हार्ट ऍटॅक (भाग -२)

0
146

– डॉ. स्वाती अणवेकर

सॅच्युरेटेड फॅट्‌स –
असे चरबीयुक्त पदार्थ जे कोरोनरी धमनीमध्ये प्लाकचा थर निर्माण करतात. अशा प्रकारची चरबी ही मांस व दूग्धजन्य पदार्थांपासून शरीरात साठते. यात प्रामुख्याने बीफ, पोर्क, मटण, चीज, बटर, पनीर, खवा, मिठाई इ. पदार्थांचा समावेश होतो. अशी चरबी जेव्हा रक्तात साठते तेवहा ती हृदयाच्या प्रमुख रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण करते तसेच ङऊङ हे वाईट कोलेस्ट्रॉल जे प्रमाण वाढवते व चांगल्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.
ट्रान्सफॅट्‌स –
अजून एक चरबीचा पदार्थ जो हृदयाच्या आरोग्याला हानीकारक आहे तो म्हणजे ट्रान्सफॅट. यालाच हायड्रोजेनेटेड फॅट असे देखील म्हटले जाते. हे कृत्रिमरित्या तयार केले जाते व हे प्रामुख्याने प्रोसेस अर्थात प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांमध्ये अधिक आढळते. आपण सर्रास वापरत असलेले डाल्डा हा प्रकार ट्रान्सफॅटस्‌चे एक उत्तम उदाहरण आहे.
हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वात जास्त धोका कुणाला असतो ते आता आपण पाहूया ः-
उच्च रक्तदाब असणारी व्यक्ती – कारण सतत रक्तदाब वाढलेला असणे हे आपल्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य खराब करते, त्यामुळे त्यांच्यात प्लाकचा थर सहजपणे साठू शकतो.

हाय कोलेस्ट्रॉलचा स्तर –
कारण यात देखील रक्तवाहिन्यांच्या आत प्लाकचा स्तर साठून त्यांच्या आतील पोकळी कमी करून रक्तवहनास अडथळा निर्माण करते, ज्यामुळे पुढे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हाय ट्रायग्लीसराईड्‌स –
असे वाढलेले ट्रायग्लिसराईड्‌स हे आपल्या रक्तवाहिन्या सहज ब्लॉक करते ज्यामुळे रक्तवहनास अडथळा उत्पन्न होतो. तसेच असे अन्नामधून अधिक सेवन केलेले ट्रायग्लिसरायड हे चरबीच्या स्वरुपात साठून राहते व त्यापेक्षा जे अधिक असते ते रक्तसंचारात प्रविष्ट होऊन रक्तवाहिन्यांमध्ये प्लाकची निर्मिती करते.

डायबेटीस ः
डायबेटीसच्या रुग्णाने जर आपली रक्तातील साखर आटोक्यात ठेवली नाही, तर अशी वाढलेली साखर ही रक्तवाहिन्यांचे आरोग्य खराब करते. त्यात हृदयाची कोरोनरी आर्टरी देखील अपवाद नाही. आणि त्यामुळे नक्कीच हृदयाचे आरोग्य बिघडून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

स्थुलता ः
आपले वजन जर आवश्यकते पेक्षा अधिक असून जर आपण स्थूल या गटात बसत असाल तर सावधान. कारण आपण देखील हृदयविकाराच्या झटक्याचे शिकार होऊ शकता. कारण स्थूलपणा हा डायबेटीस, हायकोलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशर, हाय ट्रायग्लीसराईड्‌स घेऊनच बरेचदा येते.
धुम्रपान ः
वारंवार धुम्रपान केल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात व त्या आपली लवचिकता गमावतात ज्यामुळे त्या अरुंद देखील बनतात आणि त्यातूून रक्तवहन नीट न झाल्याने पुढे हृदयविकाचा झटका येऊ शकतो.
वय ः
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत्या वयासोबत वाढत जातो. पुरुषांमध्ये साधारणतः वयाच्या पंचेचाळीशी नंतर, तर स्त्रियांमध्ये वयाच्या पंचावन्न वर्षानंतर याचा धोका जास्त संभवतो.
कौटुंबिक इतिहास ः
आपल्या घरात जर या आजाराची अनुवांशिकता असेल तर त्या व्यक्तींना याचा धोका जास्त संभवतो, जसे आपले सर्व रक्ताचे नातेवाईक यापैकी जर बर्‍याच जणांना हृदयरोग असेल तर मग अशा व्यक्तींना लहान वयात देखील हृदयरोग होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
अन्य कारणांमध्ये मानसिक ताण, व्यायामाचा अभाव, अनावश्यक औषधे घेणे, नीट झोप न घेणे, विश्रांतीचा अभाव ही आहेत.
आपण या आजारापासून स्वतःचा बचाव कसा करू शकता ते आता आपण पाहू ः
आहारामध्ये फळे, भाज्या, फिल्टर तेल, शेंगदाणे, बदाम अक्रोड इ. दाण्यांचे योग्य प्रमाणात सेवन, साजूक तूपाचा आहारात योग्य प्रमाणात वापर तसेच आहारात माशांचा योग्य प्रमाणात व बेताने वापर, कोंडा असलेली धान्ये, कडधान्य यांचा वापर आहारात जास्त करावा.
तसेच साखर, मैदा, कॉर्नफ्लोअर यासारखी रिफाईंड पीठे, फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, चीज, बटर, बेकरीचे पदार्थ, रिफाईंड तेल, डालडा यांचा वापर न करणे.
तसेच तंबाखू, दारू, सिगारेट यासारखी व्यसने ही देखील हृदयाचे आरोग्य खराब करतात.
दैनंदिन जीवनात हरी व वरी तसेच करी अर्थात रेड मीट पासून बनवलेली यापासून लांब रहावे. रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठावे. नियमित कोणत्याही प्रकारचा व्यायाम करावा ज्याने शरीराची थोडी हालचाल होईल तसेच मानसिक तणाव, कामाचा अती ताण यापासून दिवसातून काही क्षण विरंगुळा व विश्रांतीकरिता देणे आवश्यक आहे. आपला आवडता छंद जोपासणे हे देखील हृदयाच्या आरोग्याला उत्तम आहे. तसेच प्राणायाम व ध्यान करणे हे देखील हृदयाच्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त आहे.
आयुर्वेदिक उपचारांमध्ये ः
स्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती, हृदबस्ती, शिरोधारा यांचा चांगला उपयोग होतो. तसेच औषधांमध्ये अर्जुन, कढीपत्ता, लसूण, त्रिफळा, त्रिकूट, मंजिष्ठा, गुळवेल ई औषधांचा चांगला उपयोग होतो.
या सर्व उपचारांबरोबरच वर्षातून एकदा कार्डीयोग्राम, ईको, रक्त तपासणी, स्ट्रेेस टेस्ट अशा तपासण्या तज्ज्ञ वैद्यांकडू करून घ्याव्या व आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायला हातभार लावावा.