‘‘संजीवन’’ ः एक नवजीवन, नव चैतन्य

0
210

अनुराधा गानू (आल्त सांताक्रूझ-बांबोळी)

अनेक समाजोपयोगी उपक्रमांमुळे संजीवन ही संस्था समाजासाठी विशेषतः महिलांसाठी ‘‘संजीवन’’ बनली आहे. यापुढेही नव्या-नव्या समाजोपयोगी कल्पना साकार करण्याचा मानस आशाताईंनी बोलून दाखवला. पण त्यासाठी आर्थिक पाठबळाइतकेच महत्त्वाचे आहे ते माणसांनी माणसांसाठी दिलेला वेळ (ज्याचा आज खूपच अभाव आहे) आणि हात! इतकी सगळी कामं करण्यासाठी दिवसाचे २४ तास आणि माणसाचे २ हात अपुरे पडतायत.
मग चला तर… येताय का माझ्याबरोबर ‘‘संजीवन’’ बघायला? वळवा पावलं निदान त्यांना भेट देऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा तरी देऊ या.

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. रात्री आठ वाजता मला एक फोन आला. फोनवर आवाज आला, ‘‘मी आशाताई सावर्डेकर बोलतेय’’. माझी आणि आशाताईंची ओळख फार जुनी. मी अखिल भारतीय महिला परिषदेची बर्‍याच वर्षांपासून आजीव सदस्य आहे. काही वर्षे मी त्यांची हिशोब-तपासनीस म्हणून कामही केलेलं आहे. तेव्हापासून माझी त्यांच्याशी ओळख. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या बोलण्यातली अदब, लोकांशी बोलताना डोकावणारी लोकांबद्दलची त्यांची आपुलकी यामुळे नेहमीच त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. म्हणूनच आशाताईंचा फोन म्हटल्यावर लगेच आम्ही बोलायला सुरवात केली. त्यांनी मला ‘‘संजीवन’’ बद्दल साधारण माहिती सांगितली आणि म्हणाल्या, ‘‘गानू, मी तुम्हाला आमच्या कमिटीत येताय का… विचारायला फोन केलाय. आमच्या कामाचा व्याप बराच वाढतोय आणि तुमच्यासारख्या महिला माझ्याबरोबर हव्या आहेत.’’ मला खरं तर असल्या कामाची आवड आहे. पण मी पणजीला आणि त्यांचं काम नागेशीला. मी कशी जाणार रोज? आणि नुसतंच मिटींगपुरतं जायचं आणि खुर्चीला शोभा आणायची आणि त्या खुर्चीच्या कामाला योग्य न्याय द्यायचा नाही हे माझ्या मनाला पटणारं नव्हतं. त्यामुळे मला त्यांना नाही म्हणावं लागलं. त्या म्हणाल्या, ‘‘गानू आपण जरा लवकरच जन्माला आलोयत. काही वर्षे उशीरा जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं ना? समाजात खूप कामं आहेत.’’ खरंच होतं त्यांचं म्हणणं. असो.
मुळातच गोवा म्हणजे गोमंतक ही देवभूमी. त्यात फोंडा तालुका. फोंडा-फोंड म्हणजे खड्डा किंवा खोलगट भाग. चारही बाजूनं डोंगरांनी वेढलेला खोलगट भाग म्हणजेच फोंडा. पोर्तुगीज काळात जेव्हा गोव्यात देवळांची पाडापाडी, देवदेवतांच्या मूर्तींची तोडफोड सुरू झाली तेव्हा त्या-त्या ठिकाणचे लोक आपापले देव डोक्यावर घेऊन पळाले… ते हा खोलगट भाग सुरक्षित म्हणून फोंडा तालुक्यात स्थिरावले. तिथेच त्यांनी आपल्या देवांची देवळे बांधली. त्यामुळेच या तालुक्यात जास्तीत जास्त देवळे आहेत. चारही बाजूंनी डोंगर आणि घनदाट झाडीने वेढलेल्या आणि निसर्गाने नटलेल्या फोंडा तालुक्यात अगोदरच असलेल्या अनेक देवळात २००१ मध्ये आणखी एका देवळाची भर पडली आणि हा परिसर आणखीनच पवित्र झाला. हे मंदिर तुमच्या-आमच्या कल्पनेत असलेल्या मंदिराप्रमाणे नाही तर हे मंदिर आहे ‘‘मानवतेचं’’. ईश्‍वरी कार्य पुढे नेणार्‍या माणसांचं. अनेक समस्यांतून, दुःखातून स्वतःच्या हिंमतीवर, प्रयत्नांनी सुखरूपपणे बाहेर पडलेल्या डॉ. आशाताईंच्या समाजाच्या सुखरूपतेसाठी पाहिलेल्या स्वप्नांचं ते मंदिर. त्याचं नाव आहे ‘‘संजीवन’’. संजीवन म्हणजेच पुनर्जीवन, नवजीवन!!
आपण जेव्हा आजारी पडतो किंवा आपली प्रकृती अगदी गंभीर असते तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर उपचार करून आपल्याला वाचवतात. आपली व्याधी दूर करतात- हे पुनर्जीवन! हे झालं शरीराचं! पण आपलं मन जर तंदुरुस्त असेल तरंच आपण सुखानं जगू शकतो. अशा मनाला संजीवन देण्याचं काम ‘‘संजीवन’’ करतं. इथल्या आरोग्यधाम, नंदादीप, इंद्रधनुष्य, महिला आधार केंद्र यामुळे वृद्धांना नवचैतन्य मिळतंय. इतकंच नव्हे तर निराधार महिलांना आत्मविश्‍वास मिळतोय. साधारणपणे वय वृद्धत्वाकडे झुकू लागलं की भरल्या घरात सुद्धा माणसाला एकाकी वाटू लागतं. कसलीतरी अनामिक भीति वाटू लागते. मनाला सतत कसलीतरी हुरहूर लागून राहते आणि मग येतं ते नैराश्य! अशा वृद्धांची, अशा महिलांची ही भीति, ही हुरहूर, हे नैराश्य दूर करून त्यांना अनेक प्रकारे नवचैतन्य, नवजीवन देणारे हे ‘‘संजीवन!’’

