सुखाचा परिघ ः माझं माहेर

0
235

सौ. अंजली विवेक मुतालिक (कुडाळ)

ज्या दिवशी माहेरी जायचं त्याच्या आदल्या रात्री झोप लागत नाही. माहेरच्या आठवणींचा हादगा फेर धरून डोळ्यासमोर नाचू लागतो. पुन्हा त्याच आठवणींच्या परिघावर…! ‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात, माहेरी जा सुखाची तू कर बरसात!!’

‘मायका’ मतलब ‘माहेर’- ज्या ठिकाणी आपली ‘माय’ आहे ‘का?’ आणि जबतक ‘मॉं’ उधर है तो माहेर! प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनात केंद्रबिंदू ‘मायबाप’ असलेलं आठवणीचं सुखद वर्तुळ म्हणजे माहेर. या बिंदूपासून सुरू होऊन सासरच्या परिघापर्यंत नेणार्‍या असंख्य संस्कार आणि शिकवणीच्या शिदोर्‍यांच्या त्रिज्या म्हणजे माहेर.
लोकशाहीर, ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचं जन्मगाव ते माझं माहेर- वाटेगाव. कृष्णामाईच्या जलरूपी आशीर्वादाने सुजलाम् सुफलाम् असलेलं सांगली जिल्ह्यातील एक टुमदार गाव. लोकसंख्या २०,०००, ता. वाळवा, इस्लामपूर. येथे बरीचशी शासकीय कामकाजे चालतात. गावाच्या मध्यभागातून भोगावती नदी वाहते. आता तिचा प्रवाह ओढा किंवा ओहोळ स्वरुपात दिसून येतो. त्यामुळे गावाचे दोन भाग पडतात. जिथे मार्केट एरिया तो गावभाग व दुसरा वाडीभाग. काजळाच्या डबीतील काळ्याभोर काजळाप्रमाणे जमिनी… सुपीक…. त्यामुळे अर्थातच शेती हा प्रमुख व्यवसाय व शेतीसंलग्न पशुसंवर्धन, डेअरी फार्म, कृषी बियाणे केंद्रे व राजारामबापू सहकारी साखर कारखाना या सर्वांचा परिपाक म्हणजे सधनता! अत्याधुनिक यंत्रांनी उदा. ट्रॅक्टर, जे.सी.बी., पोकलँड, पॉवरटिलर या साधनांचा वापर करणारा, डोक्याला टॉवेल गुंडाळलेला शेतकरी दिसला तर बुद्धिजीवी प्राण्यांनी उगाचच स्वतःच्या कॉलर ताठ करू नयेत. कारण त्यात प्राध्यापक सुभाष मुसळे, इंजिनिअर देवदत्त दिवेकर, डॉ. भूषण चौगुले, ऍड. आशिष कुलकर्णी ही मंडळीही असू शकतात. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाने व अवजारांनी शेती करणारे शेतकरीसुध्दा उच्च विद्याविभूषित आहेत. केवळ आपली परंपरा आणि मातीशी असलेली नाळ टिकवून ठेवणारी अशी कितीतरी मंडळी शेताशेतांत आढळतील.
ग्रामदैवत वाटेश्वर या देवालायावरून गावाचे नामकरण झाले. त्याचबरोबर गावात वासुदेव मंदिर, विष्णू मंदिर, यमाई मंदिर, मारुती मंदिर, धर्मनाथ मंदिर, त्याचबरोबर मशिदी गुण्यागोविंदाने नांदतात. सोमवार हा शंकराचा उपवासवार पाळून कोणतीही जोशी, सावंत, पाटील काकू मंदिरात दर्शनाला जाईलच, पण मुल्लाभाभीही ओलेत्या केसांनी उपवास करून वाटेश्वराला माथा टेकल्याशिवाय त्यांच्या गिरणीचा भोंगा सुरू होत नाही किंवा पिठासाठी पट्टा चढवला जात नाही. पारंपरिक जोगणी उत्सव इकडे आनंदाने साजरा होतो. यामध्ये बारा बलुतेदारांचा विचार होऊन या स्थानिक सणात चांभार, लोहार, सुतार, गुरव, मातंग, पाटील, न्हावी इ. लोकांना मानपान दिला जाऊन ते ते लोक आपली जबाबदारी श्रद्धेने पार पाडत असतात. यामध्ये दांडपट्टा हा पारंपरिक खेळ- कला सादर करणारे फकीरा ग्रुपचे इंजिनिअर संतोष साठेही आपली वर्णी लावत असतात. केशवसुतांना वेड लावणारी तुतारी आमचे राघव गुरवजी फुंकतात आणि त्यांची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला घ्यावी लागते. कोकणात असलेल्या दशावताराप्रमाणेच या उत्सवात जोगा-जोगी यांची माणसांच्या कड्या करून कडक बंदोबस्तातून गावभर मिरवणूक काढतात व विविध कला व गुणदर्शन कार्यक्रम मध्यवर्ती ठिकाणी संपन्न होतात. याबरोबरच आषाढात ‘बैलपोळा’ हा सणही तितकाच रमणीय असतो. घरी पुरणपोळी आणि बैलांना-गुरांना कामातून विश्रांती. आणि संपूर्ण सजवून एखादा शेतकरी त्याचे राजबिंडे बैल चौकाचौकांतून मिरवतो तेव्हा त्याची छाती अभिमानाने फुगलेली असते.
सिंधुदुर्गात काही ठिकाणी दिसणारी पारंपरिक ‘गावपळण,’ अशा धर्तीवर वेशीवर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या उत्सवात संपूर्ण दिवस गावातून बाहेर मंदिरात ऊठबस, जेवणखाण, महाप्रसाद इ. कार्यक्रम होतात. पारंपरिक कुस्ती, तमाशा इ. सांस्कृतिक कार्यक्रमही अशा उत्सवात होत असतात. एक एकरात पसरलेला माझा चौसोपी वाडा म्हणजे दगड-माती बांधकामातील स्थापत्त्यशास्त्राचा उत्तम नमुना. म्हणून तीनशे वर्षांपासून दिमाखात उभा आहे. वाड्याशेजारी ‘विद्याशिष’ या आमच्या बंगल्याने आधुनिकता जवळ केली आहे. पण माझं मन माझ्या वाड्यातच जास्ती रमतं, कारण माझ्या २५ वर्षांच्या सुखद आठवणीचे कितीतरी कप्पे कोनाडे, खुंट्या, माजघर यातच अडकलेले आहेत. घरासमोर ओढा, त्यामुळे आमच्याकडील कोणत्याही मुला-मुलींना महिन्याची फी भरून स्विमिंगपूलसाठी प्रवेश घ्यावा लागत नाही. पोहण्याची कला, गाड्या चालवण्यातील हिंमत ही आईबाबांच्या प्रेरणेतूनच आली आहे.
आम्ही डझनभर मुलं वाड्याच्या अंगणात, परसात, बागेत धुमाकूळ घालायचो. उन्हाळ्यात चमचा अन् कुंडा (वाडगा) घेऊन कुरड्या पीठ, भातवडी पीठ, पापडाच्या गोळ्या हडप करायचो. वाळवणातील अर्धवट सुकलेल्या पापड्यासुद्धा लंपास व्हायला लागल्या की आई-काकू ओरडायच्या, ‘‘अरे घरी काय नुसता प्लास्टिकचा कागदच आणू काय आम्ही?’’ तर कधी वैतागून म्हणायच्या, ‘‘खावा खावा भुतांनो! आम्हाला तळायला कष्ट नको आणि तेलपण वाचवताय.’’ भर रणरणत्या दुपारी हनपाचाचाचा बर्फाचा गोळा खायला, गारेगार कलिंगड खायला वानरसेना हजर व्हायची. शेजारचा बंडू ‘गोळेवाला आलाय हळी मारू का?’ असं सुचवायचा. स्वतःच्याच वडिलांकडे प्रेमानं हट्ट करावा तसं सगळेजण बाबांकडे आईस्क्रीम मागायचे. हा ‘वितरण सोहळा’ अजूनही प्रथेप्रमाणे सुरू आहेच, फक्त सेना बदललीय.
