म्हापसा पालिकेवर व्यापार्‍यांचा मोर्चा

0
93

>> ७०० जणांची धडक, फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी

 

म्हापसा व्यापारी संघटनेने आपल्या प्रदीर्घ मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी व बाजारात फेरीवाल्यांनी रस्त्यावर ठाण मांडून रस्ता अडवल्याने जाब विचारण्यासाठी म्हापसा पालिका कार्यालयावर धडक मोर्चा नेला. संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ७०० ते ८०० व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा पालिका बाजारातील शकुंतलेच्या पुतळ्याकडून नेण्यात आला.
काल सोमवारी सकाळी व्यापार्‍यांनी आपली दुकाने न उघडता शकुंतलेच्या पुतळ्यासमोर हे सगळे व्यापारी जमले. यामध्ये सर्व दुकानदार, भाजी विक्रेते, मासळी विक्रेत्या महिला यांचा समावेश होता. या सर्व व्यापार्‍यांनी एक प्रचंड मोर्चा पालिका कार्यालयावर नेला. यावेळी मामलेदार दशरथ गावस व म्हापशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
पालिका कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी अडविले. संघटनेचे अध्यक्ष शिरोडकर यांनी आपल्या पदाधिकार्‍यांसमवेत नगराध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. नगराध्यक्षांसमवेत यावेळी बाजार निरीक्षक तथा नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो उपस्थित होते. या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली.
यावेळी नगराध्यक्षांनी त्यांना या मोर्चाची आपल्याला पूर्वकल्पना देणे गरजेचे होते असे सांगितल्यावर श्री. शिरोडकर यांनी, आम्ही दि. २४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि नगराध्यक्ष संदीप फळारी यांच्यात चर्चा झाली व नगराध्यक्षांना मोर्चेकरी व्यापार्‍यांशी चर्चा करण्याची विनंती केली. नगराध्यक्षांनी त्यावेळी व्यापार्‍यांच्या समस्यांचा अभ्यास करून येत्या आठ दिवसात त्या सोडवेन असे सांगितले. तर नगरसेवक कार्व्हालो यांनी अनेक व्यापार्‍यांनी दुकानाबाहेरील जागा बिगर गोमंतकीयांना दिल्याचा आरोप केला.
दरम्यान, दरवाजाजवळ व्यापार्‍यांची गर्दी वाढली व त्यांनी कार्व्हालो विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर मामलेदार दशरथ गावस व पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्यासह नगराध्यक्ष फळारी व कार्व्हालो मोर्चाकरांना भेटले व त्यादिवशी दुपारी ४ वा. पोलीस पथकासह पालिका निरीक्षक बाजारात येतील व सर्वांनी यावेळी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. व्यापार्‍यांचे यामुळे समाधान झाले व ते तेथून निघून गेले.
व्यापार्‍यांच्या एकीचे दर्शन
म्हापसा व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चा अभूतपूर्व होता. त्यांचे एकीचे दर्शन म्हापसेकरांना दिसून आले. दरम्यान, आशिष शिरोडकर यांनी सर्व व्यापार्‍यांचे अभिनंदन केले. पत्रकारांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. नगरसेवक तुषार टोपले यांनी यावेळी व्यापार्‍यांना सांगितले की, व्यापार्‍यांवर जो अन्याय होत आहे, त्या अन्यायाविरोधात आपले व्यापार्‍यांना सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारपेठ सुनी सुनी
दरम्यान,काल पालिकेवर व्यापार्‍यांनी काढलेल्या मोर्चामुळे दरदिवशी गजबजलेली म्हापसा पालिका बाजारपेठ काल सकाळपासून दुपारपर्यंत सुनी सुनी झालेली होती. सर्व दुकाने बंद होती. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. मासळी विक्रेत्या महिलांही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मासळी मार्केटही बंद होते.