होळी ः एक लोकोत्सव

0
321

– सौ. पौर्णिमा केरकर

मर्दानी उत्सवाचा महोत्सव म्हणजेच होळीपासून सुरू होणारा शिगमोत्सव. हा तर सामूहिक लोकोत्सवच असल्याने सभोवतालच्या निसर्गात रंगगंधाची नैसर्गिक होळी जशी अनुभवता येते, तसेच पारंपरिक विधी-परंपरांनी सजलेली, श्रद्धाळू-भाविक मनाने आत्मीयतेने पुजलेली होळी आठवताना, हा लोकोत्सव साजरा करताना लोकमानस किती दक्षतेने आणि आत्मीयतेने या उत्सवाकडे पाहायचा याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

पानगळीला सुरुवात… उन्हाचा रखरखाट… शाल्मली, पळस, पंगारा, बहावा यांची मुक्त मोकळ्या आभाळाच्या पार्श्‍वभूमीवर बहारदार रंगांची उधळण… शाल्मलीच्या फांद्या-फुलांवर चिवचिवणारे पक्षी, आंबा-फणस यांच्यातून नुकतेच फुटू पाहणारे कोवळे लावण्य… ही निसर्गनक्षी लवकरच येऊ घातलेल्या, आपल्या रंगगंधाने समस्त मानवी मनांना निर्मल आनंद देणार्‍या होळीची, फाल्गुन पौर्णिमा जवळ येऊन ठेपली आहे याची जाणीव करून देते.
‘होळी’ म्हटली की गावागावांतील घरांमधून नाद संचारायचा. संपूर्ण वर्षभरात कोणत्या ना कोणत्या सण-उत्सवाचे येणे-जाणे चालूच असते. त्यातही मर्दानी उत्सवाचा महोत्सव म्हणजेच होळीपासून सुरू होणारा शिगमोत्सव. हा तर सामूहिक लोकोत्सवच असल्याने सभोवतालच्या निसर्गात रंगगंधाची नैसर्गिक होळी जशी अनुभवता येते, तसेच पारंपरिक विधी-परंपरांनी सजलेली, श्रद्धाळू-भाविक मनाने, आत्मीयतेने पुजलेली होळी आठवताना, हा लोकोत्सव साजरा करताना लोकमानस किती दक्षतेने आणि आत्मीयतेने या उत्सवाकडे पाहायचा याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. होळी म्हटली की कोणत्यातरी झाडाचा मोठा खांब विधीयुक्त कापून आणून त्याचे सामूहिकरीत्या पूजन करायचे. मग ही झाडे तरी कसली, तर त्या-त्या गावात जी मूबलक झाडे आढळतात त्यांचाच वापर होळीसाठी करायचा. सत्तरीतील करंजोळ गावात विस्तीर्ण पसरलेली ‘होळयेची राय’ आहे. ‘राय’ म्हटल्यानंतर देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल. येथे प्रवेश करतानासुद्धा गावाने घालून दिलेल्या नियमानुसारच वागावे लागते. देवाचे भय घालून ठेवल्याने कोणत्याही प्रसंगी कसेही जाऊन कितीही झाडे तोडता येत नाहीत. निसर्गाविषयीची कृतज्ञता लोकमानसाने कायमच त्यावेळी बाळगली होती म्हणूनच निसर्गाची हानी होईल असे कोणतेच कृत्य सहजपणाने केले जात नसायचे. होळयेच्या रायमध्ये वर्षातून एकदाच जाऊन एकच झाड मारले जाते. ‘नागीन’ नावाच्या खूप उंच झाडांनी ही देवराई समृद्ध आहे. होळयेचे दिवस सोडले तर इतर दिवसांत येथे सहजासहजी कोणाचे जाणे-येणे नसते. जैविक संपदेचे श्रीमंत वैभव लाभलेली ही देवराई आजही तेवढ्याच आत्मीयतेने जतन केलेली आहे.
