शिगमो ः एक निसर्गसंस्कृती

0
372

-प्रा. सुरेंद्र सिरसाट

भारतीय संस्कृती ही पर्यावरणीय संस्कृती आहे. आपलं ऐहिक आयुष्य ज्याच्यामुळे चालू राहतं त्या निसर्गाला पूज्य मानून त्याची काही निमित्ताने पूजा करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, त्या-त्या काळच्या निसर्गवैशिष्ट्यांकडे लक्ष वेधणे अशा अनेक उद्देशांनी सण-समारंभांची रचना या संस्कृतीने केली आहे. कालमानानुसार यात काही विकृतीही आली आहे. पण ती आपणच दूर केली पाहिजे. एका नित्यनूतनशील संस्कृतीचे आपण पाईक आहोत, तिला कालसुसंगत नवं रूप आपणच द्यायला हवं.

‘शिगमा’ हा विशेषतः कष्टकरी लोकांचा उत्सव. गोव्यातील शिगम्याला ‘धाकला शिगमा’ व ‘थोरला शिगमा’ अशी नावे आहेत. मांडवी नदीच्या दक्षिणेकडे ‘धाकला शिगमा’ होतो. तो फाल्गुन शु. नवमीला सुरू होऊन पुनवेला संपतो. ‘थोरला शिगमा’ पुनवेला सुरू होतो. सत्तरीत रंगपंचमीला शिगम्याची सुरुवात होते. काही ठिकाणी तो गुढीपाडव्यापर्यंत चालतो. गोव्यात सर्वत्र कष्टकरी, शेतकरी शिगमा हा उत्सव अत्यंत आवडीने साजरा करतात.
ठरलेल्या पहिल्या दिवशी मांड ठेवणे हा प्रकार होतो. प्रमुख मांडकरी व अन्य समुदाय- मांडाचे वांगडी मांडावर एकत्र जमतात. तिथे समई पेटवतात, नारळ ठेवतात अगर वाढवतात (फोडतात). देवाला गार्‍हाणे घातले जाते. प्रथेप्रमाणे अन्य काही देवस्थांनातूनही नारळ ठेवणे, वाढवणे, दिवा लावणे अशा क्रिया आहेत. कुठे विडा, कुठे काजळकुंकू, एखाद्या देवाला गुढी, एखाद्याला विडी, केळे, अगरबत्ती अशा पद्धतीने त्या-त्या देवतांचा मानभौमान झाल्यानंतर ढोल, ताशा, कांसाळे ही प्रमुख वाद्ये मांडावर आणली जातात. या वाद्यांना फूल घातले जाते. मानाची गुढी, अब्दागीर हेही मांडावर आणून त्याना फूल घातले जाते.
प्रमुख मांडकरी ढोलावर पहिली काठी मारतो. मग सर्व उपस्थित गोलाकार उभे राहतात व पहिले नमन होते. हे नमन फक्त कांसाळ्याच्या साह्याने होते. क्वचित ढोल-ताशांचे विशिष्ट पद्धतीत, लयीत वाजवणे होते. अर्धाएक तास नमन व वाजवणे झाल्यानंतर परंपरेची गुढी येथे आणली जाते. ही गुढी म्हणजे त्या ठराविक मांडाचे व त्या मेळाचे, गावाचे प्रतीक असते.
नमनात गणेश देवाला प्रथम नमन होते. कधी मांडागुरू व गावची सर्व दैवते- बेताळ, ग्रामपुरुष, सांतेर, ठिकठिकाणचे देवचार या सर्वांची नावे गाण्यात गुंफून होणारे काव्य परंपरेने मंत्राप्रमाणे गायले जाते.
नमन झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून खर्‍या अर्थाने शिगम्याला सुरुवात होते. संध्याकाळच्या वेळेला गावातील पुरुष व तरुणमंडळी मांडावर एकत्र येते. शिगम्यातील मांडावर स्त्रियांना स्थान नसते. मांडावर प्रथम वादन व नृत्य होते. मेळात जे-जे खेळ खेळायचे असतात आणि सोंगे नाचवायची असतात ती सर्व सोंगे मांडावर येतात. ढोल, ताशे वाजवत आणि घुडयो, अब्दागीर, झाडांच्या फांद्या नाचवत ‘ओस्सयऽऽ’ करत मेळ मांडावरून बाहेर निघतो. सुरुवातीला नजीकच्या देवळात जाऊन तिथे देवासमोर तालावर जत म्हटली जाते. ‘जत’ नावाचे गाणे कांसाळे अथवा जघांट यांच्या साथीने चालते. लय ठेवण्यासाठी कधी ताशावर अगर ढोलावर फक्त काठी मारली जाते.
जत बहुधा एखादा जाणकार म्हणतो. मग तालगडी होते. काही ठिकाणी गोफ, मोरुले, चौरंग हे नृत्याचे-खेळाचे प्रकार होतात. त्यात तालगडी हा प्रकार सर्वत्र आहे. घराच्या मानाप्रमाणे व नाचणार्‍यांच्या इच्छेप्रमाणे दोनतीन जती होतात.
