नाती जपताना….

0
305

मुग्धा कुलकर्णी कुटुंबातील तशी एकुलती एक मुलगी. तिचा विवाह हा तसा त्या कुटुंबातील घरातील जवळजवळ शेवटचाच. कारण दोन्ही मोठ्या भावांची लग्ने होऊन काही वर्षे उलटली होती. कुलकर्णी कुटुंब म्हणजे काही वेगळंच, अर्थातच चांगल्या अर्थाने. आठ दहा जणांचं ते एकत्र कुटुंब. शिवाय दररोज कुणी ना कुणी पाहुणा, परिचित हा जेवणाला असणारच. जयंतराव व त्यांच्या पत्नी राधा आता निवृतीचे जीवन सुना नातवंडासमवेत आरामात व आनंदात घालवित आहेत. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यापासून त्या दोघांनीही एक गोष्ट ठरवूनच टाकली होती. ती म्हणजे महिन्यातून निदान चार दिवस तरी निरनिराळ्या पाहुण्यांकडे जायचे. त्यात त्यांचा विचारही अगदी साधा व सरळ होता. केवळ आनंद मिळविणे, मजा करणे, आराम करणे असा नसून आजपर्यंतच्या धावपळीच्या जीवनात आपल्या बहिणी, इतर नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे मनात असूनसुद्धा, अनेकांचा आग्रह असूनसद्धा जाणे जमतच नव्हते. मग त्याची भरपाई आता या निवृत्तीच्या काळात करायची. पण त्यांचा हा विचार एकमार्गी नव्हता, तर तो होता व्दिमार्गी. म्हणजे ते ज्यांच्या घरी जात, त्यांना आपल्या घरी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत असत. मग त्या लोकांनासुद्धा आग्रह मोडताच येत नसे आणि त्याहून चांगली गोष्ट म्हणजे कुलकर्णींकडे येणारा अतिथी कुलकर्णीच्या घरचे ते वातावरण, कौटुंबिक जिव्हाळा अनुभवल्यानंतर पुन्हा येण्याची संधी शोधतच असे.