एखाद्या गावात ठरावीक तर्‍हेची वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात आढळत असेल तर मग तेच झाड होळीसाठी कापण्यात येते. त्यानुसारच आंबा, कोकम, पोफळ, सावर यांसारखी झाडे होळीसाठी पुजली जातात. तिसवाडी, फोंडा हे तालुके माडा-पोफळींनी युक्त कुळागरांचे. सरळसोट आकाशाशी स्पर्धा करू पाहणारे हे वृक्ष लोकजीवनातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विधीसाठी वापरले जातात. त्यामुळे या तालुक्यातील बर्‍याचशा गावांत पोफळींचा वापर होळीसाठी केला जातो. कुळे-शिगाव येथे मोठ्या प्रमाणात सावरी-शाल्मली वृक्ष आहेत. शिगमोत्सवाच्या काळात जो ‘दुरीग’ उत्सव साजरा होतो तेथे लांबलचक मोठ्या, सरळ गेलेल्या सावरीचाच खांब पुजला जातो. होळीसाठी कापून आणून तो जमिनीत पुरेपर्यंतचा या खांबाचा प्रवास शेकडो सहकार्याच्या श्रद्धाळू हातांनी होत असतो.
फाल्गुन पौर्णिमा ही चैत्र कालगणनेतील शेवटची पौर्णिमा. वसंताच्या आगमनाने चित्तवृत्ती फुलकित होतात. कोवळ्या लुसलुशीत गुलाबी, पोपटी, लालुस रंगरंगांची छटा डोंगररांगांत, आजूबाजूच्या परिसरात विखुरलेली असते. त्याशिवाय पळस-पंगार्‍याचा शाल्मलीचा गडद लाल रंग मनाला अधिकच आकर्षित करतो. बहाव्याचे सौम्य पिवळसर पोपटी रंगाचे फुलणे वसंताला अधिकच खुलवते. खरं तर निसर्गाचे हे रंग म्हणजेच होळी. तिथे माणसांनी कृत्रिम रंग तयार करून जरी होळी खेळली तरी त्याची सर नैसर्गिक रंगांना प्राप्त होणेच शक्य नाही.
आपल्याकडे सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा ही शाश्‍वत होती. होळीसाठी झाड तोडायचे, तेसुद्धा संवेदनशील, कृतज्ञ वृत्तीने. सत्तरीतील सुर्ला- आंबेलीसारख्या गावात ‘पाच आंब्याची’ देवराई होती. ती आता नामशेष झालेली आहे. एखादे झाड तोडल्यानंतर दहा तरी झाडे लावण्याची तजवीज करण्याची मानसिकता आज लोप पावलेली आहे. म्हणून हे हिरवे संचित हळूहळू लुप्त होत आहे. परंपरेने चालत आलेले उत्सव धार्मिक भीतीपोटी प्रतीकात्मकरीत्या साजरे केले जात असताना निसर्गाचा र्‍हास होत आहे याची पुसटही जाणीव होताना दिसत नाही. डिचोलीतील साळ गावात होणारा गड्यांचा उत्सव प्रदेशात आणि प्रदेशाबाहेरही प्रसिद्ध आहे. भूमिकेच्या मंदिरापासून जवळच असलेल्या महादेव मंदिरासमोर आम्रपल्लवांनी सुशोभित केलेली होळी घातली जाते. आज या ठिकाणी अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्वजांनी जी झाडे लावली होती, पोटच्या मुलांप्रमाणे ज्यांची काळजी घेतली होती, त्यांच्याकडे आताच्या पिढीने दुर्लक्ष केल्याने त्यांचे अस्तित्व इतिहासजमा झाले आहे. रावण- सत्तरीतील, तसेच इतर अनेक गोवांतील सामूहिकताच एक उत्साह प्रदान करणारी ठरते.