तरुणाईला जागं केलं...

डॉ. आशाताई या बरीच वर्षे प्रोव्होदरीय या सरकारी समाज कल्याण खात्याच्या डायरेक्टर म्हणून काम करत होत्या. त्यामुळे समाजातील वृद्धांची, महिलांची दुःख त्यांनी जवळून पाहिली होती. समाजाला आलेली मरगळ काढून टाकून, समाजाला जाग आणण्याचं काम त्यांना करायचं होतं. जेव्हा समाजातला तरुण वर्ग जागा होतो तेव्हा समाजाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. नेमकं हेच आशाताईंनी हेरलं आणि जानेवारी १९७८ मध्ये समविचारी सहकार्‍यांच्या मदतीने ‘‘सोसायटी फॉर युथ डेव्हलपमेंट’’ या संस्थेचा पाया घातला. तरुण वर्ग आणि महिला यांच्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. निरनिराळ्या विषयावर शिबिरे घेतली. प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. हे सगळं करत असताना समाजातील एक मोठी समस्या लक्षात आली. आजकाल विभक्त कुटुंबपद्धतीमुळे प्रत्येक घरात मोजकीच माणसं. तीही नोकरीमध्ये गुंतलेली. वृद्ध किंवा आजारी माणसांकडे लक्ष द्यायला, त्यांची काळजी घ्यायला माणसं आणि वेळ दोन्हीही नाही. या समस्येतून उभं राहिलं ते आशाताईंचं ‘‘गृह वृद्ध सेवा परिचारिका प्रशिक्षण केंद्र’’. घरी राहून वृद्ध किंवा आजारी माणसांची प्रेमानं सेवा करणार्‍या परिचारिकेची गरज भासू लागली. मग त्यांनी आजुबाजूच्या तरुण मुलींना साद घातली. ग्रामीण भागातील गरीब, अल्पशिक्षित पण कर्तबगार मुलींची निवड करून त्यांना परिचारिकेचं प्रशिक्षण दिलं. २००० सालापासून जवळजवळ २८० मुलींनी हे प्रशिक्षण घेऊन आज त्या अनेक कुटुंबात सेवारत आहेत.
२००१ साली या संस्थेला बांदोडा कोमुनिदादीची ५००० स्वे.मीटर जमीन मिळाली आणि बांधकाम सुरू झालं. २००२ मध्ये या डोंगराळ खडकाळ जमिनीवर संजीवनचा पहिला टप्पा उभा राहिला. इथे सध्या असलेले संस्थेचे ऑफीस, वानप्रस्थी लोकांच्या राहण्याची सोय, नोकरी करणार्‍या महिलांसाठी वसतीगृह आहे.