या ‘जती’ आख्यानात्मक तसेच विडंबनात्मक स्वरूपाच्या असतात. अख्यानात्मक जतीत रामायण, महाभारत, पुराणातील प्रसंगाचे चित्रण असते. सामाजिक विषयावरच्या जतीत शिगम्यात सहभागी नसलेल्या समाजवर्गाची चेष्टा दिसून येते.
उदाहरणार्थ,-
१. सकाळी उठोन भट चडला पणसावरी
पणसाचो खांदो म्होडोन पडला जमनीवरी
२. वेंतभर बामणाची हातभर शेंडी वगैरे….
‘जत’ झाल्यानंतर ‘तळी’ म्हणण्यात येते.
उदाहणार्थ,
तळी रे तळी सासणाची तळी
आरती आयली उतरली खेळ्यांनी
घरदार भरू तुजें तिळतांदळानी
आरती आली रे हासवत
घरदार नांदू तुजे सासवंत
‘तळी’ म्हणून झाल्यावर ताटात ‘तळी’ म्हणून ठेवलेले तांदूळ तळी खेळलेल्या घरावर शिंपडले जातात. ताटात ‘तळी’ म्हणून ठेवलेला नारळ (एक वा पाच) आणि तांदूळ घेऊन प्रत्येक घरात ‘तळी’ खेळण्यात येते.
संध्याकाळी मांडाबाहेर पडलेला मेळ रात्रीपर्यंत वाड्यावाड्यांवर फिरत राहतो. हवेत उष्णता असली तरी मेळातील वातावरण उत्साही असते.
पूर्वीच्या काळी ‘मेळ’ नमन झाल्यानंतर गावाबाहेर खेळायला जात व चदुर्दशीला गावात परत येत. मेळातील लोकांची राहण्या-खाण्याची व्यवस्था गावातील लोक करत.
शिगमा सजवण्यासाठी मेळाबरोबर अनेक सोंगे येतात. यांमध्ये राम, कृष्ण, हनुमान यांसारखी पौराणिक पात्रे, शिवाजी, मावळे अशी ऐतिहासिक, राक्षस, म्हातारा, दारुड्या, माकड, अस्वल अशा सोंगांचा समावेश असतो. मेळ्याबरोबर छोटेमोठे कार्यक्रम होतात. पुुरुष स्त्रियांची सोंगे आणतात. मांडावर नाटकेही होतात. मेळ्यातील अन्य लोकही शरीर सजवतात. यामध्ये ठेवणीतल्या पोषाखाबरोबर पाने, फळे, फुले, कागद, पोफळीची विरी व अन्य निसर्गनिर्मित वस्तूंचा मुक्त वापर होतो. काहीवेळा भरजरी कपडे भाड्यानेही आणले जातात. विशिष्ट नृत्यप्रकार सोडले तर नृत्यपद्धती बरीच एकसुरी- एक पाय पुढे व एक पाय मागे व उड्या मारत असे हे नृत्य चालते. पण ढोल-ताशांच्या घणघणाटामुळे नाचणारा आपाततःच बेभान होऊन नाचू लागतो. त्यात या उत्सवात दारू पिण्यावर कोणतेही बंधन नाही. ब्राह्मण, वैश्य, सोनार अशी शिष्टसंस्कृतीतील माणसे सोडली तर संपूर्ण लोकजीवन शिगमोत्सवात सहभागी होते.
पेडण्याकडे शिगम्यातील मेळाला ‘रोंबट’ असे नाव आहे. येथे वाद्यवृंदात प्रचंड नगारा व जघांट असते. काठीला बांधून दोन-दोन माणसे ही वाद्ये हलवतात. वादनपद्धती संपूर्णतः भिन्न व जीवघेणी अशी आहे. नृत्यपद्धती काहीशी सारखीच. पण रोंबट व मेळ त्यांच्या त्यांच्या वादनपद्धतीमुळे ओळखता येतात. एखाद्या मेळात शिंग, कोन्नो, बाको ही वाद्ये आहेत. परंतु ही पोर्तुगिजांच्या आगमनानंतरची असावीत. अन्यथा कोणतेही स्वरवाद्य शिगम्यात वापरले जात नाही. मात्र मोरुले, गोफ, समईनृत्य यासाठी कुठे पेटी-तबला, हार्मोनिअम घेतली जाते. पण ही वाद्ये अगदी अलीकडे शिगम्यात आलेली आहेत.
शिगम्यात विधी व संकेत खूपच आहेत व प्रत्येक मांडावर त्यात वेगळेपणा आहे. दैवतांच्या मानपानाव्यतिरिक्त विधीमध्येसुद्धा वाड्यावाड्यांनुसार फरक सापडतो. शिवाय अमुक वाटेने मेळाने जायचे नाही, अमुक ठिकाणी थांबू नये वा अमुक स्थानी थांबायलाच हवे, एखाद्या ठिकाणी वाद्यवादन नाही, गाणे नाही, शब्दसुद्धा न बोलता जायचे, मांडावर हवे असलेले पाणी ठरावीक ठिकाणाहूनच आणायचे, मांड श्रृंगारण्यासाठी हव्या असलेल्या वस्तू विशिष्ट जागेतून आणायच्या, अमुक एक सीमा ओलांडायची नाही असे खूप संकेत आहेत.
