केशव सेवा साधना ः एक व्रत

0
170

– अनुराधा गानू

समाजात जितके वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, तितकेच चांगल्या प्रवृत्तीचेही लोक आहेत म्हणूनच अशी कार्यशिल्पे उभी राहतात. समाजासाठी झोकून देणारे असे कार्यकर्ते आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आधार देणारे नानांसारखे नेतृत्व विरळाच. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करायला शब्द शोधावे लागतील.

२००६ चं वर्ष असेल. आमच्याकडे एक बाई कामाला होती. तिला दोन मुली आणि एक मुलगा. परिस्थिती हलाखीचीच होती. त्या लहान मुलांवर त्याचा परिणाम होऊ नये, त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन पुढे ती मुलं चांगली माणसं बनावीत, चांगले नागरिक घडावेत असं मला वाटायचं. म्हणून मी तिच्या मोठ्या मुलीला मातृछायेत ठेवलं. तरीपण मुलाचा प्रश्‍न होताच. कोणीतरी मला ‘नाना बेहरे’ यांचं नाव सुचवलं. पण नानांची आणि माझी ना ओळख, ना पाळख… मग त्यांना भेटायचं कसं? पण इलाज नव्हता. मी त्यांना फोन केलाच. त्यांना प्रथम भेटले ते काणकोणच्या ‘परशुराम वसतिगृहात.’ त्यांना त्या मुलाची सगळी हकिकत सांगितली आणि म्हटलं, ‘‘पण तो मुलगा हिंदू नाही.’’ नाना म्हणाले, ‘‘मदत ही माणसानी माणसाची करायची असते. तिथे धर्म, जात, पंथ याची आडकाठी येतच नाही.‘‘ आणि नानांनी लगेच त्याला पैंगिणीच्या परशुराम वसतिगृहात प्रवेश दिला. एस.एस.सी.पर्यंत त्याचं शिक्षण त्यांच्यामुळे पूर्ण झालं.
४५० वर्षे गोवा पोर्तुगिजांच्या जुलमी सत्तेखाली पिचत पडला होता. १९४७ साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला, पण गोवा स्वतंत्र करण्यासाठी कोणत्याही राजकारणी लोकांनी प्रयत्न केले नाहीत. गोवा स्वतंत्र व्हावा असं कोणालाही वाटलं नाही. पोर्तुगिजांच्या जुलमाचा त्रास, हालअपेष्टा ज्यांना भोगाव्या लागल्या, त्यांनीच शेवटी उठाव केला आणि त्याचं नेतृत्व राम मनोहर लोहिया यांनी केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या लोकांची त्यांना साथ मिळाली. आणि शेवटी भारत सरकारला आपले सैन्य पाठवावे लागले. १९ डिसेंबर १९६१ साली गोवा स्वतंत्र झाला. ब्रिटिशांची पॉलिसीच पोर्तुगिजांनी अवलंबिली होती. जास्तीत जास्त लोकांना शिक्षणापासून दूर ठेवायचं म्हणजे ते आपल्या वरचढ होणार नाहीत!
गोवा मुक्तीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून मा. कै. दयानंद म्हणजेच भाऊसाहेब बांदोडकरांनी कार्यभार स्वीकारला. त्यांनी गोव्यातील मुलांसाठी शिक्षणाची क्षेत्रे झपाट्यानं खुली केली. त्याचा फायदा काही लोकांना झाला, पण ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना त्याचा फारसा फायदा झाला नाही. नुसत्या शाळा काढून उपयोग नव्हता; शाळेपर्यंत मुलं पोहोचणं आवश्यक होतं. तेच अवघड होतं. कारण चांगले रस्ते नव्हते. वाहतुकीची साधने नव्हती. शिवाय दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलांच्या घरी शिकण्यासारखं वातावरण नव्हतं. आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि ओढग्रस्त. त्यामुळे गळतीचं प्रमाण मोठं होतं. पोर्तुगीज काळात हिंदूंची संख्या जास्त असलेल्या काणकोण, केपे, सांगे, सत्तरी या भागांतील लोकांना जवळपास शिक्षणाच्या सोयी मुद्दाम उपलब्ध करून दिल्या गेल्या नव्हत्या. १९६१ साली पोर्तुगीज राजवट संपली आणि गोव्याच्या विकासासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली. या कार्यकत्यार्र्ंचे अविरत परिश्रम बघून समाजातील इतर लोकांनीही अनेक क्षेत्रांत काम करण्यास पुढाकार घेतला. विशेषतः शिक्षण, आरोग्य, फिरते दवाखाने, पुनर्वसन, वसतिगृहे यांवर सुरुवातीच्या काळात जास्त भर दिला गेला. या सगळ्याचा समन्वय साधण्याची जबाबदारी लोकांसाठी तळमळीने काम करणारे श्री. लक्ष्मण वामन बेहरे- ज्यांना आपण सगळेजण ‘नाना’ म्हणून ओळखतो- यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘केशव सेवा साधना’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. कदाचित त्यांनी माणसातच देव (केशव) बघितला असेल; आणि माणसाची सेवा म्हणजेच देवाची सेवा म्हणून त्यांनी आपल्या संस्थेला ‘केशव सेवा साधना’ हे नाव दिले असावे. चांगल्या माणसांच्या चांगल्या कामासाठी अनेक हात पुढे येतात, तसे नानांबरोबर अनेक कार्यकर्ते पुढे सरसावले. त्याचवेळी काही शिक्षकांना घेऊन काणकोणचे कै. मंजुनाथदास कामत आणि नारायण गावकर यांनी पॉंडेचरीच्या अरविंद आश्रमाला भेट दिली. तेथील कार्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. इथे आल्यावर त्यांनी वसतिगृहाची कल्पना पुढे आणली. त्यातूनच काणकोणच्या ‘माताजी मंदिर वसतिगृहा’चा जन्म झाला. फक्त २५ मुलांना घेऊन हे वसतिगृह सुरू झाले.