स्वतःच्या वास्तूत स्थलांतर

संस्थेची स्वतःची वास्तू उभी राहिल्यावर कामाचा उत्साह दुप्पट झाला. व्यवसाय प्रशिक्षण वर्ग सुरू झाला. शिवणकाम, हस्तकला, संगणकीय शिक्षण, काथ्यापासून पायपुसणी बनवणे, कापडाच्या वेगवेगळ्या पिशव्या बनवणे अशा अनेक लहान लहान गोष्टींचे शिक्षण इथे मिळू लागले. हे शिकून महिलांनी बनवलेल्या वस्तूंसाठी विक्री केंद्रही सुरू झाले. महिलांसाठी स्वयंरोजगार, कुटुंब कल्याण, स्वयंसहाय्य गट, पंचायत राज अशा अनेक जागृत विषयांवर तज्ञांकडून महिला जागृती शिबिरे घेतली जातात. ‘‘नंदादीप’’ आणि ‘‘इंद्रधनुष्य’’ असे दोन उपक्रम इथे चालतात. आजकालच्या जीवनात पन्नाशीच्या आसपास माणसाला विरंगुळा हवा असतो. पन्नाशी हा प्रत्येकाच्या संसारातला एक विचित्र टप्पा असतो, विशेषतः महिलांसाठी- ज्या नोकरी करत नाही किंवा इतर कुठेच त्यांची गुंतवणूक झालेली नसते! त्यांची मुलं आपापल्या शिक्षणात, नोकरीत, मित्रमैत्रिणीत म्हणजेच आपल्या विश्‍वात रमलेली असतात. आतापर्यंत नवरा नोकरीमध्ये कुठेतरी चांगल्या पोस्टवर स्थिरावलेला असतो. त्यामुळे नोकरीत त्याच्यावरच्या जबाबदार्‍या वाढलेल्या असतात. त्यामुळे आपल्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नसतो. ना नवर्‍याला ना मुलांना! आपण एकटे पडलोय ही भावना मनात घर करते आणि मग निराशावादी सूर उमटू लागतो. मग चिडचिड सुरू होते. इतके वर्ष घर संसार, मुलं यातच आपण गुंतून पडलो, आपल्या आवडी-निवडी जपल्याच नाहीत. जगण्यासाठी आयुष्यभर धडपडलो, पण मनासारखं जगायचं राहून गेलं अशी भावना वाढीस लागते. अशा महिलांसाठी इथे गाणी, नृत्य, विविध विषयांवरचे संवाद, खेळ असे कार्यक्रम आयोजित केले जातात… जेणेकरून महिला या उपक्रमांत भाग घेऊन ताज्या-तवान्या होतील आणि परत आपल्या घरकुलात जातील. मिळालेला आनंद जपत सगळ्या कुटुंबाला आनंदी ठेवतील आणि स्वतःचं आयुष्यही नैराश्य झटकून टाकत रंगी-बेरंगी करतील. म्हणूनच बहुतेक या उपक्रमाचं नाव आहे ‘‘इंद्रधनुष्य!’’
असंच काहीसं पुरुषांच्या बाबतीतही होतं. इतके वर्ष नोकरीची धकाधकी झाल्यावर थकलेल्या-कंटाळलेल्या जिवाला काही दिवस स्वस्थता हवी असते. अशा लोकांसाठी इथे ‘‘नंदादीप’’ नावाचा एक वानप्रस्थी उपक्रम राबवला जातो. अशा लोकांनी काही वेळ संजीवनमध्ये यावं. काही वेळ संजीवनच्या कार्याला द्यावा. नवनवीन उपक्रमांना वेळ दिल्यामुळे स्वतःमधील सुप्त गुणांची नव्याने पुन्हा ओळख होईल. ते गुण, त्या कलांना संधी देण्याची हीच वेळ. मग थकवा जाऊन मन किती प्रसन्न होईल