ठरावीक सीमा ओलांडल्यानंतर मेळ्यातील एखाद्या माणसाला कधीकाळी फीट वा मृत्यू आला होता वगैरे त्यामागची कारणे सांगितली जातात. अधिक चौकशी केल्यानंतर वरील घटना फार पूर्वीची, कदाचित दोनचारशे वर्षांपूर्वीचीसुद्धा असेल असे सांगण्यात येते. अमक्या देवळासमोर मेळाने नाचायचे नाही. मेळातल्या माणसाने शिगम्याच्या काळात अमुक देवतेचे दर्शनसुद्धा घ्यायचे नाही, अशा प्रकारचे संकेत आहेत. ते त्यामागे कधीकाळी कुणालातरी आलेले अनुभव आहेत. अशा संकेतांमध्ये शेकडो कथा, दंतकथा सांगितल्या जातात. यातील काही कथांचे संबंध रामायण- महाभारतादी पुराणातील व्यक्तींशी जोडलेले आहेत. कुठल्या तरी तळ्यातील पाणी पिऊन पाच पांडवातील भीम बेशुद्ध पडला होता, तशाच प्रकारच्या असलेल्या तळ्यातील पाणी शिगम्यात घ्यायचे नसते, असे हे संकेत व विश्‍वास आहे. अनेक संकेतांमागची कारणे गावकर्‍यांना माहीत नसतात. परंपरेने आम्ही ते करतो. जाणत्यांनी सांगितले, एवढेच उत्तर मिळते. झपाट्याने बदलत्या सामाजिक परिस्थितीत शिगम्याचे स्वरूपही बदलत आहे. यामध्ये जुने विधी व संकेतसुद्धा विसरले जात आहेत.
काही ठिकाणी पौर्णिमेला तर कुठे पाडव्याला होळी होते. बहुधा ठरावीक बागेतील एक अगर दोन पोफळी कापून आणायच्या व गावच्या ठरलेल्या मंदिराच्या परिसरात विशिष्ट ठिकाणी एक पोपळ पुरायची. भटाने अगर गुरवाने त्याची पूजा करायची. बाजूला होळीच्या मुळाशी गवत ठेवून ते जाळायचे. दुसरी पोफळी दोन बाजूंनी त्या-त्या लोकांनी पकडून एकमेकांकडे ओढत झुंजायचे व धाडकन जमिनीवर मारून ती पोफळी फोडायची. त्यातील गर प्रत्येकाने काढून तो या होळीच्या मुळाशी टाकायचा. असे अनेक विधी यात आहेत. होळीभोवती नाचायचे खेळही आहेत. मोरजी येथे होणार्‍या या नृत्याला ‘कांजाखेळ‘ असे म्हणतात. मंदिराच्या परिसरात त्या दिवशी चप्पल घालून फिरायचे नाही. अश्‍लील शब्दोच्चारांनी बोंबा मारायच्या आदी संकेत आहेत. गावागावानुसार ते बदलतात. तपशिलात फरक होतो. पण होळीला लाकडे जमवून ती पेटवणे हा प्रकार गोव्यात कुठेच नाही. फक्त पुरलेल्या या होळीरूपी झाडाच्या मुळात गवत जाळले जाते, ते एक विधी म्हणून आहे.
शिगम्याचा एक भाग म्हणून अनेक ठिकाणी ‘गडे पडणे’ हा प्रकार होतो. ज्या ठिकाणी सुरुवात होते त्या विशिष्ट जागेला ‘गड्यामांड’ असे म्हणतात. परंपरागतरीत्या आंघोळ करून, फक्त लंगोटी अथवा धोतर नेसून हे गडे त्या मांडावर एकत्र जमतात. सुरुवातीला एखादे नमनाचे गाणे होते व एकदोन माणसे गीतगायनाला सुरुवात करतात. ही गीते म्हणजे रामकथा असते. याला ‘गड्यारामायण’ असे संबोधतात. गीत सुरू होते त्यावेळी हे सर्व गडे उभ्या-उभ्या हलू-डोलू लागतात. गायन-वादनाची लय वाढत वाढत जाते तसे गडे गुमू लागतात. त्यांच्या अंगात येते… व एका क्षणी हे गडे धावत धावत तोंडाने चित्कार करीत स्मशानात जातात. सोबत त्यांना सांभाळायला अन्य माणसे असतात. परंपरेने ठरलेला मुख्य गडा स्मशानातून एखादे हाड मिळवितो. ते हाड सीमेवर अगर ठरावीक ठिकाणी टाकायचे असते. तेथे नारळ फोडायचा व परत धावत यायचे. मग त्या गड्यांना ठरावीक पद्धतीने आंघोळ घातली जाते व हा विधी संपतो. डिचोलीतील साळ या गावी ‘गड्यांची जत्रा’ असा प्रकार होतो. डिचोली, पेडणे, फोंडा आदी तालुक्यांतूनही गडे पडणे प्रकार आहे. मात्र तपशिलात गावागावांतून फरक आहे.