या माताजी मंदिर वसतिगृहाची काणकोण चावडीजवळ सुरुवात झाली. आज हे वसतिगृह स्वतःच्या वास्तूत ८० विद्यार्थ्यांच्या सेवेत मग्न आहे. पहिली ते बारावीपर्यंतची ८० मुले इथे राहून शिक्षण घेत आहेत. शिवाय १० कार्यकर्ते त्यांची देखभाल करत आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनाच इथे वसतिगृहातील आपल्या पाल्यासाठी पैसे आकारले जातात. तीही ठराविक रक्कम नाही. शक्य असेल तेवढीच रक्कम त्यांनी द्यावी. आणि ज्यांची परिस्थिती नाही त्या पालकांकडून पैसेही घेतले जात नाहीत. श्री. अनंत गावकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती या वसतिगृहाची व्यवस्था बघत आहे.
दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात अनेक अडचणी होत्या. त्यामुळे केवळ एक वसतिगृह काढून पुरेसे नव्हते. मुलं शेतीकाम, गुरंढोरं, मेंढ्या सांभाळण्याचं काम करत. लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं नव्हतं. अशा ठिकाणी त्या खेड्याखेड्यांमध्ये जाऊन लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी प्रवृत्त करणं आणि मुलांना शिक्षणाची गोडी लावणं, त्यांची शाळेची आणि राहण्याची व्यवस्था करणं गरजेचं होतं. अशा वेळी श्री. विद्याधर पेडणेकर यांनी आपलं जुनं घर वसतिगृहासाठी दिलं. पैंगिणी गावात अन्नधान्य आणि देणग्यांचा ओघ सुरू झाला. फोंड्याच्या श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या महिलांनी ‘अमृत सुरभी’ योजनेखाली वसतिगृहातील मुलांसाठी मूठ-मूठ धान्य जमवून द्यायला सुरुवात केली. श्रीमती माणिक प्रभुगावकर आणि श्रीमती मीलन प्रभुदेसाई यांनी आपली जमीन वसतिगृहासाठी दिली आणि यातून उभं राहिलं ते ‘परशुराम वसतिगृह.’ १९९२ साली सुरू झालेल्या या वसतिगृहात ५ वी ते १० वीपर्यंतचे एकूण ६० विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्याही पालकांवर पैसे देण्याची सक्ती केली जात नाही. श्री. उमेश प्रभुदेसाई आणि त्यांचे सहकारी या वसतिगृहातील मुलांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत.
गोव्यातील सांगे तालुका तसा मागासलेलाच. दुर्गम अशा वेर्ले, सालजी, तुडव या ठिकाणी प्राथमिक शाळासुद्धा नाहीत. अशा ठिकाणी केशव सेवा साधनेच्या कार्यकर्त्यांनी दुर्गम अशा नेत्रावळी भागात एक वसतिगृह आवश्यक आहे असं ठरवलं आणि कामाला सुरुवात केली. ३ जून २००१ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा वर्धापनदिन. याचेच औचित्य साधून नेत्रावळी येथे ‘दुर्गामाता वसतिगृहाची’ स्थापना झाली. या वसतिगृहासाठी वापरात नसलेली एक इमारत सरकारकडून मिळाली. रिवण, केपे, सावर्डे या भागांतून अनेक मदतीचे हात पुढे आले. हितचिंतक, पालक, दानशूर व्यक्ती यांच्याकडून देणग्या, अन्नधान्य, भाजीपाला, आवश्यक वस्तू येऊ लागल्या. आज या वसतिगृहात राहून ३२ गरीब मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी मात्र सरकारकडून मदत मिळते. त्यांची व्यवस्था बघण्याचे काम श्री. सुशांत गावकर यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपल्या खांद्यावर घेतले आहे.