इकडे सासरी कोणी ‘सुंदर थालीपीठ करते हो अंजली!’ असं म्हणलं तर फक्त समोर दिसतं आईचं रूपडं. अजूनही माहेरी गेल्यावर आईच्या हातचं थालीपीठ-लोणी खाल्ल्यावर ‘कृष्णस्वर्गसुख’ प्राप्त होतं. कारण प्रत्यक्ष वासुदेवाला- कृष्णाला- ‘मातृहस्तेभोजनं’ अतीव प्रिय होतं. मी तर सामान्य प्राणी! आईच्या हातची खर्डा-भाकरी-पावटे, गुळाचा सांजा, खीर, कटाची आमटी ही यादी न संपणारी. ज्या दिवशी माहेरी जायचं त्याच्या आदल्या रात्री झोप लागत नाही. माहेरच्या आठवणींचा हादगा फेर धरून डोळ्यासमोर नाचू लागतो. पुन्हा त्याच आठवणींच्या परिघावर…! ‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात, माहेरी जा सुखाची तू कर बरसात!!’
बत्तीसशिराळा येथील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. येथे घराघरांतून लहान-थोर सर्पमित्र आहेत. या दिवशी विधीवत जिवंत नागांची पूजा त्यांच्या दातांसह केली जाते. गणेशोत्सवात चौकाचौकांत सार्वजनिक गणेशमूर्ती पूजल्या जातात व विविध कलादर्शनाचे कार्यक्रम होत असतात. पारंपरिक गौरीपूजन, भाजी-भाकरी, पुरणपोळी आणि सोळा प्रकारचे नैवेद्य मोठ्या हौसेने केले जातात. रात्ररात्र डोक्यावरचा पदर ढळू न देता झिम्मा-फुगड्या रंगतात. दिवाळी पाहुण्यांनी गजबजलेली, चैतन्याने भरलेली, दिव्यांनी नटलेली असते.
आज माझी पस्तीशी ओलांडली तरी भाचीमंडळी- पाखरू अन् कोकरू- लंगडी खेळायचा हट्ट करतात. अन् रात्री माझी आई पायाला तेल लावते अन् म्हणते, ‘शिंग मोडून वासरात काय गं नाचतेस?’ अस्मिता अन् अक्षरा, मृण्मयी यांच्या चिमुकल्या डोळ्यांतील भाव पाहिला की ‘मी’पणा गळतो. पुन्हा नव्याने मोठं होऊन जगण्याला बळ येतं.
हुरहूर लावणार्‍या कातरवेळी
मन कसं झिम्माड होतं
नाचतनाचत गातं कसं
माहेरच्या अंगणात जातं
कधी टपटप गारा वेचतं
अन् अबोलीचे गजरे गुंफतं
कधी कुंदीच्या चांदण्यात न्हातं
सारवल्या जमिनीचा गंध लेवुनी
सोप्यामधील पुस्तकांच्या ढिगार्‍यात
उगाचच गुरफटून बसतं
धुळकट गोदरेजच्या कपाटात
छोट्याशा केसांचं रुपडं पहातं
कोनाड्यातील पावडर फवारून
लोलक सुखमय झुबे घालतं
माजघरातील फडक्यांनी तोंडबंद बरणीतून
आंबट-गोड फोड चाखत
आजीच्या मऊशार गोधडीत
मन लपेटून बसतं
दगडी उंबरठ्यावर बसून
भडंग-पोहे फस्त करतं
न्हाणीघरातून बाहेर पडणार्‍या
पांढरट पाण्याबरोबर
अमोघ आठवणींचे धुरांचे लोट वाहत
गाभूळलेल्या चिंचा अन् आवळ्यात
जिवलगांना साद घालतं
शब्दकोडं सोडवताना मध्येच लुडबुड करतं
हौसेने बांधलेल्या झुल्यावर बसून
अणुरेणू इतकं लहान होतं…
…बालपणीच्या परिघावर पुन्हा पुन्हा झुलून येतं