एकंदरीत जयंतरावाच्या घरी महिन्याभरात दोन चार दिवस कुणी ना कुणी पाहुणा असायचाच. दोन्ही सुनांच्या माहेरची मंडळी तर संधीच सोडत नसत. किंबहुना कोणते ना कोणते निमित्त काढून मुक्कामच ठोकायचे. हे सर्व ह्या दिवसांत काहीसं अकल्पित वाटत असलं तरी ते वास्तव होतं, आणि या वास्तवाचा आनंद कुलकर्णीच्या कुटुंबातील प्रत्येकजण उपभोगत होता अगदी मनापासून.
अशा कुटुंबातील मुग्धा विवाहानंतर सामंताच्या घरी गेली. नवलाईचे चार दिवस संपले. एक दोन दिवसांतच पाहुणे मंडळी परतली. आणि मग मात्र एक अनोळखी, अपरिचित असे कौटुंबिक जीवन मुग्धाच्या वाट्याला आले. मुग्धा दिवस ढकलीत होती. ते एकसुरी जीवन तिला अगदी नवीनच होते, तितकेच असह्यही होते. कुठे जाणे नाही, पाहुणे नाहीत, प्रवास नाही की कुणाच्या नव्या ओळखी नाहीत. सारे काही एकसुरीच. हे सर्व सहन करीत मुग्धा संसारात स्वत:ला गुंतवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. महिन्यातून चारपाच दिवस माहेरी गेल्यावर, मात्र तिच्या जीवाची ही तगमग भरून येत होती. एकदोन वेळा तिचे आई बाबा, दोघे भाऊ सपत्नीक आले, पण त्यांना राहाण्याचा आग्रह झालाच नाही, त्यांचे येणे कुणाला – मुग्धाशिवाय अन्य कुणालाच – हवेहवेसे वाटत आहे असे असे दिसत नव्हते. याउलट असे कुणाचे येणे म्हणजे त्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात कुठेतरी अडचण निर्माण करीत आहे असेच भासत असे.
ते वर्ष मुग्धाने सर्व काही पाहून त्यावर आपल्या मनाप्रमाणे विचार करण्यातच घालविले. शेवटी ह्या कुटुंबाला या विचारसरणीतून कसे बाहेर काढायचे याचे मार्ग ती शोधू लागली. तिने एक दोन मार्गाचा अवलंबही सुरू केला. आपण कोणत्याही गोष्टीला हात घालणार तर आपल्या नवर्‍याची साथ हवी हा एक विचार तिने पक्का केला व त्यानुसार तिने पावले टाकायला सुरूवात केली. संध्याकळी बाजारात खरेदीसाठी जातेवेळी ती आपल्या मनातील विचार संतोषला सांगून ते पटवून देऊ लागली. त्या दोन महिन्यांच्या कालावधीत तिने संतोषला त्याच्या दोन सख्ख्या बहिणीकडे नेऊन दोन तीन दिवस राहाण्यात ती यशस्वी ठरली. हळूहळू हा प्रयोग यशस्वी होऊ लागला. काही महिन्याच्या कालावधीतच सासरच्या बहुतेक नातेवाईकांकडे ती जाऊन आली. मुख्य म्हणजे आपले येणे कुणालातरी हवे आहे, आवडते ही गोष्टच संतोषचे मन बदलायला कारणीभूत ठरू लागली. शेवटी तर पुढच्या रविवारी कुणाकडे जायचे याचे सूतोवाच संतोषकडूनच होऊ लागले. त्याचबरोबर मुग्धा संतोषसह आपल्या माहेरच्या लोकांकडे जाऊन आली. ही गोष्ट तिच्या सासूबाईला खूपच आवडली. इतकी की एक दोन वेळा तिनेच खास खाऊ करून त्यांच्या सोबत पाठविलासुद्धा.
त्या घरी एखाद्या कुणा पाहुण्याच्या लग्नाचे किंवा काही खास धार्मिक किंवा अन्य काही कार्यक्रमाचे आमंत्रण हे फक्त वाचनानंतर टेबलावर पडून असायचे. त्या आमंत्रणाला मान दिला पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे हा विचार त्या कुटुंबात कधी रूजलाच नव्हता, मग त्याची अंमलबजावणी तर दूरच. अशा कार्यक्रमाला न जाण्याची हजार कारणे सगळ्यांकडेच तयार असत. मुग्धाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. नातेवाईकाकडून किंवा अन्य परिचिताकडून कोणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण आले की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे, त्यात सहभागी व्हायचे असा एक विचार तिने पका केला. त्या दिवसात पार पडलेल्या सर्व विवाहसमारंभांना ती संतोषसह आवर्जून सहभागी झाली. साहजिकच नातेवाईकांच्या व इतरांच्या ओळखी वाढल्या, जवळीक वाढली, नातेसंबंध अधिक घट्ट व्हायला लागले, आणि मुख्य म्हणजे असे कार्यक्रम आटोपल्यावरसुद्धा काही ना काही निमिताने एकमेकांच्या घरी येणे जाणे होऊ लागले.
आता तर संतोष बरोबरच मुद्ग्धाने आपल्या सासूचे मन बदलले व तिला अशा कार्यक्रमाला सहभागी करून घेण्यात ती यशस्वी झाली.
एका वर्षाच्या कालावधीत एकलकोंडे, सर्व नातेवाईकांपासून अलिप्त पडलेले ते कुटुंब पूर्णपणे बदलले, आपल्या घरी कुणी आले नाही तर त्याची रूखरूख त्यांच्या सर्वांच्याच बोलण्यातून व्यक्त होऊ लागली. नातेवाईकांपासून अलिप्त असलेले सामंत कुटुंब आता इतके सामाजिक बनले की, एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती ही त्या सर्वच नातेवाईकांच्या काळजीचा, चिंतेचा विषय बनू लागली.
आजकाल सगळेच आपले नातेसबंध दुरावण्याला आजच्या धकाधकीच्या जीवनाच्या कारणाची ढाल पुढे करतात. आपण मनात आणले, ठरविले, निश्चय केला, मनावर घेऊन त्याची अंमलबजावणी केली तर अशी ढाल पुढे करण्याची पाळीच येणार नाही. उलट ही जपलेली नातीच आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील, फक्त आपणच विचार करून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे, जो विचार मुग्धाने केला व संतोषच्या संमतीने व इतरांच्या साहाय्याने अमंलातही आणला. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतसुद्धा नाती जपणे हे आपल्या प्रत्येकाच्याच हातात आहे!