बघा! कवळे-बांदिवडे या जवळपासच्या गावातील मुलांसाठी ‘‘बालोन्नती’’ योजने अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सध्या बर्‍याच ठिकाणी नवीन कॉलेजेस, शिक्षणकेंद्रे सुरू झालेली आहेत. तिथे शिकण्यासाठी लांबून येणार्‍या विद्यार्थिनींना सुरक्षित व सोयीची जागा हवी असते म्हणून फोंडा गावात संस्थेने दोन फ्लॅट्‌स घेऊन तिथे त्या विद्यार्थिनींची राहण्याची सोय केलीय, असं आशाताईंनी सांगितलं.
२०१४ साली संस्थेने ११वी-१२वीचे वर्ग सुरू केले. हे स्कूल फक्त व्यावसायिक म्हणजे इथे फक्त नर्सिंग कोर्स घेतला जातो व त्याची परीक्षा एच.आर.डी.एफ्.तर्फे घेतली जाते. सध्या या स्कूलमध्ये ११वीत ५० आणि १२वीत२५ मुली शिकत आहेत.
संजीवन फिरून बघता बघता लक्षात आलं की २-३ वर्षांपूर्वी मी इथे आले होते. त्या वेळच्या काही महिला अजूनही इथे आहेत. पण त्या आजारी वगैरे नव्हत्या. म्हणून मी त्यांची चौकशी केली तेव्हा कळलं की इथे फक्त आजारी माणसांचीच सेवा केली जाते असं नाही. या काही महिला नोकरी करत होत्या. आता निवृत्त झाल्यावर एकटीनंच काय राहायचं घरी… म्हणून त्या इथे राहात होत्या. कोणाला मुलं नव्हती, कोणाची मुलं बाहेरगावी आहेत म्हणून त्यांना घरात एकटेपणा वाटत होता. दोन जोडपीही तिथं येऊन राहिली होती. त्यातल्या एका पुरुषाला कंपवायूचं दुखणं होतं. घरातल्यापेक्षा इथं नियमित डॉक्टरी उपचार होतात म्हणून ते इथं येऊन राहिले. इथेच त्यांना जास्त बरं वाटतंय.
काही महिला आजारी आहेत. कोणी मुक्या, बहिर्‍या आहेत. एक महिला तर अंथरुणावरून उठूच शकत नाही. तरीही या कोणाच्याही चेहर्‍यावर दुःखी भाव नव्हते. सगळेच जण समाधानी दिसले. एकमेकांना मदत करत होते. त्या सगळ्यांचं मिळून एक स्वतंत्र कुटुंबच आहे. ते एकमेकांचे नातेवाईक बनले आहेत आणि संजीवनच्या कामात मदतही करताहेत. त्यातल्या एकीची प्रतिक्रिया तर खूप बोलकी होती- ‘‘अहो, आशाताईंमुळे आमच्या आयुष्यातलं एकटेपण नाहीसं झालंय. आम्हाला खरंच खूप नातेवाईक, खूप मैत्रिणी मिळाल्या. आशाताई खरंच एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. त्यांच्या रुपानं आम्हाला ‘‘देव’’ भेटलाय’’. आणि जेव्हा त्यांना कळलं की मी लेख लिहिण्याकरता संजीवनची माहिती करून घेण्यासाठी आलेय… तेव्हा तर त्यांनी मला ५ वेळा ठासून सांगितलं- ‘‘यावर तुम्ही लेख लिहाच!’’ यातूनच आशाताईंचं खरं रूप दिसून येतं. मग मला त्या म्हणाल्या… ‘‘येत जा ना तुम्ही इथं अधून-मधून आमच्याशी गप्पा मारायला.’’ इतकं घरगुती आमंत्रण त्यांनी मला दिलं.

