उत्तर प्रदेशात ‘योगी राज’ पर्वाला सुरूवात

0
99

उत्तर प्रदेशात कडवे हिंदुत्ववादी नेते योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार काल स्थापन झाले. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले प्रसाद मौर्य व दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशात प्रथमच. 

दोन-दोन उपमुख्यमंत्री करण्याची ही पहिली वेळ आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील पहिले आणि उमा भारतीनंतर देशातील दुसरे भगवी वस्त्रे परिधान करणारे मुख्यमंत्री म्हणून योगी ओळखले जातील.

योगींच्या कॅबिनेटमध्ये प्रथमच आमदार झालेले अनेक चेहरे असून दुसर्‍या पक्षातून आलेल्या नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. लखनौमधील मैदानात आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल राम नाईक यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. योगी यांच्या मंत्रिमंडळामध्ये दोन उपमुख्यमंत्र्यासह २३ कॅबिनेटमंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय स्वतंत्र कार्यभार असलेले नऊ राज्यमंत्री आणि १५ राज्यमंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
देशातील सर्वांत मोठ्या राज्यात १५ वर्षांचा वनवास संपवून भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला आहे. शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. समारंभाला भाजपच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांनाही खास निमंत्रित करण्यात आले होते.
टीम आदित्यनाथमध्ये ओबीसी समाजातील १७, अनुसूचित जातींमधील सहा, ठाकूर समाजातील सात, ब्राह्मण आणि कायस्थ वैश्य समाजातील प्रत्येकी ८ मंत्री आहेत. याशिवाय जाट समाजातील २ आणि मुस्लीम समाजातील एका नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

एकमेव मुस्लीम चेहरा
भाजपने उत्तर प्रदेशात सर्व ४०३ जागा लढवल्या होत्या. मात्र, एकाही मुस्लीम व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. यामुळे विरोधकांनी राळ उठवली होती. मात्र, योगींच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहर्‍याला स्थान देण्यात आले आहे. मोहसीन रजा असे त्यांचे नाव आहे. मोहसीन भाजप प्रवक्ते असून ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. आता त्यांना विधानसभेवर निवडून आणले जाते की विधानपरिषदेत स्थान दिले जाते याची उत्सुकता आहे. .