(मनःशांतीसाठी संतवाणी) ॥ उपासकांची सूचना… उपासना उपासना ॥

0
279

‘शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी ॥ हे प्रसिद्ध संतवचन सर्वांना माहीत असतं. अनेकांच्या तोंडी ते असतंच पण ते त्याचा उपयोग विविध प्रसंगी करत असतात. पण या मागे असलेली तपश्‍चर्या फारच थोड्यांना माहीत असते. बीज एकदम शुद्ध होत नाही. तर ते पिढ्यानंपिढ्या शुद्ध होत असतं. याला बीजशुद्धीचा सिद्धांत म्हणतात. याचा जातीधर्माशी काहीही संबंध नसतो. संबंध असतो साधनेशी. एखाद्या पिढीतील एखादी व्यक्ती भक्तीनं भारून जाते. इतकी की तिच्यामुळे घरातील वातावरण बदलून जाते. घरातील अनेक मंडळींच्या जीवनशैलीवर याचा परिणाम होतो. बर्‍याच वेळा अवघं कुटुंबच भगवंताच्या भक्तीत बुडून जातं. या कुटुंबात जन्मणार्‍या मुलांवर अगदी सुरवातपासून भक्तीचे संस्कार होऊ लागतात. लहानपणापासून भक्तिपरायण वातावरणात वाढल्यामुळे ही नवी पिढी अधिक डुंबून राहते भक्तिरसात. याचा प्रभाव पुढच्या पिढीवर पडतो. अशाप्रकारे ‘बीज’ शुद्ध होत जातं. भक्ती सर्वांच्या अंतरंगात भिनत जाते… आणि त्या परिवारात अवतरतो सत्पुरुष किंवा संत.

आनुवंशिकता (हिरिडिटी) महत्त्वाची असते पण त्याहीपेक्षा आजुबाजूचं वातावरण, घडणारे संस्कार नि जाणवणारी स्पंदनं यातून आपली खरी जडणघडण होत असते.
नामदेव, चोखा मेळा, गोरा कुंभार यांच्या कुटुंबात अशा प्रकारची परिस्थिती होती. तशीच परिस्थिती कबीराचे घरातही होती. कबीराचा जन्म नि मृत्यू याबद्दल अनेक मतं असली तरी कबीराचं अख्खं जीवन सर्वांसमोर उलगडत होतं. कबीर स्वतः घडत असताना इतरांनाही घडवत होता अगदी घरातील जाणत्या वडील मंडळींनाही. असो.
लहानपणचा एक प्रसंग खूप उद्बोधक आहे. ‘मला आज सकाळीच कामासाठी दुसर्‍या गावाला जावं लागणार आहे. तेव्हा कबीरा, तू लवकर शेतात जाऊन गवत कापून घरी आण. तो चारा गोठ्यातील गुरांना घाल. नाहीतर ती बिचारी उपाशी राहतील.’ असं सांगून कबीराचे वडील कामाला गेले. आईनं आठवण करून दिल्यामुळे कबीर बरोबर विळा घेऊन निघाला. सकाळी वेळ होती. गवताच्या पात्यांवर दवबिंदू साचलेले होते. कबीर गुडघे टेकून बसला व उत्साहानं गवत कापायला सुरवात करणार इतक्यात वार्‍याची झुळूक आली.
त्यामुळे गवताची पानं हलायला लागली. त्यांच्यावरचे दवबिंदू ओघळून खाली पडू लागले. ते पाहून कबीराला वाटलं हे गवत थरथर कापत, अश्रू ढाळत सांगतंय ‘मला कापू नको… कापू नको रे !’… या विचारानं त्याच्या हातातील विळा गळून पडला. आपण केवढं पाप करायला निघालो होतो. हत्त्या करत होतो या निष्पाप गवताची. त्याच्याही डोळ्यातून अश्रू झरू लागले. हात जोडून त्यानं आकाशाकडे पाहत परमेश्‍वराची क्षमा मागितली. नंतर टाळ्या वाजवत त्या गवताच्या पात्यांबरोबर डुलत तो भजन करू लागला. नामजप करू लागला. संध्याकाळ झाली तरी कबीर परतला नाही. वडील घरी परतल्यावर लगेच त्याला शोधायला शेतात आले नि पाहतात तो काय त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलीय. कबीरानं सारा प्रकार सांगितल्यावर मनोमन त्यांनी आपल्या मुलाला नमस्कार केला नि छातीशी धरून कुरवाळलं. लहान मुलं नकळत महान विचार बोलून जातात एवढंच नव्हे तर महान आचारही दाखवून देतात.
