वैफल्यातून आरोप

0
121

पाच राज्यांतील निवडणूक निकालांपैकी पंजाब आणि गोव्यातील निकाल हे मतदान यंत्रातील फेरफारामुळे आम आदमी पक्षाच्या विरोधात लागल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी काल केला. हा आरोप नुसता हास्यास्पदच नव्हे, तर पोरकटपणाचा आहे. आपल्या दारूण अपयशाचे खापर मतदानयंत्रावर फोडणे ही राजकीय अपरिपक्वता तर आहेच, पण एकूणच निवडणूक प्रक्रियेविषयी जनतेच्या मनामध्ये नाहक अविश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्नही आहे. यापूर्वी अनेकदा प्रतिकूल निकालांबद्दल अशा प्रकारे बिचार्‍या मतदानयंत्राला दोषी धरण्याचे प्रयत्न झाले आणि त्यासंदर्भात निवडणूक आयोगापासून सभागृह समितीपर्यंत सर्वांनी एकूण प्रक्रियेच्या निर्दोषत्वाची खातरजमा करून घेतलेली आहे. २००९ साली निवडणूक आयोगाने देश विदेशातील आयटीतज्ज्ञांना या मतदानयंत्रांतील दोष दाखवण्याचे आव्हानही दिले होते. आजवर मद्रास, मुंबई आणि जबलपूर उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल झाल्या होत्या, सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली होती, परंतु कुठेही या मतदानयंत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे सिद्ध झालेेले नाही, उलट दरवर्षी ही मतदान प्रक्रिया अधिकाधिक निर्दोष करण्याचे प्रयत्न सातत्याने होत राहिले आहेत. एक काळ होता, जेव्हा आपल्याकडे निवडणुका म्हटल्या की ‘बूथ कॅप्चरिंग’चा तमाशा पाहायला मिळत असे. मतपेट्या पळवल्या जात, मतपत्रिकांवर जोरजबरदस्तीने धडाधड शिक्के मारले जात. तो काळ आता इतिहासजमा झाला आहे, कारण आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेवर कॅमेर्‍यांची नजर असते आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे कोणी अशा प्रकारची लांडीलबाडी सहजपणे करणे संभवत नाही. आपल्या विरुद्ध गेलेल्या निकालांचे खापर मतदानयंत्रावर फोडणार्‍यांनी मुळात या सर्व प्रक्रियेला समजून घेतले आहे का? ही मतदानयंत्रे हैदराबादची इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बेंगलुरूची भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बनवतात. ती एकदा प्रोग्राम केली की पुन्हा प्रोग्राम करता येत नाहीत. त्यावरील सॉफ्टवेअरचा सोर्स कोड सुरक्षित असतो. या यंत्रांचे मायक्रो कंट्रोलर बनवणार्‍यांना केवळ त्यांचा केवळ मशीन कोड दिला जातो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीत या यंत्रांचे वाटप करताना निवडणूक अधिकार्‍यांना केवळ मतदानाच्या आधल्या दिवशी कळते की कुठले यंत्र कुठल्या मतदान केंद्रावर जाणार आहे. प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ करताना त्याची चाचणी घेतली जाते, त्यावर उमेदवारांच्या एजंटांच्या सह्या घेतल्या जातात. मतमोजणीवेळी पुन्हा ती यंत्रे पूर्वीचीच असल्याची सह्या पाहून खात्री करून घेतली जाते. अलीकडे तर या यंत्रांवर मत देतानाची तारीख आणि वेळेची नोंददेखील होत असते. यावेळी ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची व्यवस्थाही निवडणूक आयोगाने केलेली होती. एवढी सगळी पारदर्शक प्रक्रिया असताना स्वतःच्या सोयीने काही निकालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणे स्वतःच्या अपुर्‍या ज्ञानाचे प्रदर्शन करणारे करण्यासारखे आहेे. या मतदानयंत्राला विदेशांतील यंत्रांप्रमाणे संगणकाची जोडणी नसते, त्यामुळे ती ऑनलाइन हॅक होऊ शकत नाहीत. एकदा त्यांचे मतदान बंद करणारे बटण दाबल्यानंतर त्यावर पुन्हा मतदान करताच येत नाही. त्यामुळे ईव्हीएमविषयी अविश्वास दाखवून मतपेट्यांची मागणी करणे म्हणजे देशाला तीस वर्षे मागे नेण्यासारखे आहे. केजरीवालांच्या ‘आप’ ला दिल्लीत ६७ जागा मिळाल्या, तेव्हा त्यांना या ईव्हीएमविषयी संशय आला नव्हता. त्यामुळे आताचा हा साक्षात्कार प्रतिकूल निकालातून आलेल्या वैफल्याचेच प्रतीक आहे. त्यांना संशय असेल तर त्यांनी आपले आरोप सिद्ध करून दाखवणे गरजेचे आहे. नाहक अविश्वास निर्माण करू नये.