होळी हा एक लोकोत्सव जो संपूर्ण देशभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. उत्तरेत ‘होरी’ तर गोवा-महाराष्ट्रात ‘होळी’ अशी नावे प्रचलित आहेत. प्रदेशपरत्वे या उत्सवाचे साजरीकरण जरी वेगवेगळे असले तरी रंगांची उधळण हा एक समान दुवा आढळतो. होळी, धूळवड, रंगपंचमीच्या माध्यमातून येथे होळी खेळली जाते. बंगालात फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला ‘दोलायात्रा’ उत्सवाची सुरुवात होते. घरातील मुख्य व्यक्ती उपवास करते व त्यानंतर सकाळी कृष्णाची तर संध्याकाळी होळीची पूजा केली जाते. पूजा संपल्यानंतर कृष्णमूर्तीबरोबरच जमलेल्या जमावावरसुद्धा गुलाल उधळला जातो. ओरिसात कृष्णाची मूतीर्र् पालखीत बसवून त्याची मिरवणूक काढताना रंगोत्सवात लोक न्हाऊन निघतात. टिपर्‍यांचा नाचही काही ठिकाणी केला जातो. लाल-पिवळी वस्त्रे परिधान करून उत्तर प्रदेशात होळीचा रंगारंग बेधुंदपणे साजरा होतो. चव्हाट्यावर पौर्णिमेच्या दिवशी होळी पूजन व दहन केले जाण्याची परंपरा आहे. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ असा विचार मनात घोळवत आंबा, माड, पोफळ, एरंडसारख्या वृक्षांचे दहन करण्याची परंपरा आहे. या लोकोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना अपशब्द वापरायचे, परंपरेने जे काही वाईट ठरवलेले आहे ते ते सर्व त्या दिवशी करायचे, जेणेकरून पुढे येऊ घातलेल्या गुढीपाडव्याला सात्विक बनून आयुष्याला सामोरे जायचे. वाईट अपप्रवृत्तीची जाळून-पुरून होळी करायची आणि मांगल्याचा स्वीकार करायचा ही प्रतीकात्मकता येथे आहे.
गोमंतकातील शिगमा गातो, नाचतो, वाजतो आणि खेळतो. आमची होळी जळत नाही तर ती उभी राहते. गावोगावच्या ग्रामदेवतेच्या देवळासमोर ती उभी केली जाते, असे पं. महादेवशास्त्री जोशी म्हणतात. येथे होळीच्या आदल्या दिवशी पारंपरिक लोकवाद्ये घेऊन होळीसाठी जे झाड कापायचे असते तिथे समूहाने जातात. गावाने ठरवलेले मानकरी तेथे असतात. धार्मिक विधी करून कृतज्ञतापूर्वक झाड कापून ते वाजत-गाजत आणले जाते. असोला नारळ आणि आंब्याची पाने बांधून होळी पुरली जाते. उत्तर गोव्यात होळीपासून सुरू होणार्‍या शिगमोत्सवात अश्‍लील शब्द, शिवीगाळीचा सर्रास वापर केला जातो. मद्य, मांस वर्ज्य नसते, परंतु शिवरात्रेला सुरू होणार्‍या आदिवासी वेळीप समाजाच्या डोंगरावर पार पाडणार्‍या शिगमोत्सवात दारूला स्थान नाही. मांस, मटण, चिकन सगळेच वर्ज्य. महाशिवरात्र ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंतच्या काळात साजरा केला जाणारा हा आदिवासी वेळीप समाजाचा शिगमोत्सव हा निसर्गोत्सवच असतो. धनगर समाजात तर गुराढोरांना अनन्यसाधारण महत्त्व. त्यातही म्हशी त्यांच्या संसाराचा अविभाज्य घटक. ते सादर करत असलेल्या लोकनृत्यावर, त्यातील हालचालींवरसुद्धा म्हशीच्या हालचालीचा प्रभाव पडलेला दिसतो. याच समाजात होळीच्या दिवशी गोवर्‍या एकत्रित करून त्या जाळल्या जातात. काही काही गावांत तर होळी कोणी कापायची, त्याची पूजा कोणी करायची हे ठरवूनच टाकलेले असते. यावरूनच अनेक ठिकाणी वादविवाद होतात. याचा परिणाम म्हणून मंदिरेच बंद करून सर्वच सण-उत्सवांना कुलूप लावलेले बर्‍याचशा गावांतील चित्र आहे.