पुढे कबीराचा विवाह झाला. संसार सुरू झाला. मुलंही झाली. आर्थिक परिस्थिती गरीबीचीच होती. पण कबीर स्वत: मात्र अखंड आनंदात असायचा. इतरांना तो जे सांगायचा – ‘साधो, सहज समाधी भली |’ त्याचप्रमाणे तो स्वत: जगत असे.
यासंदर्भात एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. एकदा काही अतिथी कबीराकडे रात्री मुक्कामात आले. पत्नी कबीराला म्हणाली, ‘घरात जेवणाची तयारी करण्यासाठी काहीही नाहीये. काय करायचं कबीर म्हणाला, ‘थोडा वेळ थांब.’ रात्रीच्या वेळी कोठून काय आणणार? दुकानंही बंद झालेली. कबीराच्या मनात वेगळीच योजना होती. त्याने चक्क एका वाण्याच्या दुकानात शिरून चोरी केली. पाहुण्यांना पुरेल एवढेच पदार्थ त्यांन चोरले; घरी आल्यावर पत्नीला लवकर स्वयंपाक करायला सांगितला. ‘शिजवलेलं अन्न फक्त पाहुण्यांना वाढायचं. आपण खायचं नाही.’ हे सांगायला कबीर विसरला नाही. दुसरे दिवशी सकाळी उरलेले पदार्थ घेऊन कबीर त्या दुकानात गेला. आपण केलेल्या चोरीची कबुली दिली. दुकानदार आश्‍चर्यानं पाहतच राहिला.
आत-बाहेर म्हणजे पूर्णपणे कबीर प्रामाणिक होता. त्याचा स्वभाव पारदर्शक होता. यामुळेच की काय तो नेहमी शांत-तृप्त असायचा. खोटं बोलणं, असत्य वागणं यामुळे मनावर खूप ताण येतो मन:शांती स्वत:शी व इतरांशी प्रामाणिक असणं महत्त्वाचं असतं. चोरीसारखं पापकर्म करूनही कबीर शांत होता कारण चोरी करतेवेळी त्याचा उद्देश ठरलेला होता. नंतर तो चोरीची कबूलीही देणार होता. या सार्‍या प्रकारात कबीर कमालीचा शांत होता.
साहजिकच त्याचा जो पारंपरिक व्यवसाय होता विणकराचा – त्यात तो कमालीचा कुशत होता. सुंदर सुंदर शेले तो सहज विणार्‍यचा. त्याला तसं गिर्‍हाईकही मिळे. पण तो पोटापुरतंच मिळवी. ‘इतके सुंदर शेले तू कसे विणतोस?’ असं विचारल्यावर त्याचं उत्तर ठरलेलं असे, ‘मी कुठं विणतो ? तो राम विणतो! सारं तोच तर करतो.’ यावरूनच लोक त्याच्याबद्दल आदर व्यक्त करू लागले. ते प्रसिध्द गीत आहे ना… कबीराचे विणतो शेले| कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम’ अशा व्यक्तीची मन:शांती ढळेलच कशी? हाच अनुभव जनाबाईचा सुध्दा नव्हता का?
‘दळता कांडिता तुज गाईन अनंता’. असं जनी फक्त म्हणत नव्हती तर तिचा तो नित्याचा अनुभव होता.
