भरती घोटाळा

0
115

लष्करातील लिपिक आणि अन्य तत्सम कनिष्ठ पदांच्या भरती परीक्षांच्या पेपरफुटीचे प्रकरण एका बड्या टोळीकडे अंगुलीनिर्देश करते आहे. सध्या पकडले गेलेले सगळे दलाल किंवा मध्यस्थ असले तरी प्रत्यक्षात काही वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांच्या संगनमताविना अशा प्रकारे पेपर फुटणे असंभव वाटते. त्यामुळे या सार्‍या प्रकरणातील बडे मासे कोण आहेत याचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण होते. गोव्यासह पुणे, नागपूर, नाशिक आदी परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षेला बसलेल्या परिक्षार्थींकडून लाखो रुपये घेऊन त्यांना व्हॉटस्‌ऍपवर परिक्षेपूर्वीच पेपर देण्याच्या या सार्‍या कारस्थानात काही कोचिंग क्लासेसचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच ही सगळी एक मोठी साखळी आहे आणि हे प्रकार किती काळ चालू असतील सांगता येत नाही. या टोळीने केवळ पेपर पुरविलेले नाहीत, तर ज्यांना दुसर्‍या केंद्रातून परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी तेथील निवासी दाखले पुरविण्याची व्यवस्थाही ही टोळी करीत होती. म्हणजेच ही सर्व मंडळी या असल्या कृत्यामध्ये माहीर आहेत. या प्रकरणात लष्करातील निवृत्त अधिकारी आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा सहभाग सध्या दिसून आला आहे. या महाभागांचे नोकरीसंदर्भातील सर्व लाभ रद्दबातल करणारी कडक कारवाई या घडीस झाली पाहिजे, तरच भविष्यात असे गैरप्रकार करण्यास कोणी धजावणार नाही. लष्करासारख्या अत्यंत शिस्तबद्ध मानल्या जाणार्‍या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा यंत्रणेमध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार सहजासहजी घडू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण असले, तरी शेवटी लष्कर ही देखील अशा गैरप्रकारांपासून अलिप्त यंत्रणा नाही हे दुर्दैवाने आजवर अनेकदा दिसून आलेले आहे. सुकना जमीन घोटाळ्यापासून आदर्श इमारत घोटाळ्यापर्यंत अनेकानेक गंभीर प्रकरणांमध्ये लष्करी अधिकार्‍यांची हाव दिसून आली आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात लष्कराच्या अधिकार्‍यांचा हात नसेलच याची खात्री देता येत नाही. या पेपरफुटीमुळे लष्कराच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना भविष्यात कधीही वाव राहू नये यासाठी खबरदारीचे उपाय योजले जाण्याची गरज आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे या उमेदवारांपाशी व्हॉटस्‌ऍपवर आलेल्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्षातील परीक्षेतील प्रश्नपत्रिका ह्या एकसमान आहेत. म्हणजे मूळ प्रश्नपत्रिकाच फोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर त्या प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेची जबाबदारी होती, त्यांच्यावर कारवाई व्हावी लागेल. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये अशाच प्रकारे व्यापमं घोटाळा उघडकीस आला होता. अगदी वैद्यकीय पूर्वपरीक्षांचे पेपरही फोडले गेले होते. त्या प्रकरणाच्या खोलात जाता जाता ते प्रकरण एवढे मोठे असल्याचे आढळले की आजही त्याचे सगळे दुवे उलगडू शकलेले नाहीत. त्यातील अनेक दुवे गूढरीत्या मृतावस्थेत आढळले. त्यामुळे अनेकांचे बुरखे टिकून राहिले. मध्य प्रदेशच्या राज्यपालांपर्यंत त्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले. हा अनुभव लक्षात घेता या लष्कर पेपरफुटी प्रकरणाकडे वरवरचे न पाहता त्याची संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे,, कारण ही पदे जरी कनिष्ठ दर्जाची असली तरी लष्कराच्या यंत्रणेमध्ये शिरकाव त्यातून होत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. गेल्याच आठवड्यात पाटण्यामध्ये बेरोजगार युवकांना लष्करात भरतीचे आमीष दाखवून लाखो रुपये उपटणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश झालेला आहे. लष्कर भरती म्हणजे बेरोजगारांना रोजगाराचे गाजर दाखवून लूटमार करण्याचा धंदा ठरू नये याची खबरदारी लष्कर भरती मंडळाने घ्यायला हवी व त्यासाठी या प्रकरणावर पांघरूण न ओढता त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे.