‘प्रेमा’ला पर्याय नाही!

0
196

– आरती सुखटणकर (निवृत्त मुख्याध्यापिका)

मुलामुलींच्या आयुष्यात त्यांच्या विकासास आईवडील कारणीभूत होतात. मुलांना केवळ अन्न, वस्त्र व निवारा दिला की आईवडिलांचे कर्तव्य संपत नाही. योग्य वयाच्या वाढीबरोबर होणारा बौद्धिक, मानसिक विकास होण्याकरता आईवडिलांनी प्रेम दिले पाहिजे.

मागील अंकात आपण पाहिले की…
मुलांना आपल्या मनाप्रमाणे शैक्षणिक साहित्य निवडण्याचे स्वातंत्र्य तरी आपण देतो का? बालपणी शैक्षणिक साहित्यापासून ते मोठेपणी व्यवसाय निवडण्याचे ‘स्वातंत्र्य’ही पालक ‘आपल्या मताप्रमाणे’च मुलांना देत असतात!
शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य तर काही ठिकाणी पालकांनाही नसते मग मुलांना कोठून मिळणार? पुन्हा विषय, वर्ग, शिक्षक या सर्वांबरोबर तर मुलाला जुळवूनच घ्यायचे असते! – नाही म्हणायला फक्त आपले ‘मित्र-मैत्रिणी’ कोण कोण असाव्यात हेच फक्त ‘निवड स्वातंत्र्य’ मुलांना उपजत मिळते. पण आपल्या मित्र/मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचे असेल, एखाद्या नातेवाईकाकडे जायचे असले तरी साधे कपडे स्वतःच्या मर्जीप्रमाणे मूल वापरू शकत नाही! बरेचदा ‘हा शर्ट कशाला घातलास? तो घाल’. ‘वाढदिवसाला जातोयस् ना, मग हा घालू नकोस.’ ‘मावशीकडे जातेय ना, मग तिने दिलेला फ्रॉक घाल. तिला बरं वाटेल!’… अशा प्रकारे शेरे मारून मुलांना आपल्या मर्जीप्रमाणेच वस्त्रे परिधान करायला पालक लावत असतात. मुलांना खूप काही वाटत असतं… पण लक्षात कोण घेतो??
भारतात बर्‍याच ठिकाणी मुलांना कित्येक विषयांचा अगदी मारून मुटकून अभ्यास करावा लागतो. उदा. गणित, इतिहास! मला नेहमी प्रश्‍न पडायचा की इतिहासात शिकलेले ‘फ्रेन्च रेव्होल्यूशन, अमेरिकन वॉर इ. या सर्वांचा भारतीय सामान्य नागरिकाला आपल्या जीवनात काय उपयोग होतो? किंवा एखादी भाजीवाली, मासेवाली दैनंदिन व्यवहारात बीजगणित व भूमितीचा किती उपयोग करते? देशातील सामाजिक परिस्थिती व शैक्षणिक क्षेत्र या दोघांत जोपर्यंत समन्वय साधत नाही तोपर्यंत देश स्वतंत्र झाला तरी प्रगत कसा होणार?
लग्नाच्या बाबतीतली पसंती/नापसंतीही घरातील मोठ्यांच्या मताप्रमाणे/मर्जीप्रमाणे होते- काही वेळा मुली ‘नापसंत’ होतात- रूप, शिक्षण, नोकरी, इ. बद्दलची मोठ्यांची मते किंवा मुलाचे गुण म्हणजे नोकरी, शिक्षण, पगार, घर-दार, घरात राहणारी मंडळी या सर्वांचा विचार करून आपल्या मुलीला आलेले स्थळ किती अयोग्य आहे… हे मोठी माणसेच ठरवत असतात. हल्ली काही मुले मात्र ‘सज्ञान’ झाल्यावर स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात, घर सोडतात, पळून जाऊन लग्न करतात! अशा मुलांना आईवडलांचे घर ‘बंद’ होते…. काहीवेळा निर्णय चुकतात, मुले आपापल्या घरट्यात पुन्हा येतात… तेव्हा बरेचदा ‘‘आता कशाला आलास/आलीस? भोग आता आपल्या कर्माची फळं, आम्हाला तू मेलास/मेलीस’’… अशी बोलणी ऐकावी लागतात नि मग ‘काहीही झाले तरी पुन्हा घरी फिरकणार नाही’ अशा विचारांप्रत मुले जातात…. चूक कोणाचीही असो परंतू एकमेकांना समजुतीने घेण्यातच नात्यांचा सच्चेपणा असतो – नाहीतर गैरसमजुतींच्या रानात नाती हरवायला वेळ लागत नाही.
असेच एक सुसंस्कृत ‘आजोबा’ होते आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते! परंतू मुलीने आंतरजातीय विवाह ठरवल्याचे कळताच तिच्याशी बोलणेच काय, संबंधही तोडून टाकले. आई मात्र मुलीला गुपचुप भेटत असे. पुढे ते आजोबा असाध्य रोगाने गंभीर आजारी पडले. मृत्यूशय्येवरच्या आजोबांना रक्ताची गरज आहे हे कळताच मुलगी व डॉक्टर जावई धावत हॉस्पीटलमध्ये पोचले. रक्तही दिले. आजोबांनी डोळे उघडले परंतू मुलगी आली आहे हे कळताच जे तोंड फिरवले ते कायमचेच! मृत्यूशय्येवर असतानाही वडिलांनी आपला ‘अव्हेर केला’ ही खंत कायमची उराशी बाळगून मुलगी जगते आहे… आईला सांभाळत, तिला आधार देत… काय म्हणावे अशा ऋणानुबंधांना? गैरसमजुतीच्या भिंती बांधल्या नसत्या तर आज किती गुण्यागोविंदाने एक घर गुणगुणले असते….