आज या लोकोत्सव साजरीकरणातील बरेचसे संदर्भ बदललेले आहेत. पूर्वी अशा उत्सवांतून जो निकप आनंद प्राप्त व्हायचा त्याची जागा आज मानपान, ईर्षा, असुया, प्रतिष्ठा यांनी घेतलेली आहे. होळीसाठी राखीव ठेवलेली जंगलेसुद्धा अतिशय संकटग्रस्त झालेली दिसतात. निसर्गाप्रतीची कृतज्ञता लोप पावत आहे, त्यामुळे उत्सव तर साजरा होतो, पण त्यात जीव ओतणे नाही. होळी आणायला जाताना तिच्यावर पहिला घाव कोणी घालायचा या क्षुल्लक कारणावरून होलिकोत्सव बंद पडण्याची उदाहरणे येथे आहेत. पूर्वीच्या लोकमानसाना ते खूप देव-घेव करीत म्हणून अज्ञानी, अंधश्रद्धाळू ठरविण्यात आले. परंतु बारीक विचार केला तर लक्षात येईल की त्यांनी जे केले ते मनस्वी श्रद्धेने, कृतज्ञतापूर्वक केले. आपल्याला जगण्यासाठी जो मोठा आधार देतो तो निसर्ग. मग त्याला जगवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी धार्मिक भय निर्माण करणे ओघानेच आले. पण याचा उलट अर्थ मात्र नव्या पिढीने घेतला हे सारखे जाणवत राहते.
लोकमानसाचे निसर्गाशी हृदयाचे नाते होते. आज आपण निसर्गापासून दुरावत चाललो आहोत म्हणून सण-सोहळे साजरे करणे हे नुसतेच प्रतीकात्मक वाटते. होळी आणून तिची साल काढणे, पानांनी सजवणे यात आंब्याच्या पानांना महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. या पानांच्या औषधी गुणधर्माविषयी तर जुन्या-जाणत्यांना खूप माहिती होती. पौष महिन्यात मंगलकार्याची बोलणी, मंगलकार्यसुद्धा करता कामा नये असा लोकसंकेत आहे. फाल्गुनाच,ं धरित्रीचं सृजनत्व जागृत करण्यासाठी होळीच्या रूपाने जमिनीत खांब पुरला जाण्याची पद्धत आहे. प्रकृती-पुरुषाच्या मीलनातूनच सृजनत्व निर्माण होते. यामागे एक कथाही सांगितली जाते. फाल्गुन शुद्ध १५ ला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. ‘भग’ ही त्याची देवता मानली जाते. ‘भग’ म्हणजेच जननेंद्रिय म्हणजे स्त्रीचे इंद्रिय. याचसाठी भगाच्या नावाने मोठ्याने ओरडायचे. असे ओरडून भगाची पूजा करणे म्हणजे त्याचा सन्मानच करणे होय, असेही मानले जाते.
‘होळी’ म्हटले की आपल्या नजरेसमोर लाल, पिवळे, हिरवे, निळे, गुलाबी असे रंगच रंग दिसतात. रंगरंगाच्या पिचकार्‍या मारत रंगाची उधळण करीत गुलालोत्सव साजरा करताना देहभान विसरायला होते हे जरी खरे असले तरी अलीकडे बाजारात विकत मिळणारे रासायनिक रंग हे शरीरासाठी घातक ठरू लागले आहेत, याचे भान बाळगणे तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी निसर्गाशी सख्य जुळवून कार्यरत राहणे हे केव्हाही महत्त्वाचे. पूर्वी याच दिवसांत लोकमानस विविध विधी करायचे. त्यात चरू देऊन अदृश्य शक्तीची थारावणी केली जायची. शरीरावर धारदार शस्त्राने वार करून रक्ताचा अभिषेक मातीवर शिंपडला जायचा. हे सर्व विधी अनाकलनीय असे वाटत असले तरी त्यांना त्यात नैसर्गिक तत्त्व गवसले होते. मानवी जीवनव्यवहारातील आचरण हे विधीचे मुख्य अंग मानले जायचे. त्यामुळे एखादे देवकार्य करायचे, त्यासाठी अमकेच विधी अमक्याच पद्धतीने करायचे हे ठरवूनच दिलेले. त्यानुसार परंपरा प्रवाहित राहिली. तंत्रज्ञानाच्या युगातील बदलत्या जीवनशैलीमुळे खूपच उलथापालथ येथे झालेली आढळते. फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होणारा शिगमोत्सव ही या प्रदेशाची खास वेगळी ओळख आहे. होळीनंतर होऊ घातलेल्या वैविध्यपूर्ण कलाविष्कारांचा मनोहारी आविष्कार अनुभवायचा असेल, तर महाशिवरात्री ते फाल्गुन पौर्णिमा व त्यानंतर येणार्‍या पाच, सात, नऊ, अकरा दिवसीय धुळवडीत सामील होऊन या रंगबिरंगी उत्सवाची पर्वणी लुटायलाच हवी.