कबीराला एक गोष्ट पक्की माहीत होती. बाहेरची उपचारांनी युक्त पूजाअर्चा करण्याचे आतली नाम-ध्यानयुक्त उपासना महत्त्वाची आहे. मुख्य अशी अंतरंगीची उपासना सतत करता येते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे ती ही की प्रपंचातील कामांची किंवा व्यवहारांची दिशा नि पारमुर्थिक उपासनेची दिशा भिन्न आहे. त्याचं एक वचन या दृष्टीनं विचार करण्यासारखं आहे. – ‘भगवान्, तेरे राजमें उल्टा कुआँ गगनमें’ खरंच आहे हे. आपल्या प्रपंचातल्या विहिरी या वरून खाली, जमीनीच्या पोटात खणलेल्या असतात. आपल्याला खालून वर पाणी ओढून काढावं लागतं. निरनिराळ्या धातूंच्या खाणी सुध्दा अशाच खणलेल्या असतात. धातू मिळवण्यासाठी खालून वर उपसा करावा लागतो.
पण अध्यात्मातली उपासना मात्र स्वत:चा अहंकार घालवण्यासाठी असते. यामुळे आपलं मन हलकं होतं. आपण स्वत:ला वर उचलू शकतो. ‘उध्दरेत् आत्मनात्मानम्’ या सूत्रानुसार भगवंताकडे म्हणजे मुक्तीकडे जाण्याचा मार्ग खालून वर असतो. यालाच कबीर म्हणतो – ‘भगवान्, तेरे राजमें उल्टा कुआँ गगन में|’
मन शांत करण्यासाठी, मन मोकळं मोकळं – हलकं करण्यासाठी, मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाय संतमंडळी सुचवत असतात. कबीरानंही काही गोष्टी सुचवल्या आहेत.
* मन पार्‍यासारखं : खाली सांडलेला पारा (मर्क्युरी) जसा कितीही प्रयत्न केला तरी हातानं भरता येत नाही. तो ओंजळीत येत नाही. चिमटीतही येत नाही. मन एकदा भटकायला लागलं की त्याला आवरणं भल्याभल्यांना कठीण जातं.
* मन वार्‍यासारखं : अतिशय चंचल असलेलं आपलं मन वश करणं महाकर्मकठीण. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे – ‘अचपळ मन माझे नावरे आवरीता |’ (अचपळ म्हणजे अति चपळ)
* मन तार्‍यासारखं : तारे दूरच असतात. दुर्बिणीतून जवळ दिसले तरी तो भासच असतो. मनाला समजणं अवघड आहे. त्याला हाताळणंही सोपं नाही.
* मन मोहरीच्या पुरचुंडी सारखं : बाजारातून आणलेली मोहरीची पुरचुंडी (पुडी) बाहेर काढताना फुटली तर मोहरीचे दाणे जसे घरंगळत सर्व दिशांनी विखुरतात, त्यांना वेचून पुन्हा एकत्र करणं मुश्किल असतं. तसं भरकटलेलं मन थार्‍यावर आणण कठीण असतं.
* मन काटेरी झुडपावर अडकलेल्या चुनरी (ओढणी) सारखं : एखादी रेशमी ओढणी किंवा मलमलीचं तलम वस्त्र काटेरी झुडपात अडकलं तर त्याला सोडवणं अवघड असतं. एका बाजूनं काट्यातून सोडवावं तर दुसर्‍या बाजूनं अडकतं. न फाटता ते वस्त्र काट्यांपासून सोडवणं सोपं काम नसतं. मनही विचार-कल्पनांनी पुरेपूर भरलेलं असतं. एक विचार बाहेर काढावा तर दुसरे दोन आत शिरतात. निर्विचार, मोकळं मन हे योग्यांनासुध्दा काही काळच जमतं. पण कबीरासारख्या संतांचं मन आकाशासारखं सुक्ष्म, विशाल, सर्वव्यापी असल्यानं ते भटकरणार तरी कुठं? ते सदैव शांत, मोकळं असतं. मन:शांतीसाठी मोकळं मन हवं तर मोकळ्या मनासाठी मन:शांती हवी. असं हे एकमेकावर अवलंबून आहे.