मुलामुलींच्या आयुष्यात त्यांच्या विकासास आईवडील कारणीभूत होतात. मुलांना केवळ अन्न, वस्त्र व निवारा दिला की आईवडिलांचे कर्तव्य संपत नाही. योग्य वयाच्या वाढीबरोबर होणारा बौद्धिक, मानसिक विकास होण्याकरता आईवडिलांनी प्रेम दिले पाहिजे. आज जगात कोणाला आई आहे- वडील नाहीत; वडील आहे- आई नाही, भावंडे नाहीत. अशी चित्रविचित्र जीवने दिसतात. काही मुलांना तर सर्वकाही असून नसल्याप्रमाणेच जीवन उभारावे लागते. माणसाला अन्न-वस्त्रापेक्षा प्रेमाची अधिक गरज आहे व त्याची देवाणघेवाण परस्परांच्या विचाराने झाली तर जगातील कितीतरी मुलांची दुःखे कमी होतील. मुले आपल्या आईवडीलांच्या बाबतीत आश्‍वस्त होतील. आज जगात जीवन जगण्यासाठी निरनिराळी साधने जशी आपण वापरतो, तसेच प्रेम हे एक साधन म्हणून आपल्या विचारात रूढ झालेले आहे. म्हणूनच पालकांना निरनिराळी साधने मुलांना पुरविणे हे त्यांच्या प्रेमाचे पर्याय आहेत असे वाटते!! वास्तविक खरे जीवन जगण्याचे साधन म्हणजे प्रेम! पण प्रेमाची निर्मिती ही शास्त्रातून होत नाही. तो प्रत्येक मानवाचा देहिक धर्म आहे. त्या देहिक धर्माआड आज जी अनेक सामाजिक बंधने आहेत, त्यातून सत्य अनुभवणे कठीण झाले आहे. जर मनुष्याच्या षड्‌विकारांचे पडसाद (षड्‌विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) या धर्माआड आले नाहीत तरच मनुष्य कितीतरी पटीने सुखी होईल.
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला एका ‘एन्‌आर्‌आय्’ कुटुंबाशी ओळख झाली. त्यांची तीन मुले होती – दोन मुलगे, एक मुलगी – पीटर, मॅक व जेनीफर. अमेरिकेला बरीच वर्षे राहून आता परत भारतात परतले होते ते कुटुंब. मुलांना माझ्या शाळेत प्रवेश हवा होता. तेथील ‘वार्षिक परीक्षा’ देऊन मुले इथे आली होती. मोठा पीटर सातवीत, मॅक सहावीत व जेनीफर ऊर्फ जेनी पाचवीत प्रवेश घेऊ इच्छित होती. .. तिकडच्या शिक्षणाची तर्‍हा थोडी वेगळी होती. मुले शाळेत जात, कुठल्याही क्लास (वर्ग)मध्ये जाण्याची त्यांना मुभा होती. वर्गाच्या एका कोपर्‍यात वेगवेगळे ‘टास्क’ ठेवलेले असत. मुलाने स्वतःच तो टास्क/प्रोजेक्ट स्वयंअध्ययनासाठी निवडायचा. त्यात काही अडल्यास खोलीतच जी शिक्षिका उपस्थित असे तिच्या मदतीने अडचणीचे निरसन करून घ्यायचे व तो संपूर्ण ‘टास्क’ पूर्ण करायचा. असे एकूण ‘दहा’ टास्क पूर्ण केल्यानंतर मुलाला पुढील ग्रेड (आपल्याकडची इयत्ता) मध्ये प्रवेश दिला जाई. यासाठी वय व वेळ यांची अट नव्हती! खेळाच्या वेळीही मुलाने आपल्याला हवा असलेला खेळ निवडून खेळायचे, चित्रकलाही स्वतःला आवडेल व जमेल अशा विषयाची काढायची- कोणाला चित्रे काढायची असतील चित्रात, तर तसे करायचे. संगीतही मुलाच्या आवडीनुसार मुलाने शिकावे अशी सोय होती- कोणी पियानो, कोणी गिटार, कोणी ड्रम्स तर कोणी ‘व्होकल’ म्हणजे संगीत म्हणण्यास शिकत असे…. शाळा कसली युनिव्हर्सिटीच होती! एका शिक्षकाच्या ताब्यात फक्त १२ ते १५ विद्यार्थी असत! असो. अशी एकूण तेथील शिक्षणपद्धती सोडून श्री. गोम्स आपल्या कुटुंबासह भारतात अन् तेही गोमंतकात परतले होते. इथल्या वार्षिक परीक्षा एप्रिलमध्ये असतात व शाळेचे नवीन वर्ष जूनमध्ये सुरू होते हे ऐकल्यावर श्री. गोम्सने मुलांना पुढील वर्गाची तयारी करून घेण्याची जबाबदारी स्वीकारली व पुढच्या वर्गांच्या पुस्तकांची यादी घेऊन गेले…. जूनमध्ये शाळा सुरू झाली नि ठरल्याप्रमाणे पीटर सातवीत, मॅक सहावीत व जेनी पाचवीत प्रवेश घेती झाली. …
क्रमशः