नव्या भारताकडे

0
98

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये जे जंगी स्वागत झाले, त्याप्रसंगी त्यांनी ‘नव्या भारता’चे स्वप्न मांडताना केलेले भाषण भारतीय जनता पक्षाला भावी वाटचालीची दिशा दर्शविणारे ठरावे. आपले लक्ष्य २०१९ ची लोकसभा निवडणूक ही नसून २०२२ मधील भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे ही त्यांनी व्यक्त केलेली भावना किंवा आपली सरकारे ही ज्यांनी आपल्यासाठी मतदान केले त्यांच्यासाठीच नसून ज्यांनी मतदान केलेले नाही त्यांच्यासाठीही असली पाहिजेत हा व्यक्त केलेला विचार एका सर्वसमावेशक व व्यापक दृष्टिकोनाचे सूतोवाच करतात. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातील प्रचंड यशासंदर्भात बोलताना, भाजपाच्या वटवृक्षावर जेव्हा अशी विजयाची फळे येतात, तेव्हा ‘‘झुकनेका जिम्मा बनता है, अधिक नम्र बननेका जिम्मा बनता है’’ हा जो संदेश त्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिलेला आहे, तोही अतिशय महत्त्वाचा आहे. यश जेव्हा प्रचंड असते, तेव्हा त्याची नशा डोक्यात चढण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ही सत्तेची नशा डोक्यात चढू देऊ नका, सत्ता हे पदांचे नव्हे, तर सेवेचे साधन आहे असे मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावले आहे. परंतु असे बोल जेव्हा केवळ सैद्धान्तिक स्वरूपात राहात नाहीत, तर प्रत्यक्षातही दिसतात तेव्हाच त्याचे मोल अधिक असते. त्यामुळे सततच्या यशाच्या उन्मादामध्ये न राहता, आपल्या सर्वोच्च नेत्याचे हे बोल कायम स्मरणात ठेवण्याची जबाबदारी आता दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या भाजपा नेत्यांची आहे. भाजपाला जेथे अपयश आले, तेथे अहंकार हे त्याचे एक प्रमुख कारण होते हे लक्षात घेतले तर मोदींनी नेमके वर्मावर बोट ठेवल्याचे दिसेल. दुर्दैवाने जेव्हा सत्ता हाती येते, तेव्हा लाभार्थींचे आणि भाटांचे मोहोळ भोवती गोळा होण्याची शक्यता असते. परिणामी, असे कंपू जनता आणि सरकार यामधील संवादातील अडसर ठरतात. खरी जनभावना काय आहे याचा अंदाज मग नेत्यांना येत नाही आणि स्वतःच्याच मनोरथांत दंग राहणार्‍यांना दारुण अपयशाला सामोरे जाण्याची पाळी ओढवते. पंतप्रधानांनी नव्या भारताचे जे स्वप्न रंगवलेले आहे, त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विचार दिलेला आहे, तो म्हणजे आपल्या देशातील गोरगरिबांना आता आधाराचा हात देण्याची गरज नसून त्याऐवजी त्यांना त्यांच्या पायांवर उभे करण्याची खरी गरज आहे. कॉंग्रेसने आजवर गरिबांचे ‘मायबाप’ होण्याचेच धोरण अनुसरले, परंतु मदतीच्या, अनुदानांच्या कुबड्यांऐवजी तळागाळातील लोकांना त्यांच्या पायांवर उभे करणारी पावले उचलण्यास प्राधान्य द्यायला हवे हे पंतप्रधानांचे म्हणणे खरे आहे. शिक्षणाचा प्रसार, कौशल्य विकासाचे प्रयत्न, रोजगाराच्या संधी याद्वारेच खरे गरीबी निर्मूलन होऊ शकते. मध्यमवर्गावरील करांचा बोजा कमी करण्याची गरज व्यक्त करताना गोरगरिबांना स्वतःच्या पायांवर आपण उभे करू शकलो, तर हा भार कमी होईल असेही मोदी म्हणाले. खरोखर सरकारची धोरणे त्या दिशेने आखली जाण्याची आज गरज आहे. नावीन्य, परिश्रम, कल्पकता, शांती, सलोखा, एकता, दहशतवाद आणि काळ्या धनाविरुद्धची लढाई अशा अनेक मुद्द्यांवर आपल्या पक्षजनांना शपथबद्ध करणारे हे भाषण केवळ भाषण राहू नये. जसजसा भारतीय जनता पक्ष देश पादाक्रांत करीत चाललेला आहे तसतशी पक्षाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवरील जबाबदारीही वाढत चालली आहे. त्याचे भान सुटेल तर जनतेशी नाळ तुटेल. वर म्हटल्याप्रमाणे, भाषणांमधून व्यक्त होणारे हे विचार जर प्रत्यक्षात उतरवता आले तरच त्यांना खरे मोल प्राप्त होईल. मिळालेली अमर्याद सत्ता हा मनमानीचा परवाना नव्हे याचे भान राखले गेले, तर पंतप्रधानांनी वर्णिलेला ‘नवा भारत’ दूर नाही!