अखेर बहुमत

0
87

मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या नव्या सरकारने काल गोवा विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळकर वगळता सर्वच्या सर्व कॉंग्रेसेतर आमदारांनी भाजपा सरकारच्या बाजूने निर्विवादपणे मते दिली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कॉंग्रेसला इतर आमदारांचा पाठिंबा सोडाच, खुद्द स्वतःची सतराच्या सतरा मतेही राखता आली नाहीत. विश्वजित राणे यांनी गैरहजर राहून कॉंग्रेस नेतृत्वाला ठेंगा दाखवला. कॉंग्रेस पक्षाच्या रणनीतीची एवढी लक्तरे आजवर कधीच निघाली नव्हती. हे दारूण अपयश हा कॉंग्रेसच्या नेतृत्वहीनतेचा कळस आहे. ज्या दिवशी सर्व कॉंग्रेसेतर आमदार भाजपा सरकारच्या समर्थनात उभे राहिल्याचे स्पष्ट झाले, त्याच दिवशी विश्वजित आणि जेनिफर मोन्सेर्रात यांनी पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीविरुद्धची आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. दिल्लीहून समेटाचे प्रयत्न झाले नाहीत तर विश्वजित लवकरच कॉंग्रेस आमदारकीला रामराम ठोकतील. वाळपईवर त्यांचेच अधिराज्य असल्याने सत्तरी युवा मोर्चाच्या नावे ते पोटनिवडणुकीला उभे राहून पुन्हा निवडून येऊ शकतात. विश्वजित यांनी हे पाऊल उचलले तर कॉंग्रेसमधून आणखी काही जण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तोच मार्ग पत्करणे असंभव नाही, कारण पुढील पाच वर्षे विरोधी पक्षात, तेही कॉंग्रेससारख्या निर्नायकी स्थितीत गेलेल्या पक्षात राहून राजकीय विजनवास सोसण्याची कोणाची मनःस्थिती दिसत नाही. या सरकारच्या स्थापनेमागच्या संपूर्ण घटनाक्रमात पदोपदी दिसून आला तो कॉंग्रेस नेतृत्वाचा स्वतःवरील फाजिल विश्वास. आपल्याला सतरा जागा मिळाल्या याचा अर्थ आपले सरकार घडणारच आणि सगळे भाजपेतर आमदार आपोआप आपल्याकडे चालून येतील असा काहीसा भ्रम कॉंग्रेस नेतृत्वाचा झाला असावा. वास्तविक रोहन जमेस धरून कॉंग्रेसपाशी १८ आमदार होते. केवळ तीन आमदार जरी त्यांनी मिळवले असते तरी त्यांचे सरकार बनू शकले असते. तेही त्यांच्यापाशी आले नाहीत हे लाजिरवाणे आहे. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांचेच उदाहरण घ्या. कॉंग्रेसने त्यांच्याशी निवडणूकपूर्व समझोता केला होता. पण निवडणुकीनंतर तेही भाजपाच्या कळपात चालते झाले, कारण सगळे वारे त्या दिशेला वाहू लागल्याचे त्यांनाही कळून चुकले. गोवा फॉरवर्ड हा भाजपाचा सर्वांत प्रखर विरोधक पक्ष होता. स्वतः विजय सरदेसाई हे गेल्या विधानसभेत भाजपावर गर्जणारी सर्वांत प्रभावी मुलुखमैदान होते. परंतु त्यांच्याशी निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने चाली खेळल्या आणि निवडणुकीनंतरही त्यांना गृहित धरले गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा कॉंग्रेसचा अनेक वर्षांचा साथी पक्ष. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांशी बोलून चर्चिल यांना आपल्या बाजूने वळवणे कॉंग्रेस नेत्यांना अशक्य नव्हते. तेही त्यांना जमले नाही. मगो पक्ष तर भाजपापासून फारकत घेऊन सत्तेतून उतरून निघून गेलेला. मगोशी जवळीक निर्माण करण्याचा ना कॉंग्रेसने निवडणुकीआधी प्रयत्न केला, ना निवडणुकीनंतर. तेच दोन्ही अपक्षांचे. त्यामुळे एवढ्या हास्यास्पद रीतीने गाफील राहिलेल्या कॉंग्रेसने आता कितीही अकांडतांडव केले तरी बूँदसे गयी वो हौदसे नही आती हेच खरे आहे. पर्रीकरांनी बहुमत प्राप्त केलेले असले तरी त्यांच्यापुढील आव्हाने आता कुठे सुरू होणार आहेत. हे भाजपचे सरकार असले, तरी बहुतेक सगळे मंत्री वैचारिकदृष्ट्या भाजपाविरोधक आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या टेकूवर या सरकारचा डोलारा उभा असेल. कॉंग्रेसचे चाललेले पतन हे या सरकारच्या स्थैर्यास पूरक ठरेल एवढेच!