दातांची व हिरड्यांची काळजी… मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी…

0
512

डॉ. श्रुती दुकळे (पर्वरी)

मधुमेही रुग्णाला संसर्ग होण्याची अधिक शक्यता असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वांत आधी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणले पाहिजे व शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते कायम ठेवले पाहिजे. साखरेचे प्रमाण नियंत्रणात आल्यानंतर प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) देऊन शस्त्रक्रिया करता येते.

भारतात जवळ जवळ ४.९ दशलक्ष लोक मधुमेहेने त्रस्त असल्याची माहिती आहे. ‘मधुमेह’ (डायबिटीज) झाल्यास रक्तातील साखर वाढल्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. डोळे, शरीरातील नसा (नर्व्हज्), मूत्रपिंडं तसेच हृदय यांचे रोग होण्याव्यतिरिक्त दातांचे व हिरड्यांचेही विकार होतात. मधुमेह झाल्यास शरीराची प्रतिकारक शक्ती खालावते, ज्यामुळे जखम भरण्याची प्रक्रियाही खालावते. जखम भरण्यास अधिक वेळ लागतो.
आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास त्याची संपूर्ण माहिती डेन्टिस्टला देणे खूप महत्त्वाचे असते.
* आपल्याला मधुमेह किती वर्षांपासून आहे?
* आपण त्यासाठी कोणती औषधे घेता?
* रक्तातील साखर तपासल्यास त्याचे रिपोर्ट.
* याच्या व्यतिरिक्त इतर कोणते शारीरिक त्रास असतील व त्यासाठी कुठली औषधी घेता ते स्पष्टपणे सांगावे.
मधुमेहाने पीडित लोकांच्या तोंडात काय दिसेल?…
– अनेक किडलेले दात दिसतील.
– हिरड्यांचा संसर्ग असेल.
– लाळोत्पादन पिंडांचे त्रास असतील- सलायव्हरी ग्लँड डिसफन्क्शन.
– विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स.
– त्वचा रोग होऊ शकतात.
– चव कमजोर असू शकते.

‘मधुमेह’ असलेल्या रुग्णाच्या तोंडातील अनेक दात का किडतात?..
– मधुमेहाने पीडित लोकांनी मधुमेहाचा योग्य तो उपचार चालू ठेवला पाहिजे व रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणली पाहिजे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याशिवाय तोंडातील लाळेतही साखरेचे प्रमाण वाढते. याच्या परिणामस्वरूप तोंडातील जिवाणूंची संख्या वाढून दात किडण्याची समस्या वाढते.

मधुमेह व हिरड्यांचे रोग …
– मधुमेही रुग्णांमध्ये हिरड्याचे संसर्ग व इतर रोग अधिक प्रमाणात आढळून येतात. शरीराची प्रतिकारक शक्ती खालावल्यामुळे हिरड्यांचा संसर्ग होतो व तो झाल्यास त्याच्यामुळे होणारे त्रास सहजपणे कमी होत नाहीत. दातांभोवतीचे हाडं निकामी होऊन दात सैल होतात व अखेरीस ते गळून पडतात. हिरड्यांना झालेली इजा भरण्यास लागणारा वेळ मधुमेही रुग्णांमध्ये अधिक असतो. त्यासाठी हिरड्यांची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते.

दात व हिरड्यांचा त्रास कमी करण्यासाठी…
* फ्लोराइड-रहित टूथपेस्टने नियमितपणे योग्य पद्धतीने दातांना ब्रश करावे व दातांवर साठणारा थर व्यवस्थितपणे साफ करावा.
* थर साफ न केल्यास त्याचा साठा होऊन दातांवर खडा जमा होतो. सहा महिन्यातून एकदा डेन्टिस्टकडे जाऊन दात साफ करून घ्यावेत. (टीथ क्लिनिंग किंवा स्केलिंग)
* अधिक रक्षणासाठी माऊथ वॉशचा वापर करावा.
* मधुमेहींनी नियमितपणे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. साखर वाढल्यास त्याचा योग्य तो उपचार चालू ठेवावा.
* पौष्टीक व संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.

मधुमेहामुळे तोंड कोरडे का होते (ड्राय माऊथ) …
– तोंडातील लाळ ही आपल्याला तोंडातील जेवणाचे कण धुवून टाकण्यास मदत करते. तसेच तोंडाचा ओलसरपणा कायम ठेवते. मधुमेही रुग्णांमध्ये लाळोत्पादत पिंडे बिघडू शकतात. ज्यामुळे तोंडातील लाळ कमी होते व तोंडात कोरडेपणा वाढतो. तोंडातील ओलसरपणा हरवल्यामुळे तोंडातील मऊ पेशींना इजा होऊन त्या जळजळत असल्याचा अनुभव येतो. तोंडातील कात व हिरड्या लाल होऊन दुखापत होते.
तोंडातील लाळ कमी झाल्याने तोंडातील साफसफाईची प्रक्रिया कमी होते व दात किडू लागतात व श्‍वासाची दुर्गंधीही वाढते. अशा वेळी आपण काय करावे…?
– डेन्टिस्टला भेटून त्यांनी सुचवल्याप्रमाणे लाळेला पर्याय म्हणून सलायव्हा सबस्टिट्यूट वापरावेत. त्यांच्या वापराने तोंडातील लाळ वाढते व कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
– डेन्टिस्टच्या सल्ल्याने फ्लोराईड माऊथवॉश व टूथपेस्टचा वापर करावा. दात निरोगी राहण्यास मदत होते.
– लाळ वाढण्यासाठी साखर नसलेले च्युइंगम, मिंट, याचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. तसेच लिंबाचा रस प्यायल्यास सुद्धा लाळ वाढते.
– कॅफेन असलेले पदार्थ व दारूचा वापर कमी करावा.

मधुमेहामुळे होणारे तोंडातील इतर रोग …
– १) ओरल कॅण्डिडियासीस – हे एक फंगल इन्फेक्शन असून दातांची कवळी घालणार्‍या लोकांमध्ये अधिक आढळून येते. यासाठी अँटीफंगल क्रीम्स व लोशन्स उपलब्ध आहेत. ओरल कँडिडियासीस होऊ नये म्हणून आपले तोंड निरोगी ठेवले पाहिजे. दातांची कवळी स्वच्छ धुतली पाहिजे. दात नसलेल्या जागी हिरड्यांना मसाज करून त्या साफ ठेवल्या पाहिजेत.
२) लाईकिया प्लानस – तोंडात पांढरे पॅचेस होऊन अल्सर होऊ शकतात. मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यास जळजळण्याचा त्रास होतो. असे काही प्रकार आपल्याला लक्षात आल्यास ताबडतोब डेन्टिस्टकडे जाऊन त्यावर उपचार केले पाहिजेत.

मधुमेही रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येते का?
* मधुमेही रुग्णाला संसर्ग होण्याची अधिक शक्यता असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वांत आधी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणले पाहिजे व शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते कायम ठेवले पाहिजे.
* साखरेचे प्रमाण नियंत्रणात आल्यानंतर प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) देऊन शस्त्रक्रिया करता येते.
* रुग्णांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तोंडाची खूप काळजी घेणे गरजेचे असते. डेन्टिस्टने सुचवलेली प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे पाळली तर काहीच समस्या येत नाही.
* संतुलित आहार चालू ठेवला पाहिजे.