सोसण्याचा सोस बाई सोड गं…

0
307

 पुरुषा’च्या मनाचा कोतेपणा ’बाई’च्या मनाच्या प्रचंड मोठेपणात फार गोंडस रुपात झाकला आहे. संस्कृतीने फार हुशारीने तिच्या सोसण्याचा सोहळा करुन तिला इतकं उदात्त करुन ठेवलं आहे की तिच्यावर अन्याय करणारा पुरुषच मग भला ठरवला गेला आहे!..

मुलगा आईला म्हणाला
दिव्याची वात जरा मोठी कर
मला वाचता येत नाही.
वडील म्हणाले
दिव्याची वात जरा छोटी कर
मला झोप येत नाही.
आई रात्रभर वात लहान – मोठी
करत राहिली,
दोघांमधे आयुष्यभर
वातीसारखी जळत राहिली !

प्रशांत असनारे यांच्या या कवितेतून वर्षानुवर्षे चालत आलेलं
स्त्रीचं हे झिजणं, जळणं काळजात रुतत राहतं.. स्त्रीची ही वेदना जिवंतपणे समोर येत राहते..
हे सगळं खरं आहे पण मला इथे आज काही वेगळंच म्हणायचं आहे. स्त्रीच्या आयुष्याचे असे गोडवे सार्‍यांनीच वर्षानुवर्षे गायले आहेत. तिची तोंड भरभरून स्तुती केली आहे. तिला उदात्तपणाच्या मखरात बसवून तिची पूजाही केली आहे, पण खरी मजा पुढेच आहे आणि त्यासाठीच तर ८ मार्चसारखे जागतिक महिला दिन साजरे करुन महिलांना त्यांच्या स्वत्वाची जाणीव करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही ‘महिलादिन’ साजरा होईल. वृत्तपत्रे, टीव्ही व अखिल सोशल मीडियावर हा आठवडाभर स्त्रियांचे हक्क, अधिकार, संरक्षण, कायदे अशा विविध विषयांच्या चर्चा झडतील. समस्या, गुन्हेगारीचा ऊहापोह होईल. स्त्रित्वाच्या विचारांचा हा महासागर पुन्हा एकदा ढवळून काढला जाईल…
वर्षानुवर्षे एवढा बोलबाला होतो आहे तरीही स्त्रीवरचा अन्याय मात्र फिटत नाही. हा भेद मिटता मिटत नाही ही वस्तुस्थिती आहे. घर – संसार, नोकरी, मुलं – बाळं, शिक्षण, काम, छंद, करिअर अशा सगळ्या जबाबदार्‍या कटिबद्ध करणारी आजची स्त्री ही साक्षात समर्पणाचे एक युद्ध बनून राहिली आहे.
साडी म्हणजे सगळ्यासाठी कटिबद्ध
साडी म्हणजे समर्पण आणि युद्ध
साडी म्हणजे तुफानी तांडव
साडी म्हणजे हरलेले पांडव

