सालेली प्रकरण : ७ लोकांचा आजवर संशयास्पद मृत्यू

0
68

सालेली, सत्तरी येथील जमिनदार कृष्णराव राणे यांचे ज्येष्ठ पुत्र पृथ्वीराज राणे यांचा २००५ साली जमावाने निर्घृण खून केल्यानंतर कृष्णराव राणे व सालेली ग्रामस्थांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत खुनाचा आरोप असलेल्यांपैकी ७ लोकांचा विविध कारणांमुळे आजवर संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यात बाबलो गावकर यांनी रागात जाऊन आत्महत्या करण्यामागचे तसेच शाणू गावकर बेपत्ता होण्यामागचे गूढ अद्याप उकललेले नाही.

२००५ साली झालेल्या पृथ्वीराज राणे हत्याकांडानंतर अजूनही सालेली गाव धगधगत असून त्या घटनेला अकरा वर्षे पूर्ण होऊनही सालेली गावातील ग्रामस्थांना त्यावेळच्या आठवणी अजूनही ताज्या वाटत आहेत. मात्र, त्या पुन्हा उकरून काढून परत गावातील शांतता भंग करण्याकडे मात्र ग्रामस्थांचा कल दिसत नसल्याचे सालेली गावातील अनेक ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या असता जाणवले. शाणू गावकर याचा खून झाला असेल तर त्याचा खून करणार्‍याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, त्यासाठी गावातील शांतता भंग होता कामा नये अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. हत्या प्रकरणानंतर कालांतराने सालेलीचे ग्रामस्थ प्रकरण विसरत. ज्या लोकांचे कृष्णराव राणे कुटुंबीयांबरोबर वैर होते ते विसरून गावात शांतता नांदण्यासाठी मैत्री केली. गावात बंद पडलेले उत्सव परत सुरू केले. आम्ही सर्व वैरत्व विसरून मैत्री केल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले. त्यावेळीच्या आठवणी काढून आमचेच नुकसान होणार होते. मनात जरी धगधग असली तरी गावातील उत्सव तसेच युवा पिढीचे भविष्य महत्त्वाचे होते. म्हणून गावातील सर्वांनीच मागचे सर्व विसरून एकोपा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पण आता बेपत्ता शाणू गावकरच्या खुनाला वाचा फुटली असल्याने ग्रामस्थ पुन्हा तणावाखाली आहेत. पोलीस गावातील ग्रामस्थांना चौकशीसाठी बोलवतील की काय अशी भीती सर्वांना सलत आहे. त्यामुळे सालेली गावातील शांतता व उत्सव बंद होण्याची भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. गावात नवीन मंदिर बांधण्यात आले असून त्याचीही चिंता सालेलीवासीयांना आहे.

शाणूप्रकरणी चौकशी संशयास्पद
शाणू गावकर ३ डिसेंबर २००६ पासून बेपत्ता झाला होता. त्यानंतर वाळपई पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. भाऊ कृष्णा गावकर यांनी पंढरपूर, सासरच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला होता. तसेच दोन-चार वेळा वाळपई पोलीस स्थानकात चौकशीवेळी प्रतिसाद न मिळाल्याने व वेळोवेळी पैसा खर्च करणे शक्य नसल्याने त्याने प्रयत्न सोडून दिला होता. त्यामुळे शाणूच्या बेपत्ता होण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, शाणूची पत्नी तो परत येईल म्हणून आशा बाळगून आहे.