पणजीत आज कार्निव्हल मिरवणूक

0
91

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला पारंपरिक कार्निव्हल उत्सव आज दि. २५ पासून सुरू होत असून आज संध्याकाळी ३.३० वाजता राजधानी पणजीत निघणार असलेल्या कार्निव्हल मिरवणुकीने ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणार्‍या ‘किंग मोमो’ची राजवट चार दिवस राज्यात राहणार आहे. या मिरवणुकीसाठी ५७ प्रवेशिका आल्या असून यंदा किंग मोमो म्हणून संगीतकार रॉक फर्नांडिस यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिरवणूक मांडवी पुलाखालील दिवजा सर्कलजवळून सुरू होणार असून कला अकादमीजवळ सांगता होणार आहे. पणजीतील मिरवणुकीत ८ पारंपरिक चित्ररथ, १४ क्लब व संस्थांचे चित्ररथ, एक पुरस्कृत, ११ कौटुंबिक गटातील, ११ जोकर व अन्य विभागातील १२ जण मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पणजी चर्चस्वेअरजवळील पालिका उद्यानात ‘सांबा स्केअर’ रंगारंग कार्यक्रमांसाठी सज्ज आहे. तेथे रोज संध्याकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सांगीतिक कार्यक्रम होतील. आज ब्ल्यू बँड व क्रिमसन टाइड बँड, सांबा व सालसा नृत्य, दि. २६ रोजी ज्यूड मास्कारेन्हस बँड रागास टू रीचिस, कास्केड्‌स व सांबा सालसा नृत्य, दि. २७ रोजी वालेंतिनोस, आर्तेसानातो पल्सो लेस बँड तर २८ रोजी क्लब नॅशनलचे रेड अँड ब्लॅक डान्स, वालेंतिनोस, आर्चिस व सिंडिकेट बँड संगीत रसिकांना रिझवेल. राज्यातील अन्य प्रमुख शहरांमध्येही कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्या मडगाव, दि. २६ रोजी वास्को, दि. २८ रोजी म्हापसा व फोंडा शहरांमध्ये कार्निव्हल साजरा होणार आहे. पर्यटन खात्यातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या या उत्सवानिमित्त आठवडाभरात सुमारे ५० हजार देशविदेशी पर्यटक गोव्यात महोत्सवाची मजा लुटण्यासाठी गोव्यात येणार असल्याची अपेक्षा आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल
कार्निव्हलनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. दिवजा सर्कल ते रायबंदर – मेरशी जंक्शन मार्ग दु. १ ते सायं. ४ पर्यंत वाहतुकीस बंद राहील. शहरात येणारी वाहने गोवा कोकणी अकादमीजवळून जुन्या पाटो पुलावरून येतील. मिरवणूक संपेपर्यंत सिटी बसगाड्यांना वाहतूक करता येणार नाही. शहरातून येणारी वाहने जुन्या सचिवालयाच्या मागच्या बाजूने जोड पाटो पुलावरून बाहेर पडतील. मिरामारमार्गे येणारी वाहने कांपाल गणेश मंदिराकडून अग्निशमन दल, सांतइनेज जंक्शन मार्गे शहरात येतील.