अखंड उर्जेच्या या तुफानी तांडवाचं नशीब शेवटी ’हरलेले पांडव!’ हेच ठरतं आहे ही स्त्रीजीवनाची खरी शोकांतिका आहे… द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून सुरू झालेली स्त्रीच्या आयुष्याची ही परवड अगदी कालपरवाच्या गुरमेहेर कौरच्या ताज्या घटनेपर्यंत तशीच चालू आहे. वर्षानुवर्षे हा लालभडक प्रवाह ठसठसत वाहतो आहे..
ही परवड होण्याला पुरुष, कुटुंब, समाज जसा जबाबदार असतो, तशीच ती स्वत:ही तेवढीच जबाबदार असते. तिच्या मनात लहानपणापासून व्यवस्थेने निर्माण केलेली दहशत, दबाव, न्यूनगंड व स्वाभिमानशून्यता यामुळे ती फार दुबळी बनलेली असते, तर पुरुष वर्चस्व गाजवणारा,अहंकारी बनलेला असतो. त्याची बाईकडे बघण्याची दृष्टीच बरेचवेळा कलुषित असते. एक वस्तू, एक भोगवस्तू, एक यंत्र अशा दृष्टीने तो तिच्याकडे पाहतो. त्याच्या दृष्टीने बाईने नीट संसार करावा, जेवणखाण, सणवार, पै पाहुणा यांचं आगत स्वागत करावं, मुलाबाळांना व आपल्याला प्रेमाने सांभाळावं, नोकरी करावी, पैसा मिळवावा – यापेक्षा आणखी काही तिला कशाला हवं? तिचं सगळं सुख आपल्या संसारातच असलं पाहिजे असा एक विचित्र हेका तिला घरातून सतत सहन करावा लागतो. तिच्या डोक्यावरचा अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो.तिचं सुख कशात आहे हेही पुरुषाकडूनच ठरवलं जातं!
दुसरं एक चित्र असं दिसतं की एखाद्या बाईच्या भलेपणाचे इतके गोडवे गायले जातात की तिला एकदम ’देवी’च बनवलं जातं! (टी.व्ही.वरच्या मालिकांमधे नाही का हिरॉईन फक्त आणि फक्त चांगल्या गुणांचीच दाखवलेली असते. तिचं कधी काही चुकतच नसतं. ती एकदम आदर्श आणि जणू ’देवी’च असते!) पुरुषाच्या दृष्टीने बाईचं हे ’देवी’असणं खूप सोयीचं व सुरक्षित असतं. त्यासाठी तो खूप आटापिटा करतानाही दिसतो.
नीती अनीतीच्या भन्नाट कल्पना फक्त स्त्रीसाठीच असतात. पुरुषाला त्या बंधनकारक नसतात हाही एक महत्वाचा भाग आहे. असं अंगात ’देवीपण’संचारलेली बाई स्वत:वरच खूष होऊन वेड्यासारखी कामांचा झपाटा लावते. मला सगळं करता येतं, मी सगळं करु शकते, मी जेवणही छान करते, घरही नीट ठेवते. नोकरी करते. पैसा मिळवते, करिअर करते, मुलांचा अभ्यास घेते. नवर्‍याला हवं नको बघते. नाती सांभाळते. सणवार व्रतं वैकल्यं करते. संस्कृती सांभाळते. फिगर मेंटेन करते, योगा करते, सुंदर दिसते!
संसार माझा.. सुखाची दोरी माझ्या हातात.. भल्याबुर्‍याची – नवरा ताब्यात राहण्याची- संसार टिकण्याची- समंजसपणाची जबाबदारी माझी. मला संसार हवा. मुलं, नवरा, पैसा – अडका, गाडी, बंगला, दागदागिने, भांडीकुंडी, फिरणं – सवरणं सगळं हवं..मी मी मी… मला मला मला..सगळं माझ्या खांद्यावर!
बाई अशी ’सुपरवुमन’ होण्याचा धडाकाच लावते. दिखाऊपणाचे हे डोलारे उभे करता करता स्वत:ला नक्की काय आवडतंय, काय हवंय, काय टोचतंय, काय सुखावतंय याकडे ती दुर्लक्ष करते आणि मनाने व विचारांनी अधिकाधिक बंदिस्त होत जगण्यातला खरा आनंद हरवून बसते. नव्या युगात हे तिचं नव्या रूपात झिजणंच असतं, जे तिच्याही लक्षात येत नाही.
संसारातल्या हर एका सुखदु:खासाठी नवर्‍यापेक्षा स्वत:ला जबाबदार धरणं, अन्याय सहन करत राहून सहानुभूती मिळवणं, शेवटी बाईचा जन्म आपला, काय करणार? गप्प बसायचं आपण!अशी धन्यता मानणं ही सगळी बाईची ऑब्सेशन्स् आहेत व तीच तिला पुन्हा पुन्हा दु:खाच्या वाटेने चालवत राहतात…
या सर्वाला आपली एका बाजूने फार वेगळेपणा असलेली आपली दिव्यत्वाची संस्कृती व परंपराही तिच्या सोसण्याला साथ देतात.
एक मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो तो म्हणजे बाईवर केलेल्या अन्यायाला आपल्या संस्कृतीने दिलेलं खूप गोंडस रुप आणि उदात्त वेष्टनात गुंडाळलेलं बाईचं अपार दु:ख!
