कारच्या ठोकरीत फोंड्यात पादचारी ठार

0
118

येथील कदंबा बसस्थानकाजवळू काल सकाळी १०.१५ वा. सुमारास फर्मागुडीच्या दिशेने सुसाट वेगाने धावणार्‍या ऑडी कारने पादचार्‍यांना ठोकल्याने एक पादचारी ठार तर दोघेजण जखमी झाले. जखमींना कारमधील एका युवकाचा समावेश आहे. जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

अपघातात महादेव सुरेश कुंभार (२७, खडपाबांध-फोंडा, मूळ कर्नाटक) हा जागीच ठार झाला. तर त्याचा मावस भाऊ नारायण कुंभार (२६, वेर्णा, सुळा हलियाळ-कर्नाटक) व कारमधील शिवम नंदकुमार गोब्रे (१७, तिस्क-फोंडा) हे गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार जीए ०७ के १२३४ क्रमांकाची ऑडी कार घेवून ४ युवक तिस्क-फोंडाहून होळी साजरी करण्यासाठी फर्मागुडीला जात होते. कार सुसाट वेगाने जात असताना कदंबा बसस्थानकाजवळील चढणीवर कार रस्त्याबाहेर जावून एका दगडाला आपटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. यावेळी सर्वप्रथम कारने चालत फर्मागुडीच्या बाजूने जाणार्‍या दोघांही पादचार्‍याना ठोकर देवून कार रस्त्याच्या बाजूच्या कठड्यावरून गेली सुमारे ५ मिटर उंचीच्या कठड्यावरून पुढे जावून कार पुन्हा मुख्यरस्त्यावर कोसळून उलटली. कारने ठोकरल्याने महादेव कुंभार जागीच ठार झाला. तर नारायण कुंभार गंभीर जखमी झाला. यावेळी चालत्या कारच्या छप्परावर बसून होळी साजरी करणारा शिवम गोब्रे हा कारची धडक पादचार्‍यांना बसल्यानंतर कार उलटण्यापूर्वीच कारमध्ये पडल्याने कारखाली चिरडण्यापासून बचावला. एखाद्या फिल्मी स्टाईलने कार उलटल्याचे चित्र परिसरातील प्रत्यक्ष पाहणार्‍या लोकांना पहायला मिळाले.
फोंडा पोलीसानी कारचालक ओंकार सत्यवान नाईक (२१, तिस्क-फोंडा) याला अपघातप्रकरणी अटक केली आहे. पोलीस निरिक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी पंचनामा केला. संध्याकाळी उशीरा गोमेकॉत उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आला.
दरम्यान फोंडा परिसरात काही युवक दुचाकी व चार चाकी वाहनांची शर्यत लावत आहेत. मुख्य म्हणजे रविवारी व अन्य सुट्टीच्या दिवसात शर्यती लावण्याची स्पर्धा होत असून अशा वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्याची मागणी लोक करीत आहे.