रुग्णांसाठी ‘‘आरोग्यधाम’’

घरी राहून सेवा करणार्‍या परिचारिकांना दिवसेंदिवस मागणी वाढत होती व परिचारिका पाठवणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. या समस्येतून नोव्हेंबर २००६ मध्ये ‘‘आरोग्यधामा’’ची मेढ रोवली गेली. घरी कोणी नसल्यामुळे अशा वृद्धांना इथे आणून ठेवतात. अत्यंत सेवाभावी डॉक्टर्स व नर्सेस इथे सतत रुग्णांची काळजी घेत असतात आणि तीही अत्यंत आपुलकीनं! ज्या रुग्णांना २४ तास डॉक्टरांची सेवा लागत नाही, पण त्यांना घरी ठेवणे शक्य नसते आणि हॉस्पिटलमध्येही ठेवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं अशा वेळी संजीवन आरोग्यधामाचा फार मोठा आधार लोकांना वाटतो. इथे दर दिवशी रुग्णांची तपासणी केली जाते. परिचारिकेची सेवा २४ तास मिळते. अनेक रुग्ण इथे येऊन बरे होऊन आनंदाने घरी परत गेले आहेत. याला वृद्धाश्रम म्हणण्यापेक्षा ‘रिकव्हरी होम’ किंवा मोठं ‘एकत्र कुटुंब’ म्हणणे जास्त योग्य होईल.
अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांमुळे संजीवन ही संस्था समाजासाठी विशेषतः महिलांसाठी ‘‘संजीवन’’ बनली आहे. यापुढेही नव्या-नव्या समाजोपयोगी कल्पना साकार करण्याचा मानस आशाताईंनी बोलून दाखवला. पण त्यासाठी आर्थिक पाठबळाइतकेच महत्त्वाचे आहे ते माणसांनी माणसांसाठी दिलेला वेळ (ज्याचा आज खूपच अभाव आहे) आणि हात! इतकी सगळी कामं करण्यासाठी दिवसाचे २४ तास आणि माणसाचे २ हात अपुरे पडतायत. मग असं वाटतं – देवाने दिवसाचे २४ तासांऐवजी जास्त तास आणि माणसाला दोन हाताऐवजी चार हात दिले असते तर जास्त बरं झालं असतं, नाही का? अर्थात त्या हातांना दानतही असावी लागते. तन-मन-धन अर्पण केल्याशिवाय अशी स्वप्नशिल्प उठावदार होत नाहीत.
आशाताई, शुभाताई बोरकर आणि त्यांचे सहकारी यांनी ही पालखी आपल्या खांद्यांवर घेतलेलीच आहे. तरी पण ही पालखी अशीच पुढे न्यायची असेल तर आणखी भोईंची गरज आहे असं वाटतं.
आपला सहभाग, आपला छोटासा वाटा यात असावा असं वाटत असेल तर आपण आपली देणगी ‘‘सोसायटी फॉर यूथ डेव्हलपमेंट’’ या नावाने देऊ शकता. आणखी एक महत्त्वाचं- या देणगीला ८०जी या कलमाखाली आयकरात सूट मिळते. परदेशात राहणार्‍या हितचिंतकांकडून त्यांच्या चलनात देणगी स्विकारण्यासाठी भारत सरकारकडून एफ्‌सीआर्‌ए कायद्यांतर्गत रजिस्ट्रेशन मिळालेले आहे.
मग चला तर… येताय का माझ्याबरोबर ‘‘संजीवन’’ बघायला? वळवा पावलं निदान त्यांना भेट देऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा तरी देऊ या.
‘‘संजीवन’’, बांदोडा पंचायत ऑफिसजवळ, नागेशी-बांदोडा-फोंडा, गोवा-४०३४०१. संपर्क – ०८३२-२३३५२५७, २९८००१