भगवंतानं गीतेत सांगितलंय तेच खरं आवश्यक आहे- वैराग्य नि अभ्यास म्हणजे प्रयत्न नि उपासक कबीराचं जीवन अतिशय साधं, सरळ, सात्तिक होतं. बाजारातून सूत आणणं, निरनिराळ्या रंगात रंगवणं, मागावर ते रंगवलेलं सूत घेऊन वस्त्र विणणं त्यातून नक्षीदार, नाजूक शेले तयार करणं. यात कराव्या लागणार्‍या आर्थिक व्यवहाराशी त्याला विशेष कर्तव्य नसे. त्याला एकच गोष्ट प्रिय होती. सारी कामं करताना मुखी रामनाम घेणं.
रामकृष्ण परमहंस एका अशाच कोष्ट्याची गोष्ट सांगत. तो सतत ‘रामाची इच्छा’ हे दोन शब्द उच्चारून सारे व्यवहार करी. ते नुसते शब्द नव्हते तर त्याची सच्ची निष्ठा होती. बाजारात गिर्‍हाईक आल्यावर हा आपल्या सुताची किंमत कशी सांगे? ‘सुताची किंमत दोन आणे, रंगाची एक आणा, मजुरी एक आणा एकूण चार आणे !’ पण यावेळी प्रत्येकाची किंमत सांगताना ‘रामाची इच्छा’ म्हणत असे… सूत दोन आणे रामाची इच्छा; रंग एक आणा रामाची इच्छा; मजूरी (करणावळ) एक आणा रामाची इच्छा; वस्त्राची (सुताची) किंमत चार आणे रामाची इच्छा !’’… त्याच्या या सच्चेपणामुळे त्याचं सूत ताबडतोब खपत असे. एकदा एक चोर मागे सैनिक लागल्यानं चोरीच्या मालाचं गाठोडं त्या कोष्ट्याशेजारी ठेवून लपून राहतो. तो चोरीचा माल कोष्ट्याजवळ सापडल्यानं सैनिक त्याला पकडतात. तो हसून म्हणतो, ‘रामाची इच्छा’ त्याला न्यायाधीशासमोर उभा करतात, त्याचे उद्गार ठरलेले ‘रामाची इच्छा’, न्यायाधीशानं विचारल्यावर त्याच्या स्थिर नजरेनं पाहत हा कोष्टी त्यादिवशी घडलेला सारा वृत्तांत सांगतो प्रत्येक वाक्यानंतर हसून म्हणतो, ‘रामाची इच्छा’. ते पाहून नि ऐकून न्यायाधीशाला त्याचा निरपराधपणा पटतो. तो म्हणतो, ‘तू निर्दोष आहेस…’ यावर कोष्टी म्हणतो, ‘रामाची इच्छा’…न्यायाधीश जेव्हा म्हणतो, ‘ मी तुला चोरीच्या आरोपातून मुक्त करतो.’ यावरही शांतपणे तो म्हणतो…‘रामाची इच्छा !’… न्यायाधीश त्याच्याकडे पाहातच राहतो.
सामान्य माणसाला जर अशी शांत वृत्ती शक्य आहे तर आपल्याला का नाही? यासाठी आपल्यात काही श्रध्दा विकसित व्हायला हव्यात.
* या सार्‍या विश्‍वात, माझ्या जीवनात जे जे घडतं त्यामागे परमेश्‍वराची म्हणजे विश्‍व चालवणार्‍या शक्तीची इच्छा असते.
* जे जे काही घडतं ते ते सारं माझ्या अंतिम हिताचंच आहे.
* असं आहे तर सार्‍याचा स्वीकार मी हसत हसतच करीन. मन:शांती ढळू देणार नाही – एवढा निर्धार केला तर जीवन ही नित्य दिपवाळीच असेल.
तुकोबा जसे म्हणतात… ‘आलीया भोगासी असावे सादर’ किंवा ‘ठेविले अनंतें तैसे चि राहावे | चित्ती असू द्यावे समाधान ॥ तसंच कबीरही म्हणतो, ‘राम हजारा जप करें | हम बैठे आराम॥ आजुबाजूला चित्रविचित्र गोष्टी घडत असताना… असं ‘आराम बसणं… समाधानी असणं’ सोपं नाही. यासाठी समर्थांचा आदेश आहे… ‘उपासकांसी सूचना | उपासना… उपासना !’