इथे सगळ्यांत आधी मला सीतेची आठवण होते! लोकमानसात खोलवर रुजलेली रामायण महाभारत ही महाकाव्ये हे आपलं एक दिव्य संचित आहे हे पूर्ण मान्य असलं तरी त्यात अशा अनेक जागा दिसतात की जिथे बाईचं माणूसपण नाकारून व्यवस्थेने तिला चाणाक्षपणे देवी करुन टाकलं आहे की जेणेकरुन तिला स्वत:चा व माणूस म्हणून भलं बुरं असण्याचा विसर पडावा.
’पुरुषा’च्या मनाचा कोतेपणा ’बाई’च्या मनाच्या प्रचंड मोठेपणात फार गोंडस रुपात झाकला आहे. संस्कृतीने फार हुशारीने तिच्या सोसण्याचा सोहळा करुन तिला इतकं उदात्त करुन ठेवलं आहे की तिच्यावर अन्याय करणारा पुरुषच मग भला ठरवला गेला आहे! सीता आणि राधेच्या कहाण्या हेच तर दर्शवीत नाहीत ना?
द्रौपदीची अन्यायकथा मात्र खर्‍या जीवनाचं, त्यातल्या भल्याबुर्‍याचं दर्शन घडवणारी. पण तिच्या सुडामुळे शेवटी युद्ध झालं, विनाश झाला असं म्हणून तिच्या कहाणीला ’कलीयुगी’ ठरवलं गेलं.
सीता व राधेची भक्ती निदान राम आणि कृष्णाबरोबर तरी करतात पण द्रौपदीची भक्ती कुणी करत नाही. तिचं मंदिर कुणी बांधत नाही! त्यातल्या त्यात हा आणखी एक भेद. स्त्रीचे चारित्र्य पणाला लावून तिच्या वर्मावर बोट ठेवणारा! अर्थात द्रौपदीचे मंदिर नसले तर नसूदेच, त्याची गरजच नाही. तिच्या तेजाचा लखलखीत वारसा आज अनेक अग्निकन्या समर्थपणे चालवत आहेत हेच आपल्यासाठी खूप आहे.पण त्याचबरोबर आपले घोर दुर्दैव असे की तिच्यावर झालेल्या अत्याचाराची विखारी वेलसुद्धा नव्या नव्या भयानक रुपात जिथे तिथे फोफावलेली आज आपल्याला दिसते आहे…
अहिल्या, मंदोदरी, कुंती, गांधारी, देवकी, ऊर्मिला, अंबा, शकुंतला, माधवी अशा अनेकजणींच्या जीवनकथा मला यासंदर्भात वेगळ्या दृष्टीने बघाव्याशा वाटतात.
पुराणकाळच नव्हे तर अलीकडचा ऐतिहासिक काळ बघितला तर त्यातही रजपूत स्त्रियांचा जौहार, सतीची परंपरा, ब्राम्हणस्त्रियांनी भोगलेली केशवपनाची क्रूर प्रथा,दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी स्त्रियांचं शोषण, गुलामी, वेठबिगारी, बालविवाह, अशा अनेक गोष्टींमधून बाईच्या वेदनेची पाळमुळं खोल खोलवर गेलेली दिसतात आणि मन विषण्ण होऊन जातं.
अर्थात स्त्रीच्या या दु:खाने नंतरच्या काळात परिस्थितीशी संघर्ष केलेलाही दिसतो. खूप प्राचीन काळात
अरे विठ्या अरे विठ्या
मूळ मायेच्या कारट्या
असं म्हणणार्‍या जनाबाईने
डोईवरचा पदर आला खांद्यावर
भरल्या बाजारी जाईन मी
असं म्हणायचं धाडस केलं. मुक्ताईने स्त्रीच्या जखडल्या बुद्धीला विद्वत्तेच्या तेजाने मुक्त केलं. तसंच अगदी अलीकडच्या काळात सावित्रीबाई रमाबाईही झाल्या. अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे जिद्दीने दु:खावर मात केली आहे.
सकारात्मक बघायचं तर खूप काही आहे पण नकाराच्या घंटाही अजून तशाच आक्रोशताना ऐकू येताहेत ही आपली खरी खंत आहे! आजच्या घडीलाही स्त्रीपुरुषात एक प्रचंड मोठी दरी आहे. अजूनही म्हणावं त्या प्रमाणात हे अंतर मिटलेलं दिसत नाही. हा भेद फिटता फिटत नाही. किंबहुना-
सोस तू माझ्या जीवा रे
सोसण्याचा सूर होतो
सूर साधी ताल जेव्हा
भार त्याचा दूर होतो
अशी ’ग्रेस’ तिच्या सोसण्याला आजही मिळत राहते आणि जुन्याच वाटेवरुन नवं दु:ख सोसत ती चालत राहते असं म्हटलं तर वावगं ठरेल का?
निदान हे असं म्हणून तरी, बाईचं सोसणं संपेल का?
ऐक बये…दार उघड तुझ्या विचारांचं..

सोसण्याचा सोस बाई सोड गं
आसवांचा पूल आता तोड गं
वाहते आहे नदी ही जीवनाची
त्यात तारु हे धीराचे सोड गं…

कंटकाचे शल्य आहे या पथाला
पाय तू हळुवार त्याचा मोड गं
तूच माता तू पिता तू पुत्र कन्या
तूच धागे उसवलेले जोड गं…

सोसण्याचा सोस बाई सोड गं…