पर्रीकरांसह दहा मंत्री शपथबद्ध

0
109

>> गोवा फॉरवर्डच्या तिघांनाही मंत्रिपद ः विधानसभेत उद्या बहुमत सिद्ध करणार

राज्यात गेले दोन दिवस चाललेल्या गतीमान राजकीय नाट्यानंतर काल दोनापावल येथील राजभवनवरील सोहळ्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. राज्याचे नवे मुख्यमंत्री
मनोहर पर्रीकर यांच्यासह एकूण दहा मंत्र्यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पद व गुप्ततेची शपथ दिली. यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष अमित शहा व व्यंकय्या नायडू उपस्थित होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते फ्रान्सिस डिसोझा, मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर व बाबू आजगावकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर तसेच पांडुरंग मडकईकर, अपक्ष रोहन खंवटे व गोविंद गावडे यांनी यावेळी शपथ घेतली.
आपल्या जादुमुळे आघाडी
सरकार स्थापन ः पर्रीकर
आपल्या पक्षाचे फक्त १३ उमेदवार निवडून आलेले असतानाही आपण केलेल्या जादुमुळे हे आघाडी सरकार स्थापन होऊ शकले, असे पर्रीकर यांनी शपथविधीनंतर सांगितले. घटक पक्षांनी आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत असेल तरच पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली, असेही त्यांनी सांगितले. राज्याचा विकास व ‘गोंयकारपण’ अबाधित ठेवणे हे आपल्या सरकारचे प्रमुख ध्येय आहे. राज्याचा विकास नजरेसमोर ठेवून सर्व प्रादेशिक पक्ष व अपक्षांनी भाजपच्या सरकारास मान्यता दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
विधानसभेत उद्या
बहुमत सिद्ध करणार
न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. कॉंग्रेसचे १७ उमेदवार निवडून आले होते. परंतु त्यांना आपला नेता निवडता आला नाही. बहुमत मिळाले असते तर त्यांना सरकार स्थापन करण्यापासून त्यांना कोणीही अडविले नसते, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने काल कॉंग्रेसला फटकारल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
५५ टक्क्यांचे प्रतिनिधीत्व करणारे सरकार
आपल्या पक्षांला ३४ टक्के, मगोला ११ टक्के व गोवा फॉरवर्डला ४ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे एकूण ५५ टक्क्यांचे प्रतिनिधीत्व करणारे हे सरकार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. गोवा फॉरवर्ड व अपक्षांना आपल्या बाजूने आणण्यासाठी कॉंग्रेसने काल दुपारपर्यंत प्रयत्न केले. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने ते यशस्वी होऊ शकले नाही.
ढवळीकर, आजगावकरांची
मराठीतून शपथ
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, फ्रान्सिस डिसोझा, व विजय सरदेसाई, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर या मंत्र्यांनी कोकणीतून तर सुदिन ढवळीकर व मनोहर आजगावकर यांनी मराठीतून शपथ घेतली. तर पांडुरंग मडकईकर या एकमेव मंत्र्याने इंग्रजीतून शपथ घेतली.
भाजपचे आजी-माजी आमदार व माजी मंत्री तसेच पदाधिकारीही यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.
कॉंग्रेस आमदारांचा बहिष्कार
दरम्यान, कॉंग्रेसच्या सर्व १७ ही आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला.
गोवा फॉरवर्डच्या
पदाधिकार्‍यांचा बहिष्कार
गोवा फॉरवर्डच्या पदाधिकार्‍यांनी शपथग्रहण सोहळ्यावर बहिष्कार घातला. पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी दोन दिवसांपूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर व अन्य यावेळी गैरहजर होते.
दिल्लीच्या मिडियाची गर्दी
संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करीत असल्याने नवी दिल्ली येथील मिडियाने या सोहळ्याला गर्दी केली होती. सोहळ्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी खास त्यांच्यासाठी हिंदीतून भाषण करताना सरकार विकासकामे करणे व ‘गोवा व गोंयकारपण’ याच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असेल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल राजभवनजवळ विजय सरदेसाई यांच्या विरोधात निदर्शने केली. काल शेवटच्या क्षणी कॉंग्रेसकडून गोवा फॉरवर्डच्या आमदारांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न चालू होते.