विधानसभेचे आज एकदिवशीय अधिवेशन

0
79

आज मंगळवार दि. २८ रोजी सकाळी ११.३० वाजता गोवा विधानसभेचे एक दिवशीय अधिवेशन सुरू होणार आहे. एका दिवसाच्या या अधिवेशनात वेगवेगळ्या तांत्रिक मुद्द्यांवरून विरोधी आमदार गोंधळ माजविण्याची शक्यता आहे.

राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातील प्रश्‍न उपस्थित करण्यास अडथळा आणल्यास आपण सभापतींच्या आसनापर्यंत जाण्यास मागेपुढे पहाणार नाही, असे कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले आहे. विधानसभा अधिवेशन बोलावण्यामागचे कारण राज्यपाल आपल्या भाषणात सांगतील, असे अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार असल्याचे अनेकजणांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

या अधिवेशनाला काय अर्थ? : राणे

राज्यपालांनी आज मंगळवारी सकाळी विधानसभेचे अधिवेशन बोलवल्यासंबंधीची नोटीस आपल्याला सोमवारी मिळाली. कामकाज सल्लागार समितीची बैठकही झाली नाही. विधानसभेच्या काही आमदारांनी राजीनामेही दिलेले आहेत. निवडणूक आचारसंहिताही लागू आहे. त्यामुळे या अधिवेशनाला अर्थ काय आहे, हे कळणे कठीण आहे. आपल्या पक्षाच्या काही आमदारांना नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे आजच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासंबंधिचा निर्णय विचारविनिमय करून घेतला जाईल, असे विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी आमदार मते कसे मांडतील, असाही प्रश्‍न राणे यांनी केला. वरील अधिवेशनाची माहिती किमान तार पाठवून देण्याची गरज होती, असे ते म्हणाले. भाजप सरकारने लोकशाहीचा गैरवापर केल्याचा आरोप राणे यांनी केला. विधानसभेतील आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवात हा प्रकार आपण आताच पहात असल्याचे सांगून लोकशाहीचा वापर स्वार्थासाठी करायचा नसतो. परंतु भाजपने तो स्वार्थासाठीच केल्याचा आरोपही यावेळी श्री. राणे यांनी केला.