भाजपचे सुयश

0
94

महाराष्ट्रातील दहापैकी आठ महापालिकांमध्ये कमळ फुलवत आणि सर्वांचे लक्ष असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतही शिवसेनेच्या घोडदौडीला लगाम घालत खालोखाल जागा मिळवून भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. विशेषतः पुणे, पिंपरी – चिंचवडसारख्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला, नाशिकमध्ये मनसेला, सोलापूरमध्ये कॉंग्रेसला धक्का देत भाजपाने सर्वत्र जोरदार मुसंडी मारलेली दिसते. या विजयाचे श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ आणि प्रांजळ प्रतिमेला निर्विवादपणे द्यावे लागेल. भाजपाची ही चमकदार कामगिरी शिवसेनेच्या उड्या थोपवील अशी अपेक्षा आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला तेव्हा शिवसेनेने आघाडी घेतली होती, त्यामुळे सेनेच्या गोटात जो विजयी उन्माद पसरला होता, तो संध्याकाळपर्यंत भाजपाने आपली कामगिरी सुधारल्याने आणि शिवसेनेखालोखाल जागा मिळवल्याने पुरता ओसरला. मुंबईत आणि ठाण्यात आपले वर्चस्व जरी शिवसेनेला राखता आले असले, तरी ज्या प्रकारे दंड थोपटले जात होते, बेटकुळ्या दाखवल्या जात होत्या, त्या प्रकारची ही कामगिरी म्हणता येत नाही. मुंबईत गेल्या वेळी कॉंग्रेसची स्थिती चांगली होती. यावेळी पुरताच सफाया झाला. संजय निरुपम यांना राजीनामा द्यावा लागला. राज्यात अन्यत्रही कॉंग्रेसला सोलापूरसारख्या सुशीलकुमार शिंदेंच्या बालेकिल्ल्यातदेखील आपली पत राखता आलेली नाही. कॉंग्रेस आणि त्याच बरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसलादेखील जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे. पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची जागा भाजपाने पटकावली आहे. नाशिकमध्ये मनसेने केलेल्या विकासकामांचे वेधक दर्शन मनसेने सर्वत्र घडवूनही मतदारांनी त्यांना नाकारले. एकूण निकाल हा भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त करणारा आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपाची माणसे निवडून आली तर आपली कामे सुरळीत होतील असा विचार मतदारांनी केला असणे स्वाभाविक आहे. साहजिकच या विजयाने भाजपावरील जबाबदारी वाढली आहे. या सर्व शहरांना या ना त्या समस्यांनी ग्रासलेले आहे. खुद्द देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेल्या पावसाळ्यात खड्‌ड्यांचा कहर दिसला होता. मुंबईत सर्वाधिक जागा सेनेने जिंकल्या असल्या तरी भाजपाच्या तोडीस तोड असल्याने दोन्हींकडून सत्तास्थापनेचा प्रयत्न होऊ शकतो. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एवढा कलगीतुरा रंगला होता की कोणत्या तोंडाने हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत हाही प्रश्न आहेच. परंतु निवडणुकीत कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो. सर्वत्र भाजपा निवडून येईल म्हणणारे रावसाहेब दानवे सकाळी मुंबई, ठाण्याचा निकाल शिवसेनेकडे झुकू लागल्याचे पाहताच गरज भासल्यास सेनेने हात पुढे करावा असे सांगू लागले होते. या महापालिका निकालांनंतर शिवसेना केंद्र आणि राज्यातील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल असे सूतोवाच केलेल्या उद्धव ठाकरेंना आता हे शब्द गिळावे लागणार आहेत, कारण मुंबईत स्वबळावर महापालिका चालवण्याएवढे पाठबळ मतदारांनी त्यांना दिलेले नाही. भाजपाच्या उधळलेल्या वारूपुढे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे शिवसेनेची फरपट त्यांनी होऊ दिली नाही हेच त्यांचे यश मानावे लागेल. मतदारांनी सर्व राजकीय पक्षांना त्यांची त्यांची जागा दाखवून दिली आहे. या निवडणुकीत मतदानही पूर्वीच्या तुलनेत बर्‍यापैकी वाढले होते. ते भाजपाच्या पारड्यात पडल्याचे दिसते. निवडणुकीच्या काळात एकमेकांची उणीदुणी काढणारे हे नेते आता तरी जनसामान्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आपापले अहंकार सोडून एकत्र येतील अशी आशा करूया.