आतापर्यंत झालेले टपाली मतदान रद्द करा

0
108

>> प्रमुख विरोधी पक्षांची बैठकीत एकमुखी मागणी

>> मगो, गोवा फॉरवर्ड, गोवा सुरक्षा मंच, गोविपाचा पाठिंबा

निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा व जनतेचा आयोगावरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आयोगाने आतापर्यंत झालेले टपाली मतदान रद्द करावे व निवडणूक कामावर असलेल्या सर्व १७ हजार ५०० मतदारांसाठी संबंधित कार्यालयात एक दिवस मतदानासाठी निश्‍चित करून मतदान करून घ्यावे, अशी मागणी करणारा ठराव काल सत्ताधारी भाजप व आप वगळता सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. या मागणीचे निवेदन निवडणूक आयोगाला पाठविणार असल्याचे कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक कामावर घेतलेल्या सरकारी सेवकांच्या प्रशिक्षण काळात संबंधित कार्यालयांमध्ये टपाली मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. मात्र, प्रथमच मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी या नियमाचे उल्लंघन करून गोंधळ निर्माण केला. टपाली मतदानासाठी ३५ दिवसांचा कालावधी देणे अयोग्य आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत टपाली मते तेथे पोचणे आवश्यक आहे. परंतु त्या दिवशी सकाळपर्यंत मतदान करता येत नाही, याची आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी चोडणकर यांनी काल केली.
सरकारी सेवकांसाठी मतदानासाठी शिबिराचे आयोजन करण्याच्या निर्णयानेही नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. मतपत्रिकेवरील क्रमांक काही उमेदवारांना मिळाल्याने मतदानाच्या बाबतीत आवश्यक असलेल्या गुप्ततेच्या बाबतीत संशय निर्माण झाला आहे. काही मतदारसंघांमध्ये लष्करी जवानांच्या नावांचा मतदारयादीत समावेश केला आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की नाही, याची चौकशी करण्याची मागणीही कालच्या बैठकीत करण्यात आल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
यावेळीच्या निवडणूक प्रक्रियेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकीचे महत्त्व कमी होऊन निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास उडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या दृष्टीकोनातून ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. वरील सर्वपक्षीय बैठकीत भाजप व आपच्या प्रतिनिधींनाही बोलावले होते. परंतु ते उपस्थित राहिले नाहीत, असे चोडणकर यांनी सांगितले.
गोव्यातील निवडणूक अधिकारी दिल्लीतील ‘सुपर पावर’च्या तालावर नृत्य करीत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत व प्रदेश राष्ट्रवादीचे ऍड. अविनाश भोसले यांनी केला. पत्रकार परिषदेस मगोचे कार्यकारी अध्यक्ष ऍड. नारायण सावंत, सचिव रत्नाकांत म्हार्दोळकर, गोवा सूराज पार्टीचे इनानसियो वाझ, गोवा विकास पार्टीचे लिंडन मोंतेरो आदी उपस्थित होते. दरम्यान, गोवा सुरक्षा मंचनेही वरील मागणीस पाठींबा जाहीर केला आहे.