मळकपण – केपे येथे युवकाचा निर्घृण खून

0
86

मळकपण – केपे येथील अनिल सोनू मळीक (३५) या युवकाचा शनिवारी रात्री उशिरा निर्घृण खून करण्याची घटना घडली असून या प्रकरणी केपे पोलिसांनी जॉन माथास (वय २३, आसाम) व ऐलाजर टेटे (३२, झारखंड) या दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मळकपण येथील अनिल मळीक व अटक केलेले संशयित आरोपी जॉन माथास व ऐलाजर टेटे तिघेही एकाच ठिकाणी बारमध्ये दारू पित बसले होते. दारू पिऊन झाल्यानंतर अनिल रात्री १२ च्या सुमारास आपल्या घरी जाण्यास निघाला. त्याच्या पाठोपाठ दोघे संशयितही ते कामाला व राहत असलेल्या फार्म हाउजवर जाण्यास निघाले. काही अंतरावर पोचल्यानंतर तिघांमध्ये जोराचे भांडण झाले. यावेळी संशयित जॉन व टेटे यांनी अनिलला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच संशयित आरोपींनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला झाडीत टाकून तेथून पळ काढला. त्यानंतर उशीरापर्यंत आपला मुलगा घरी न आल्याने घरातील लोकांनी विचारपूस केली. त्यांना रस्त्यावर अनिलचे चप्पल आढळल्याने शोध घेतला असता झाडीत मृतदेह आढळला.
या प्रकरणी केपे पोलिसांनी काल सकाळी लगेच कारवाई करत वरील दोघाही सशंयित आरोपींना अटक केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. कुडचडेचे पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजू देसाई, संदेश गडकर अधिक तपास करीत आहेत.