर्ण होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
– औषधी कल्पांमध्ये हिंग्वाष्टक चूर्ण, अष्टांग लवण चूर्ण, आस्कर लवण चूर्ण, आमलक्यादि चूर्ण, पंचकोलासव, द्राक्षात्सव, कुमारी आसव, आरोग्य वर्धिनी, लशुनदी वटी, आर्द्रकावलेह, मातुलंगावलेह हे कल्प विशेष महत्त्वाचे आहेत.
पथ्यापथ्य
– गहू, शालिषष्टिक, मुद्गयूष, कांजी, केळे, डाळिंब, द्राक्षे, बोरे, शेवगा-सुरण, पडवळ, मुळा या भाज्या, दूध, ताक, तूप हे विशेष पथ्यक आहे.
– गरम पाणी हेही पथ्यकर आहे.
– तहान, भूक, अन्नु, ढंकर यांचे वेगविधारण करणे, क्रोध-भय-शोक-मोह निर्माण होणे आणि अहृद्य अन्नपान विशेष अपथ्यकर आहे.