यानंतर समाजातील अत्यंत महत्त्वाच्या समस्येच्या दिशेने केशव सेवा साधनेनं पाऊलं उचलली. डिचोली आणि आसपासच्या भागांत सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की, या भागात जवळजवळ ३०० च्या वर मतिमंद मुलांची संख्या आहे. मतिमंद हा रोग नाही, पण ती एक कायम राहणारी अवस्था आहे. बर्‍याचदा आपल्या मुलांत काही व्यंग आहे किंवा मूल मतिमंद आहे ही गोष्ट पालक स्वीकारायलाच तयार नसतात. मात्र पुढे त्या मुलांचा विकास होणं अत्यंत अवघड होऊन जातं. ही मुलं जर घराच्या चार भिंतीतच राहिली तर ती मुलं एकतर ओव्हर प्रोटॅक्टेड होतात किंवा अंडर प्रोटॅक्टेड होतात. परावलंबी होतात. आत्मविश्‍वास गमावून बसतात. पण अशा विशेष मुलांच्या शाळेत जर ती गेली तर स्वावलंबी होतील. ताठ मानेने, स्वाभिमानाने आणि आनंदाने समाजात वावरू शकतील. अशा मुलांसाठी डिचोलीच्या आसपास अशी शाळा नव्हती. मग त्यांना ढवळी येथील लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या शाळेत किंवा पर्वरी येथील संजय स्कूलमध्ये जावं लागे. पण अंतराच्या दृष्टीने आणि जाण्या-येण्याचा खर्च सर्वसामान्य लोकांना परवडणारा नव्हता. अशा मुलांसाठी विशेष प्रयत्न, विशेष व्यक्तींकडून मदत आणि तज्ज्ञ शिक्षकांकडून मदत हा उद्देश समोर ठेवून दसर्‍याच्या दिवशी २२ ऑक्टो. २००४ मध्ये डिचोली येथे या मुलांसाठी शाळा सुरू केली अन् ‘केशव सेवा साधने’नं केलेल्या संकल्पाचा पहिला टप्पा गाठला.
श्री. सद्गुरू शेट्ये यांनी लगेचच जागा उपलब्ध करून दिली. झांट्येबंधूनी शाळेसाठी लागणारी जागा करारपत्राने उपलब्ध करून दिली. शाळा सुरू झाल्यावर मदतीचा ओघ आपोआप सुरू झाला. आज ही शाळा सर्व सोयींनी युक्त अशी आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षक या मुलांसाठी झटत आहेत. अशा मुलांचा विकास करणे हे एक आव्हान आहे, आणि ते केशव सेवा साधनेनं झेललं आहे. अशा मतिमंद मुलांमध्ये प्रत्येकाकडे एक वेगळी शक्ती असते. ती ओळखून, त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून त्याप्रमाणे त्यांना या शाळेत शिकवलं जातं. त्यासाठी डिचोलीचे एक डॉक्टर श्री. गुुरुदास कापडी आणि श्री. सागर शेट्ये आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने अविरत प्रयत्न करत असतात. प्राचार्या श्रीमती सजना प्रभुदेसाई यांच्याबरोबर २८ जणांची एक टीम झटते आहे. सध्या १६२ मतिमंद मुलं इथे शिक्षण घेत आहेत.
अशाच प्रकारची एक शाळा वाळपई येथे २०११ मध्ये सुरू झाली. वापरात नसलेली एक इमारत सध्या वापरण्यासाठी सरकारने दिली आहे. स्टाफचं मानधन सरकारकडून मिळतं. मुलांसाठी स्कूल बसही सरकारकडून मिळाली आहे. सध्या ७१ मुलं या शाळेत शिकत आहेत. ऍड. सुदिन मराठे यांनी शाळेची जबाबदारी उचलली आहे.
समाजात जितके वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, तितकेच चांगल्या प्रवृत्तीचेही लोक आहेत म्हणूनच अशी कार्यशिल्पे उभी राहतात. समाजासाठी झोकून देणारे असे कार्यकर्ते आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आधार देणारे नानांसारखे नेतृत्वही विरळाच. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करायला शब्द शोधावे लागतील. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना ‘असं मतिमंदत्व कोणाच्याही वाट्याला देऊ नकोस’ अशी ईश्‍वराकडे मनापासून प्रार्थना.
संपर्क ः
माताजी मंदिर वसतिगृह (श्री. अनंत गावकर- ०८३२- २६४३६९४)
परशुराम वसतिगृह (श्री. उमेश प्रभुदेसाई- ९१५८५६२३१५)
दुर्गामाता वसतिगृह (श्री. सुशांत गावकर- ९४२०४२०७)
विशेष (मतिमंद) मुलांची शाळा, डिचोली (श्री. सागर शेट्ये- ९१६८१७३१२९)
विशेष (मतिमंद) मुलांची शाळा, वाळपई (ऍड. सुदिन मराठे- ९४२३८१४३५०)