खापरफोड

0
118

यशाचे सगळेच धनी असतात, पण अपयशाचा मात्र कोणी नसतो या म्हणीचा प्रत्यय कॉंग्रेसच्या संदर्भात सध्या प्रकर्षाने येतो आहे. पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी ट्वीटरवरून गोव्यातील सरकारस्थापनेतील अपयशाचे सारे खापर काल स्थानिक पक्षनेतृत्वावर फोडले, त्यामागे हीच कातडेबचावू वृत्ती आहे. विश्‍वजित राणे यांनी राजीनाम्यासरशी डागलेल्या तोफांनी गोव्यातील सरकारस्थापनेतील दिरंगाईचा ठपका थेट आपल्यावर आल्याने तो आरोप झटकण्यासाठी दिग्विजयसिंहांनी हा ट्वीटस्‌चा धडाका लावल्याचे दिसते. गोवा फॉरवर्डशी निवडणूकपूर्व युतीच्या आपल्या प्रयत्नांना आमच्याच नेत्यांनी घातपाताने सुरुंग लावल्याचा गंभीर ठपका त्यांनी स्थानिक नेत्यांवर ठेवला आहे. गोवा फॉरवर्ड आणि युनायटेड गोवन्स या दोन्ही धर्मनिरपेक्ष पक्षांशी युतीचा प्रस्ताव धोरण म्हणून आपण मांडला होता. त्या अंतर्गत बाबूश यांना पणजीत पक्षाने पाठिंबा दिला आणि त्यांच्या चार पाठीराख्यांना पक्षाने उमेदवारी दिली. गोवा फॉरवर्डशीही अशीच युती होऊ शकली असती, तर आमचे संख्याबळ २२ वर गेले असते असेही दिग्विजयसिंह यांनी ट्वीट केले आहे. जे काही घडले ते सगळे प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांमुळे घडले असे म्हणून दिग्विजय यांनी हात वर केले आहेत. तेवढ्यावरच ते थांबलेले नाहीत. आपल्याकडे गोव्यातील कॉंग्रेसचे प्रभारीपद आले तेव्हा कॉंग्रेस पक्ष कसा गलितगात्र स्थितीत होता, नऊपैकी केवळ सहा आमदारच सक्रिय होते आणि पक्षसंघटनेची विल्हेवाट लागलेली होती त्याचेही वाभाडे त्यांनी या ट्वीटस् मालिकेतून काढले आहेत. दुसरीकडे, दिगंबर कामत यांनीदेखील एकूण प्रकाराबद्दल पक्षनेत्यांना जबाबदार धरले आहे. विशेषतः गोवा फॉरवर्डशी बोलणी करा असे आपण निवडणुकीपूर्वीच श्रेष्ठींना सांगितले होते, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही असे दिगंबर यांनी म्हटले आहे. राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरूनही सरकार स्थापनेत आलेल्या दारूण अपयशामुळे कॉंग्रेसमधील ही सगळी बेदिली आता उघड्यावर आली आहे. पण ही तर केवळ सुरुवात आहे. विश्‍वजित यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकताना पक्षात राहून आपण काय कुजत पडू का? असा सवाल केला तो बोलका आहे. बहुतेक कॉंग्रेस आमदारांची आज हीच मनःस्थिती आहे. पाच वर्षे विरोधात बसण्याची कोणाचीही तयारी नाही, कारण देशपातळीवर कॉंग्रेस पक्ष रसातळाला चालल्याचे दिसू लागले आहे. ज्याने पक्षाला तारावे असा नेता दृष्टिपथात नाही. राहुल गांधी हे शापित यक्षाप्रमाणे जेथे जातात तेथे अपयशाचेच धनी होतात. सध्या ते सोनियांच्या वैद्यकीय उपचारांसाठी विदेशात आहेत. पक्षसंघटनेला दिशा देऊ शकेल असे दुसरे नेतृत्वच पक्षात नाही, कारण समर्थ नेत्यांची दुसरी फळी पक्षात तयारच होऊ दिली गेलेली नाही. खरे तर गेल्या निवडणुकीत पाचपैकी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता अन्य तीन राज्यांमध्ये कॉंग्रेसला दैवयोगाने का होईना, चांगल्या जागा मिळाल्या. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शिरोमणी अकाली दल – भाजप आघाडी सरकारच्या विविध आघाड्यांवरील अपयशावर स्वार होत पक्षाचे सरकार उभे केले. गोव्यात अनपेक्षितपणे पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. म्हणजे पाच पैकी तीन राज्यांत कॉंग्रेसची स्थिती सुधारल्याचे श्रेय पक्षनेतृत्वाला घेता आले असते, परंतु जेथे नेते राहुल गांधींनी समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून स्वतः जातीने लक्ष घातले, तेथेच अतिशय दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने अन्य राज्यांत मिळालेले यश साजरे करणेही पक्षाला अवघड बनले. त्यात दोन राज्यांत सरकारही स्थापन करता न आल्याने उरलीसुरली लाज चव्हाट्यावर आली. आता एकमेकांवर खापर फोडण्याचे हे कितीही प्रयत्न सुरू असले, तरी ‘अब पछताये होत क्या, जब चिडिया चुग गई खेत?’